गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र : एक अमूल्य साहित्यिक ठेवा : अर्चना देवधर




वृत्तबद्ध कवितेच्या दालनाशी थोडीफार ओळख झाल्यावर मराठी गझलेचं आकाश खुणावू लागलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना गझल म्हणजे काय इथपासून मराठी गझलेतील काही गैरसमज आणि विचारल्या जाणाऱ्या शंका-कुशंकांच्या निरसनापर्यंत प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर सखोल चिंतन आणि अभ्यासातून बाहेर आलेल्या नवनीताचं एकत्रीकरण म्हणता येईल असा एक अमूल्य माहितीपूर्ण ग्रंथ म्हणजे डॉ.श्रीकृष्ण राऊत सरांनी लिहिलेलं 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हे पुस्तक!

  

स्वयं प्रकाशनाने प्रकाशित आणि मुद्रित केलेलं हे पुस्तक १७ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालं आणि गझल अभ्यासक, चिंतक आणि रसिकांच्या हाती आलं. डॉ.अविनाश सांगोलेकर सर यांची सुटसुटीत आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाची ठळक वैशिष्ट्यं विशद करणारी आहे. प्रस्तावनेत सांगोलेकर सर लिहितात - 'मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत हे स्वतः उत्तम गझलकार आणि अभ्यासक असूनही त्यांच्या आसपास अहंकाराचा वारा अजिबातच फिरकलेला नाही आणि त्यांचा गझलविश्वातला वावर थक्क करून सोडणारा आहे. 'गुलाल', 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' आणि 'गुलाल आणि इतर गझला' हे तीन गझलसंग्रह प्रकाशित असणाऱ्या, दोन इंटरनेट ब्लॉग्ज चालवणाऱ्या आणि २००८ सालापासून 'गझलकार सीमोल्लंघन' या ऑनलाइन वार्षिकांकाची व्रतस्थपणे निर्मिती आणि संपादन करणाऱ्या डॉ. राऊत सरांनी वयाच्या सत्तरीत थोडाथोडका नव्हे तर तब्बल २७६ पृष्ठांचा ग्रंथ प्रसिद्ध करणं ही त्यांच्याच दृष्टीने नव्हे तर समस्त मराठी गझलविश्वाच्याही दृष्टीने महत्त्वाची घटना आहे असं डॉ.सांगोलेकर सर म्हणतात. ही घटना एकाएकी घडलेली नसून ७ आणि ८ फेब्रुवारी २००४ रोजी अमरावतीच्या गझल सम्मेलनात 'मराठी गझल:तंत्रशुद्धता की तंत्रशरणता' या विषयावरील परिसंवादात वाचलेल्या निबंधाच्या स्वरूपात आपले विचार मांडून या ग्रंथाची प्रक्रिया सुरू झाली आणि सतत २१ वर्षं त्यावर चिंतन,मनन अभ्यास करून इतका महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला. यातच त्याची खोली आणि मूल्य लक्षात येतं. याआधी गझलेच्या छंद:शास्त्रावर ग्रंथनिर्मिती काही अंशी झाली पण डॉ.राऊत सरांनी टाकलेला प्रकाश हा अधिक सविस्तर आणि सूक्ष्म स्वरूपाचा आहे.


'भूमिका' या प्रकरणात डॉ.श्रीकृष्ण राऊत सर यांनी प्रस्तुत ग्रंथनिर्मितीमागची आपली भूमिका मांडली असून 'एकविसाव्या शतकात आज जी मराठी गझल लिहिली जाते तिची पायाभरणी माधवराव पटवर्धन आणि सुरेश भट यांनी भक्कमपणे केली आहे आणि त्यांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ चिकित्सा या ग्रंथात केली आहे' असं ते म्हणतात. ग्रंथनिर्मितीसाठी घेतलेले अथक श्रम आणि सखोल मनन-चिंतन आणि ध्यास यांची प्रचिती सरांच्या या मनोगतात येते. पुस्तकाची नेटकी पण सविस्तर प्रस्तावना आणि आदरणीय राऊत सरांची ते लिहिण्यामागची 'भूमिका' वाचल्यावर त्याच्या अंतरंगाचा वेध घेणं आपल्यासाठी अपरिहार्यच होऊन बसतं. कारण एकेक प्रकरण म्हणजे नवशिक्या गझलसाधकांना अगदी बोट धरून शिकवावं तसं मार्गदर्शन तर त्यात आहेच; पण सुरुवातीच्या काळातली मराठी गझल आणि त्यात कालानुक्रमे झालेली स्थित्यंतरं यांचा तौलनिक मागोवा त्यात सूचकतेने आणि सटीकतेने घेतलेला आहे.


'पारिभाषिक संज्ञांचे अर्थ ' या मथळ्याखाली सरांनी गझल म्हणजे काय ते सांगण्यापासून 'मतला ते दीवान' यात अंतर्भूत असलेल्या गझलेशी निगडित सर्व संज्ञांचा यथोचित परिचय करून दिलेला आहे.


'संस्कृत छंद:शास्त्र आणि अरबी-फारसी अरुज : तुलनात्मक विश्लेषण' या प्रकरणात 'कर्ता आणि कालखंड' या शीर्षकाखाली 

पिंगल, खलील बिन अहमद बसरी, गण(संस्कृत छंद:शास्त्र आणि अरबी-फारसी छंद:शास्त्रानुसार)याबद्दल सविस्तर उहापोह केला असून शेवटी स्व. सुरेश भट सरांनी गझलेच्या बाराखडीत दिलेल्या व्याख्येनुसार सांगितलेले मुद्दे हे गझलेच्या तंत्राचे घटक आहेत असं लेखक म्हणतात.


१. एकच वृत्त

२. एकच यमक (काफिया)

३. एकच अंत्ययमक (रदीफ)

४. प्रत्येक कविता दोन दोन ओळींची(शेर)

५. दोन दोन ओळींच्या किमान पाच कविता(शेर)

अशी मराठी गझलेची पाच कलमी घटना असून त्यातील प्रत्येक कलमाचा विचार तंत्रशुद्धता की तंत्रशरणता ह्या निकषानुसार प्रस्तुत ग्रंथात केला असल्याचं लेखक म्हणतात.


'प्रारंभिक मराठी गझलेची अरबी-फारसी वृत्ते' या प्रकरणात सरांनी अठराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत लिहिल्या गेलेल्या गझलेच्या अरबी-फारसी वृत्तांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. हे प्रकरण वाचताना अनेक आश्चर्यकारक गोष्टी मला कळल्या. त्यापैकी एक म्हणजे मराठी गझलेत आनंदकंद हे पहिलं वृत्त आहे ज्यात कवी अमृतराय, मोरोपंत यांच्यापासून ते सुरेश भटांच्या गझलांपर्यंत अनेक रचनांचे उल्लेख आढळतात.

पूर्णपणे जातिस्वरूप की मर्यादित जातिरूप, अक्षर गणवृत्तांचं मर्यादित जातिरूप, अरबी-फारसी वृत्तांचा स्वतंत्रपणे न झालेला विचार, सवलत नव्हे प्रघात,

एकाच लगावलीची दोन नावे

अशा विविध विषयांवर साधकबाधक विवेचनही या प्रकरणात आहे. एकोणिसाव्या शतकात मराठी नाट्यपदांमध्ये असलेल्या गझलरचनांची उदाहरणं पाहून तर एक सुखद धक्का बसतो!


'फारसी छंद:शास्त्र आणि माधवराव पटवर्धन, त्यांनी केलेली वृत्तबांधणी, लघुगुरू बाबतचं शैथिल्य, मोकळीक, लवचिकता, पर्शियन छंद:शास्त्राचा अभ्यास, गज्जलांजलीतील वृत्ते, अरबी-फारसीतील ५१ वृत्ते, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट यांचं मराठी गझलेतील योगदान' अशा अनेक मुद्द्यांवरील शोधक माहिती हे दीर्घ प्रकरण आपल्याला देतं.


'गझलेची वृत्ते,त्यांचं वर्गीकरण 'अशा दोन प्रकरणांमध्ये लेखकांनी लगावली, मात्रा, अक्षरांच्या उच्चारानुसार येणारं लघुगुरुत्व, अशा विविध विषयांवर सोदाहरण माहितीचा अक्षरशः खजिना उपलब्ध करून दिला आहे. यात प्रसिद्ध हिंदी चित्रपटगीतांच्या वृत्तांबद्दलचीही उत्तम माहिती दिली आहे.


'गझलेच्या वृत्तांमधील यतिस्थान ' या प्रकरणात यती आणि यतिभंग म्हणजे काय या मुद्द्यापासून सुरू झालेल्या विवेचनात 'गझलेच्या वृत्तांमध्ये यती सांगितलेले नाहीत.'

'ज्या गणाच्या पुनरुक्तीने वृत्त सिद्ध होते त्या गणाच्या प्रत्येक आवर्तनाच्या अंती यती आहे असे मानणे साफ चुकीचे आहे '

'मात्र दोन गणानंतर आणि जिथे चरणाचे तंतोतंत सारखे दोन विभाग पडतात तिथे विरामाला अवधी असो वा नसो, पण यती पाळण्यात येतो' या गोष्टींवर सांगोपांग चर्चा केली आहे.

'द्विरावृत्त आणि यती' या अंतर्गत द्विरावृत्तामुळे वाढत जाणाऱ्या ओळीमुळे ओळीचे दोन समान भाग पडल्याने आवर्तन संपल्यावर यती कसा येतो या संदर्भातअनेक वृत्तांची उदाहरणं दिली आहेत. ज्यात आपल्याला विविध गझलकारांच्या अशा प्रकारच्या रचनांची ओळख होते.


'काफिया' या प्रकरणात लिहिताना काफिया म्हणजे यमक आणि ते जुळवणं ही बोलण्याच्या भाषेतीलही स्वाभाविक क्रिया आहे अशी सुरुवात करून काफिया हे गझलेचं शक्तिस्थळ आहे असं लेखक म्हणतात. गझल हा काव्यप्रकार यमकप्रधान आहे आणि एकाच कवितेत इतकी यमके असण्याचे दुसरे उदाहरण कुठल्याच काव्यप्रकारात नाही असं लेखक आवर्जून सांगतात.


'रदीफ' या प्रकरणात सर 

'गझलेतील काफियानंतर पुनरावृत्त होत जाणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे रदीफ होय' अशी सहज सोपी रदीफ या शब्दाची व्याख्या सांगतात. यामध्ये एकाक्षरी शब्दाचा रदीफ, एका शब्दाचा रदीफ, शब्दसमूहाचा रदीफ, रदीफ काफियांचे वेगळेपण, गैरमुरद्दफ गझल

अशा विविध घटकांवर सविस्तर माहिती मिळते. 'रस्ता' हा एकच रदीफ घेऊन शुभानन चिंचकर यांनी लिहिलेल्या ७६गझलांचा उल्लेख सर ह्या अनोख्या प्रयोगाची नोंद गझलेच्या इतिहासात निश्चित घेतली पाहिजे असं सुचवतात.


'शेर' या शीर्षकाच्या प्रकरणात गझलेतील शेर म्हणजे दोन ओळींची स्वतंत्र कविता होय असं सांगत कवीला आपली अभिव्यक्ती मांडण्यात केवळ दोन ओळींचाच अवकाश असतो आणि तिथे फाफटपसाऱ्याला वाव नसतो असं लेखक म्हणतात. दोन ओळीतच कार्यकारणभाव असतो, त्यात कधी विरोधाभास तर कधी एकमेकांना पूरक असणं, आरोप-पुरावा, अशा स्वरूपात शेराचा आशय अभिव्यक्त होत असतो ज्यामुळे परस्परांना छेद देणारी दोन विधानं आशय सघन करणारी तर सूचकतेने आशयाला उठाव देणारी असतात असं म्हटलं आहे.


उत्तम शेराची लक्षणे, शब्दकळा, प्रतिमा, अनेकार्थ सूचनक्षमता,

चमत्कृतीजन्य अमूर्तता, विद्वत्तापूर्ण चर्चा, गझलेतला मी, तगज्जुल(गझलपण), शेरांचा एकमेकांशी संबंध का नसतो?,

शेर कहना की लिखना? शेरांची संख्या, दोन दोन ओळींच्या किमान तीन कविता, गझलेतील शेरांची कमाल संख्या,

अंदाजे बयां आणि गझलेतील नाविन्य, तंत्रासोबत मंत्र अशा अनेकविध लहानसहान पण महत्त्वाच्या विषयांवरील माहिती या प्रकरणात असल्याने नवीन शिकणाऱ्यांना बराच उलगडा होऊ शकतो. खयालातील नाविन्याबद्दल मांडलेली परखड मतं गझललेखन नव्याने अंगिकारणाऱ्या लोकांच्या नक्कीच डोळ्यात अंजन घालणारी आहेत. उर्दूचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दिवंगत शायर शहरयार यांनी त्यांच्या मुलाखतीत बोललेलं वाक्य सरांनी या प्रकरणात दिलंय. ते आपल्याला गझलेकडे अधिक डोळसपणे बघायला लावणारं आहे -


'मेरी यह कोशिश रही है कि जो बात कही गयी, उसे मैं दुबारा ना  कहूं! '


'गझलेची भाषा'  या प्रकरणात  मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा संदर्भ देऊन राऊत सरांनी सातवाहन काळातील २२०० वर्षांपूर्वीच्या शिलालेखाचा पुरावा ग्राह्य धरला असल्याचा उल्लेख केला आहे. त्याहीपूर्वी २००-३०० वर्षांपासून आपली मराठी भाषा बोलली जात असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. या काळात परकीय आक्रमणं, भाषिक संक्रमण, व्यापार दळणवळण, पर्यटन यांमुळे इतर भाषिक लोकांशीही आपल्या लोकांचा संबंध आला आणि त्यातून अनेक परकीय शब्द इथे रूढ होत गेले. त्यांना इथून हद्दपार करणं शक्य नसल्याने इतर भाषिक शब्दांच्या बाबतीत आपण स्वीकारशील राहिलं पाहिजे असं लेखक म्हणतात.


गझलेची भाषा कठीण असते का?

भाषेची शुद्धाशुद्धता -


याबद्दल बोलताना सर म्हणतात की गझलेतील सौंदर्याचा अनुभव घ्यायला ज्ञानाचे बंधन नसते. तिची भाषा हीच तिची ताकद असते. तिच्या अर्थगर्भितेचा अनुभव येण्यासाठी भाषेचा अडसर येऊ नये. 'इतर भाषांमधील शब्द' या शीर्षकाखाली सर अरबी, फारसी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमधून आलेले अनेक शब्द मराठी गझलेत कसे रूढ झाले याचं सोदाहरण विवेचन करतात. मराठी भाषेत सगळे शब्द मराठीच असावेत हा आग्रह किंवा मतप्रवाह म्हणजे मराठी भाषेची जडणघडण कशी झाली याचं भान आणि ज्ञान नसल्याचा निदर्शक आहे असं स्पष्टपणे इथे नोंदलेलं दिसतं.


'सुरेश भटांच्या गझलांची वृत्ते'

यामध्ये भट साहेबांनी लिहिलेल्या एकूण गझला आणि वापरलेली वृत्तं यांचं सांख्यिकी विश्लेषण असून संग्रहनिहाय गझलांची सूची आहे.


'मराठी गझल : काही गैरसमज' या प्रकरणात सरांनी गेल्या चारपाच वर्षांत प्रत्यक्ष भेटीत, फोनवर, व्हाट्सएपवर संशोधक, संपादक, अभ्यासक, नवोदित गझलकार यांनी त्यांना विचारलेल्या शंकांच्या अनुषंगाने काही विचार मांडले आहेत. यात प्रामुख्याने पुढील गैरसमजांवर सरांनी अतिशय मर्मज्ञ भाष्य केलं आहे.


१.गझल अक्षर गणवृत्तातच लिहावी, मात्रा वृत्तामध्ये लिहू नये -

यावर सर म्हणतात की हा अट्टाहास पूर्णपणे सत्य नाही. अक्षरगणवृत्तात लय नैसर्गिकपणे सांभाळली जाते, त्यामुळे सादरीकरणात अडथळा येत नाही. भट साहेबांनी गझलेच्या बाराखडीत  'शक्यतो अक्षरगणवृत्तात गझल लिहावी' असं म्हटलंय. याचा अर्थ कुठल्याही वृत्तात ती लिहिली जाऊ शकते. म्हणून लयबद्धतेचा आणि आशयाचा विचार करून आपल्या शैलीनुसार वृत्त निवडण्याचं स्वातंत्र्य गझलकाराला द्यावं आणि अक्षरगणवृत्तातच गझल निर्मिती होऊ शकते हा भ्रम डोक्यातून काढून टाकावा.


२.स्वरकाफिया वापरू नये -

याबाबत राऊत सर म्हणतात की पारंपरिक पद्धतीने गझल लिहिणाऱ्यांना स्वरकाफियाची गझल लिहिणं गैर वाटतं; पण स्वर काफियामुळे गझलेचं सौंदर्य आणि विषयांची व्यापकता वाढते, गझल अधिक प्रभावी होते.


'गझल फक्त  सौंदर्यावरच लिहिली पाहिजे, दीवानमधील गझल हीच उत्तम गझल, काफियांची पुनरावृत्ती करू नये, गझल बेमतला असू शकत नाही, अर्थ बदलत नसेल तर वृत्तपूर्तीकरिता शब्दातील ऱ्हस्व इकार व उकार दीर्घ केले तरी चालतात' अशा विविध गैरसमजांचा धांडोळा घेऊन गेल्या काही दशकांमध्ये गझलेच्या स्वरूपात झालेले बदल स्वीकारावे लागतील असं मत सर नोंदवतात. प्रेम, प्रणय, विरह याहीपुढे जाऊन विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मानवी भावनांवर आधारित गझललेखन होत आहे. त्यामुळे गझल हा साहित्यप्रकार अधिक सर्वश्रुत आणि व्यापक अनुभूती देणारा झालाय असं म्हणत सर आधुनिक गझलेत पुढील बदल समाविष्ट झाले आहेत असं सांगतात.


विषयांचा विविधांगी समृद्ध विचार


तांत्रिकतेपेक्षा सर्जनशीलतेवर भर


अधिक सुलभ सोपी भाषा


अनुभूतींच्या वेगवेगळ्या पैलूंवर भाष्य


अनेकार्थ सूचनक्षमतेवर भर


आशयगर्भता इत्यादी


पुस्तकाच्या शेवटी आदरणीय राऊत सर यांना नवोदितांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या पुढील काही प्रश्नांवर भाष्य केलं आहे -


१)गझलेला शीर्षक असावे का?

२)प्रत्येक गझलेत मक्ता असतो का?

३)मतलाबंद गझल म्हणजे काय?

४) हजल म्हणजे काय?

५) उर्दूमध्ये गझलेव्यतिरिक्त काव्याचे कोणते प्रकार आहेत?

६) गझल संग्रह आणि दीवान यांत फरक कोणता?


वरील प्रश्नांवरील भाष्यानंतर गझलसंग्रह प्रकाशित करताना लिहून झालेल्या गझलांचा क्रम कसा असावा याबद्दलच्या पद्धतीचा गोषवारा सरांनी घेतला आहे.


गझललेखनात इस्लाह कितपत सहाय्यक ठरतो?


याबाबत लेखक म्हणतात की 'सीमोल्लंघन' या अंकाचं संपादन करताना वृत्तदोष, यतिभंग आणि व्याकरणाच्या चुका आढळल्यास मी स्वतः दुरुस्ती न करता ते संबंधित गझलकारांकडे पाठवतो आणि शेरांचं पुनर्लेखन करायला सांगतो. जेणेकरून त्यांची चूक त्यांच्या लक्षात यावी आणि ती पुन्हा घडू नये. स्वयंअध्ययनातून शिकणे हा त्यामागचा हेतू असल्याचं सर म्हणतात.

नवोदितांच्या चुका ज्येष्ठांनी स्वतः दुरुस्त करून दिल्या तर त्यांचं ज्येष्ठांवरील अवलंबित्व वाढतं. ते कमी झालं पाहिजे असं मत मांडून इस्लाहचा एवढाच माफक अर्थ ज्येष्ठांनी घ्यायला हवा हे आवर्जून सांगतात.


गेल्या महिन्यात गणेशोत्सवादरम्यान प्रस्तुत पुस्तक माझ्या हाती आलं; पण त्यावर 'मी वाचलं आणि फार आवडलं' अशी चार शब्दांची अभिप्रायवजा प्रतिक्रिया देऊन मोकळं व्हावं इतकं हे साधं सोपं पुस्तक नाही. २००४ ते २०२५ एवढ्या  प्रदीर्घ कालावधीत पुस्तकातील विषयांवर सखोल मनन, चिंतन करून तपश्चर्येनंतर त्याची निर्मिती झाली आहे. गझलेबाबतची नियमावली, गझलेचा आजवरचा प्रवास, काळानुसार त्यात होत गेलेले बदल, त्याबद्दलचे वेगवेगळे मतप्रवाह, विचार, समज-गैरसमज, आजची स्थिती यांचा मागोवा घेणं ही वाटते तितकी सहजसोपी गोष्ट नाही. त्यामुळे असं पुस्तक वाचणं हा एक अभ्यासाचाच भाग आहे.


मी गेल्या चार-पाच वर्षांत गझलेची केवळ तोंडओळख झालेली पण एकूणच काव्य- मग ते कुठलंही असो- या प्रकाराबद्दल उपजत आवड असलेली एक सामान्य विद्यार्थिनी आहे आणि मुळात वयाच्या साठीनंतर गझल या प्रकाराकडे वळले आहे. त्यामुळे गझल या काव्यप्रकारातल्या खाचाखोचा जाणून घेणं या गोष्टीला थोडा वेळ लागतो. प्रत्यक्ष गझल लिहिताना पाच शेरांच्या रचनेत एखादा शेर बरा होतो एवढीच माझी स्थिती आहे. त्यामुळे माझा वकूब मी जाणते, तरीही जमेल तितकं बारकाईने पुस्तक वाचून त्यात मला जे सापडलं ते लिहायचा प्रयत्न केलाय. एवढ्या माहितीचा साठा असलेल्या पुस्तकावर भाष्य वगैरे करणं ही गोष्ट माझ्यापासून कोसो दूर आहे. मात्र एक विद्यार्थिनी म्हणून, एक आस्वादक म्हणून त्यावर अभिप्राय लिहिला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत राऊत सरांच्या एक दोन गझलांचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हाट्सएपच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क आणि परिचय झाला. या पुस्तकाबद्दल कळल्यानंतर लगेच मागवलं. पुस्तक प्राप्त झाल्यावरही सरांशी पंधरावीस मिनिटं सविस्तर वार्तालाप झाला आणि  गझलेविषयी अनेक नवीन गोष्टी कळल्या. आजच्या माध्यमांच्या सुकाळात एकूणच झटपट प्रसिद्धीच्या वाटांबद्दल बोलणं झालं. हा अभिप्रायात्मक लेखसुद्धा त्यांना आधी पाठवून मगच पोस्ट करते आहे. मात्र माझ्यासारख्या गझलसाधकांनी तो जरूर वाचावा, संग्रही ठेवावा आणि पुनःपुन्हा अभ्यासावा असाच आहे एवढं सांगावंसं वाटतं.

................................................

□ गझलेचे उपयोजित

छंदःशास्त्र 

( मराठी गझलेचे व्याकरण )

□ लेखक : श्रीकृष्ण राऊत 8668685288

□ स्वयं प्रकाशन, सासवड, पुणे 

9890811567

□ मुखपृष्ठ : सतीश पिंपळे

□ प्रस्तावना : 

डॉ.अविनाश  सांगोलेकर

□ पाठराखण :

सुरेशकुमार वैराळकर

□ पृष्ठे : २७६

□ किंमत : ४००/-

□ पोस्टेज : ६५/-

□ एकूण : ४६५/- 

□ गुगल पे / फोन पे :

9284253805

Sanket Shrikrishna Raut

9 comments:

  1. गझल रसिकांसाठी एक अमूल्य ठेवा.

    ReplyDelete
  2. गझलकार, गझल अभ्यासक इ.काव्य रसिकांसाठी प्रा्. डॉ.श्रीकृष्ण राऊत लिखीत सुबोध असा अभ्यसनीय व सग्राह्य ग्रंथ ! जणू गझलचा वर्मग्रंथच !
    ग्रंथाचा मर्मभेदी प्रकरणांनुसार विवेचनात्मक सुंदर परिचय !

    ReplyDelete
  3. जतन करून ठेवावा असाच लेख.. नवोदित लेखन करणाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आणि प्रत्येक शंकांचे सहज निरसन होणारी माहिती लेखातून मांडली गेलीय असा महत्त्वपूर्ण दस्तावेज

    ReplyDelete
  4. आ. प्रा. राऊत सरांचा हा ग्रंथ एखाद्या संदर्भग्रंथाच्या तोडीचा आहे. नवोदितांकरीता मार्गदर्शक तर प्रस्थापितांकरीता उजळणी देणारा आहे. गझल विषयावर एवढा परिपूर्ण ग्रंथ मराठीत आजवर आलेला नाही, हे सत्य आहे. सततचा अभ्यास, चिंतन, मनन, वाचन व शोधकवृत्तीने सरांनी हा ठेवा परिश्रमपूर्वक व तपश्चर्येने साकारला आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.सर्व गझलप्रेमींनी हा ठेवा आपल्या संग्रही ठेवावाच हे आवर्जून सांगावेसे वाटते, कारण गझलेच्या सर्व अंगांवर एवढी व्यापक व सांगोपां चर्चा एकाच ग्रंथात आजवर झालेली नाही, किमान माझ्या पाहण्यात व वाचण्यात आलेली नाही.

    ReplyDelete
  5. गझलेच्या गुरुकिल्लीचा सविस्तर परिचय दिलात ताई... 👌✍️🙏

    ReplyDelete
  6. खूपच छान लेख मार्गदर्शनपर लेख, आवडला सर लेख

    ReplyDelete
  7. गझलेतील बारकाव्यांचे अचूक विवेचन👌

    ReplyDelete