१.
फुले शाहु आंबेडकर बुद्ध नानक तुला काय समजायचे ते समज
कधी मी सुधारक कधी मूकनायक तुला काय समजायचे ते समज
तुझा काल होतो तुझा आज आहे उद्याही तुझा फक्त राहीन मी
खरे सांगतो की वठवतोय नाटक तुला काय समजायचे ते समज
सदासर्वदा चेहऱ्यावर तुझ्या बागडावे हसू हीच इच्छा उरी
समज मित्र की मान मजला विदूषक तुला काय समजायचे ते समज
जळासारख्या स्वच्छ निर्मळ स्वभावामुळे मी जगाला हवा वाटतो
व्हिलन मान की तू मला लोकनायक तुला काय समजायचे ते समज
मला चीड खोटेपणाची खरे तेच माझे म्हणत मी जगत राहतो
प्रशंसक विरोधक कधी मी समीक्षक तुला काय समजायचे ते समज
दिले खास नाहीच काही दिली जीवनाने व्यथांची शिदोरी मला
जगुन वाटते फक्त मी मारली झक तुला काय समजायचे ते समज
तुझ्या व्यक्तिमत्त्वास एकाच मिसऱ्यात ऐकायचे जर तुला ऐक मग
अणूबॉम्बपेक्षा तु आहेस घातक तुला काय समजायचे ते समज
उभा राहतो एकटा दंड ठोकून अन्याय्य सत्तेविरोधात मी
व्यवस्थेस मी वाटतो तापदायक तुला काय समजायचे ते समज
बिचारा नि साधासरळ मी तुझ्यासारखा एक सामान्य माणूस पण
मला संत म्हणतात कोणी महाठक तुला काय समजायचे ते समज
मजल दरमजल निरनिराळ्या ठिकाणी जरी जन्मभर आपली चालली
गझल आपले फक्त अंतीम स्थानक तुला काय समजायचे ते समज
गझलकार कोणी गझलसूर्य कोणी समजतात कोणी गझलचंद्रमा
मला मानतो मी गझलचा प्रचारक तुला काय समजायचे ते समज
२.
मतला मवाळ साधा, मक्ता जहाल करतो
मी गालगाल नाही, मी गाल लाल करतो
करणार ना कधीही हुजरेगिरी कुणाची
तत्त्वांनुसार माझ्या मी वाटचाल करतो
शेरातही अनोखा बघतो मुकाबला मी
उत्तर उलात असते सानी सवाल करतो
ठेवत कधीच नाही नावे परिस्थितीला
मी वाळवंट सुद्धा बघ नैनिताल करतो
व्याख्या अमान्य आहे मजला सजिवपणाची
नसतो जिवंत तोही जो हालचाल करतो
लाखो चुका जगाच्या पोटात घेत बसतो
काळीज मी स्वतःचे इतके विशाल करतो
मतदान आमचे हे... जाते कुठे कळेना?
सत्तेत तोच येतो जो गोलमाल करतो
व्याकुळ भुकेजलेला हा चेहरा मुलांचा
दिवसा हमाल माझा रात्री दलाल करतो
नांदत असेल याही देशात लोकशाही
कोणी इथे कुणाची निंदा खुशाल करतो
मारून ऊरबडव्या फाट्यावरी जगाला
मी देखणा स्वतःचा ऐनेमहाल करतो
समजून शांत शीतल डिवचू नका कुणीही
निमिषात चंद्र त्याची भगवी मशाल करतो
३.
जीवघेणी आत दंगल काढतो
चेहऱ्यावर भाव वत्सल काढतो
पोरगी दुष्काळ बसते रंगवत
पोरगा चित्रात जंगल काढतो
कर्ज जातो फेडण्याला मी नवे
तो जुने उकरून मुद्दल काढतो
मायबापाचा असावा घाम हा
जो मला वर्गात अव्वल काढतो
शिकवतो शाळेमधे गांधीगिरी
आणि मी बाहेर चप्पल काढतो
जीवनाने दुःख केले तीव्र की
सूर मी हळुवार कोमल काढतो
भेटण्यासाठी मला मृत्यू म्हणे
नवनवी शोधून शक्कल काढतो
स्वागताला ज्यास अंथरली फुले
तो तुझ्यामाझ्यात दलदल काढतो
सेंच्युरी नसते तुझी हुकवायची
एवढ्यासाठीच सिंगल काढतो
जमिन कोरडवाहु राहू दे किती
पीक गझलेचे मुकम्मल काढतो
बेगडी खोट्या उथळ दुनियेमधे
मी स्वतःला शांत निश्चल काढतो
चंद्रमा इतका कुठे साधासरळ?
जेवढा गझलेत सिंपल काढतो!
........................…...................
No comments:
Post a Comment