माझ्यातल्या मला, तिला व त्यांना : अशोक म. वाडकर

 



       

नरहर कुलकर्णी हे व्यवसायाने वास्तुशिल्पी असून एक कलाप्रिय असे कलावंत व्यक्त्तिमत्त्व आहे. गेली सुमारे चाळीस वर्षे ते सकस कविता व गझल लेखन करत आहेत. कोल्हापूरच्या 'कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मध्ये त्यांनी अध्यापनाचे काम केले असून प्रभारी प्राचार्य म्हणूनही ते कार्यरत होते. ते स्वत: मान्यवर संगीतकार व गायक आहेत. 


'माझ्यातल्या मला, तिला व त्यांना' या संग्रहात एकूण ११६ गझला असून त्यापैकी ९० 'मुसलसल' गझला आहेत. गझलकारानी स्वत:च या गझला 'माझ्यातल्या मला', 'माझ्यातल्या तिला' व 'माझ्यातल्या त्यांना' अशा तीन विभागात विभागल्या असून त्यांची संख्या अनुक्रमे २२, ३२ व ६२ अशी भरते. या गझला 'मला, तिला व त्यांना' अशा मांडलेल्या असल्या तरी त्या 'माझ्यातल्या' आहेत, हे विसरून चालणार नाही. गझलसंग्रहाची मांडणी वेधक असून संग्रहास अनुरूप असे मुखपृष्ठाचे आशयघन रेखांकन निखिल कुलकर्णी व आतील विभाजकांवरील बोलकी रेखाटने नीरज कुलकर्णी या गझलकारांच्या दोन सुपुत्रांनी केली आहेत, हेही या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हा संग्रह गझलकारांनी आपले प्रेरणाशील वडील श्री रामचंद्र दत्तात्रय कुलकर्णी व आई सौ. सिताबाई रामचंद्र कुलकर्णी यांना समर्पित केला आहे. संग्रहाच्या प्रारंभी गझलकारांच्या मनात कवितेचे बीजारोपन करणाऱ्या साहिर लुधियानवी, भाऊसाहेब पाटणकर व सुरेश भट यांच्या निवडक काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेेत. गझलकार व गझलसंग्रहाची वैशिष्ट्ये विषद करणारी सविस्तर  प्रस्तावना नामवंत गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी यांची असून 'मी का लिहितो?' या शीर्षकांतर्गत गझलकार नरहर कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.


संग्रहात समाविष्ट असलेल्या व्यापक समाजभानाने संपृक्त गझला जीवनविषयक, कौटुंबिक, राजकीय, पर्यावरण इत्यादी वैविध्यपूर्ण आशयाने समृद्ध आहेत. त्यांतील शेरांमधून प्रेम, विरह, समाज, देश, श्रद्धा,  अंधश्रद्धा, कला, ऋतू, मृत्यू, राजकारण इ. विविध विषय अभिव्यक्त होत आहेत. श्री कुलकर्णी हे गझलसम्राट सुरेश भट यांचा गझलविचार अनुसरून वाटचाल करणाऱ्या गझलकार पिढीचे प्रतिनिधित्व करतात. गझलेविषयी आपली भूमिका त्यांनी


'रात्रंदिन जो मनात माझ्या घोळत आहे

गझलेमधुनी खयाल मी तो मांडत आहे'


या शेरातून स्पष्ट केली आहे. आणखी एका शेरात ते म्हणतात --


'वेदना आतून जेव्हा गावयाला लागते

लेखणीमधुनी गझल उतरावयाला लागते'


गझलेमध्ये योग्य शब्दांची निवड, आशय आणि अभिव्यक्ती या बाबी महत्त्वाच्या ठरतात, याचे भान नरहर कुलकर्णी यांना आहे. गझलेमधील शेर हे आशयसमृद्ध असावेत,  शिवाय ते व्याकरण व तांत्रिकदृष्ट्याही निर्दोष असावेत हे कालातीत सत्य असले तरीही अनवधानाने आशयाच्या नादात गझलेत काही दोष राहून जातात. त्याविषयी एका शेरात ते म्हणतात  --


'कधी काफिया, रदीफ केव्हा, मात्रांचीही गणिते चुकली

कशी सांग तू फिदा जाहली चुकलेल्या या गझलांवरती?'


सध्याच्या विपरीत कालखंडाविषयीचा त्यांचा आशयघन शेर पहा -


'बातमी आधीच होती पेपरातुन छापली

मग मला घटना तशी घडवावयाला लावली'


शांतता व सलोखा याविषयी आपली भूमिका ते पुढील प्रमाणे स्पष्ट करतात --


'अंगणास या करू नये रे कधी रणांगण

विसरुन जावे माजघरातच अपुले भांडण'


आणखी एका शेरात ते असे व्यक्त होतात --


'शांती असते मनास तेव्हा गाणी म्हणतो,

जेव्हा असतो उदास तेव्हा गाणी म्हणतो'


आपल्या भूमिकांविषयी नरहर कुलकर्णी सांगतात --


'जनतेचे या प्रश्न जसे ती मांडत असते

राजकीयही पोल खोलते कविता माझी'


'दु:खाला मी हासत हासत पचवत आहे,

आयुष्याला माझ्या जगणे शिकवत आहे


भेट अनोखी द्यावयास मी त्यांच्यासाठी,

जखमांनी मी हृदय आपले सजवत आहे'


मुरलेल्या लोणच्याप्रमाणे मनात घोळत असलेली गझल रसिकाला पुरेपूर आस्वाद देत राहते, याचा प्रत्यय हा विविधतेने नटलेला संग्रह देतो. साहजिकच तो वाचनीय व संग्राह्य असा झाला आहे. 

..............................................

माझ्यातल्या मला, तिला व त्यांना (गझलसंग्रह )

नरहर कुलकर्णी

गझलसाद प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे : 134

मूल्य : ₹.200/-

No comments:

Post a Comment