१.
अता जिंकणे सोड, हारून पाहू
तिला एकदा हाक मारून पाहू
चुकीनेच निर्णय कधी घेतले जे
सखे आज आपण सुधारून पाहू
अता विसरुनी कालचे दुःख सारे
नवे आपले जग उभारून पाहू
कशी लेखणी आज निष्प्राण झाली
चला बातमी ही चितारून पाहू
सुखाने जरी घेतला शोध माझा
तरी ह्या व्यथेला उगारून पाहू
२.
अपमान झेलण्याचा माझा स्वभाव आहे;
काही कळे न त्यांना कसला तणाव आहे?
वर्षानुवर्ष त्यांचा आधार घेतला मी,
अद्यापही घराला त्यांचा सराव आहे.
माझी जगावयाची इच्छाच राहिली ना;
साध्याच माणसांचा कोठे निभाव आहे.
जाळ्यात मीच माझ्या अडकून आज बसलो;
सांगा मला कुणीतर, काही बचाव आहे?
आधार फक्त आहे 'नादान' वेदनांचा;
हृदयात खोल माझ्या सलतोच घाव आहे.
३.
तुला काय सांगू कसा राहिलो मी
जसे भाग्य होते तसा राहिलो मी
कधी धावलो कासवाच्या गतीने
कधी धावताना ससा राहिलो मी
कसा भावनांचा झरा सांग होऊ
कुणाशीच ना फारसा राहिलो मी
सखे मी कुणाला कसा दोष देऊ?
मलाही पटेना असा राहिलो मी
मला आठवांचाच आधार आहे
जुन्या कागदी वारसा राहिलो मी
..................….........................
दिनेश डोंगरे 'नादान'
मो.नं.9898346877

No comments:
Post a Comment