१.
जुना होत मी ओसरू लागलो
उतारावरी वावरू लागलो
स्मृती जीर्ण झाल्या, तया मी जणू
करोनी रफू वापरू लागलो
तुझी साथ गे लोपल्यापासुनी
तुझी शाल मी पांघरू लागलो
बघोनीच डोळे वयस्काश्रमी
निजी दु:ख मी विस्मरू लागलो
जिणे ताणणारी, न देता मरू
दवा खावया मी डरू लागलो
रिते यायचे अन् रिते जायचे
रिते चित्तही मी करू लागलो
मरे थोर, तो कीर्तिरूपे उरे
मला बास हे, मी मरू लागलो
२.
झाल्या तपासण्या पण आजार सापडेना
झाले निदान तेव्हा उपचार सापडेना
'संदेश' पाहुण्याला ज्या, छात्र 'द्या' म्हणाले
डोक्यात त्यास त्याच्या सुविचार सापडेना
बघतो जरी कराया व्यवहार पांढरे मी
मजला कुठेच गोरा बाजार सापडेना
सूर्योदयी उडाली तिरपीट काजव्यांची
मिरवावयास त्यांना अंधार सापडेना
नाड्या विरोधकांच्या सरकारच्या करी पण
हाती विरोधकांच्या सरकार सापडेना
वाटे जरी प्रवक्ता होणे नको दुज्याचा
मजला अजून माझा उद्गार सापडेना
३.
पदवी जरी न लागे नक्कल करावया
अक्कल हवीच असते नक्कल करावया
बघण्यात कैक नामी प्राणी असूनही
मर्कट बघ्यांस रुचते नक्कल करावया
बिंबाहुनी जनांना प्रतिबिंब भावते
देती नटास धन ते नक्कल करावया
नक्कल-कला अनोखी ज्या पोपटास, तो
मनुजाळताच लागे नक्कल करावया
साहित्यचौर्य राहो वा तोतयेगिरी
येणे अवश्य आहे नक्कल करावया
करतो जरी कधी मी थोडी विदूषकी
माझी मला न जमते नक्कल करावया
मी पट्टशिष्य सच्चा झालो, परी मला
नकली गुरू मिळाले नक्कल करावया
.....…....…...............................
डाॅ.दिलीप पां.कुलकर्णी
९८२२२ ३१८६८
No comments:
Post a Comment