तीन गझला : रवि प्रकाश चापके

 




१.


फकीराचे घराणे कर

भुकेचे तू उखाणे कर


दिशा घेऊन पळ वेड्या

तुझे थांबे ठिकाणे कर


तुझ्या तू तोड पंखांना

अपंगांना विमाने कर 


फुले कुस्कार प्रेमाने

सुगंधाला दिवाणे कर


किती छळतोस रे श्वासा 

तुझे येणेच, जाणे कर!



२.


चुंबनांचे वार झाले

दोन योद्धे ठार झाले

 

आठवण लागे जिव्हारी 

घाव हिरवेगार झाले 


स्पर्श तोबा बघ सखीचा  – 

तोफखाने गार झाले!


आठवांचे हाय तांडव

श्वास घेणे भार झाले 


चाललो..उठल्या दिशाही

बैसलो, दरबार झाले!


३.


काट्यास फूल आले 

जखमी सुगंध झाले!


प्याले अतृप्त दोन्ही

तृष्णेमधे जळाले 


ओठी तिच्याच पट्टी?

की धबधब्यास ताले!

 

मज आठवण म्हणाली,

"अश्रूत छान न्हाले!"  


घ्या बर्थडे शुभेच्छा -

पण वर्ष तर गळाले !

..............................................

No comments:

Post a Comment