गझल : शिवाजी जवरे

 



आहेत बघ मुळातच माझी लबाड दारे 

ठेवू नको तुझी तू उघडी सताड दारे


वेणीसवे कधी तू दारात खेळताना

खोड्या करून जाती माझी उनाड दारे



मी शीळ घालताना उठतात वादळे अन्

होतात बंद चिडुनी ही धाडधाड दारे


दोषी न यात केवळ माझीच ही कवाडे

चमचम तुझ्या घराची माझ्या पल्याड दारे


झिडकारुनी मला तू जातेस निघुन जेव्हा

घेती कवेत झटकन तुज हीच द्वाड दारे


होती कधी कधी बघ तिकडूनही इशारे

देतील ध्यान तर ना माझी बह्याड दारे


आपण तटस्थ राहुन त्यांची मजाच पाहू

करतील नेम नाही कुठले जुगाड दारे


येइल कुणी मवाली नेइल तुला महाली

दिसतिल तुझी नि माझी भेसुर उजाड दारे

..............................................

1 comment: