१.
तू ठेव रे कितीही डांबून कोंबड्याला
बघ लालबुंद केले पूर्वेस मी नभाला
औकात आपलीही पाहून प्रेम कर तू
कागद जळून जातो चुंबून विस्तवाला
याही गटात खाटिक, त्याही गटात खाटिक
निवडून बोकडांनी द्यावे तरी कुणाला?
क्षणभर बहाल मजला केलेस प्रेम प्रेमा
छळलेस फार नंतर गाठून एकट्याला
स्वर्गात अप्सरा जर देते भरून प्याले
येथेच का ठराव्या अश्लील बारबाला?
२.
तुझ्या चेहऱ्यावर फक्त रंग कुठे लावला आहे?
मी त्या रंगामध्ये माझा जीव ओतला आहे
रंग निळा या आभाळाचा सहज जाहला नाही
त्याच्यासाठी भिम सूर्याने देह जाळला आहे
या आभाळातील अंधार सहज संपला नाही
निळे कराया नभ, सूर्याने देह जाळला आहे
फांद्यांवरच्या फुलांचा रंग सहज उजळला नाही
या पळसाने उन्हाळ्यातला सूर्य सोसला आहे
गर्वाने फुगलेल्या ठिपक्यास दाखवा हे कोणी
किती दूरवर आभाळाचा रंग पसरला आहे
मी ओठांनी ओठांवरती रंग पेरला होता
गालांवरती रंग गुलाबी कसा उगवला आहे
त्या घरट्यावर अजूनही का धर्म फडकला नाही
की, त्यास तिरंगी झेंड्याचा रंग समजला आहे
३.
अटीतटी आणि भानगडीत वाया गेली
अपुली चळवळ चढाओढीत वाया गेली
भक्तीमार्ग समजला आहे कुठे तयांना?
नवी पिढी आंधळ्या भक्तीत वाया गेली
एकनिष्ठतेचा मागितला पुरावा तिने
पूर्ण जवानी जिच्या गल्लीत वाया गेली
तशीच याही कोजागरीत वाया गेली
रात्र फक्त एका चांदणीत वाया गेली
गरजांचे नाही, इच्छांचे हप्ते भरले
तुझी कमाई तुझ्या ऐटीत वाया गेली !
त्या रांगेत कुणीच निरक्षर दिसले नाही
साक्षर जनता बुवाबाजीत वाया गेली
बाकी सर्वांनी संधीचे सोने केले
माझी संधी धाकधूकीत वाया गेली !
...............................................
No comments:
Post a Comment