१.
दुनिये तुझा दिखावा होता पसंत कोठे
माझ्या घरात होतो मी शोभिवंत कोठे?
डोळ्यांमधून गेले आभास चांदण्यांचे
पाहावया तुलाही होती उसंत कोठे ?
मी एवढाच जपला होता ऋतू कुणाचा
सांगा कुणी मला तो फुलला वसंत कोठे?
माझे नभात केले मी घर अशात होते
भेटावयास आले मजला दिगंत कोठे?
सांभाळली कुणाची ही पोरकीच दुःखे
कोठे जमीन माझी अन् आसमंत कोठे?
सत्कार फार केले तुमचे तुम्हीच येथे
तुमच्यासमान होतो मी जातिवंत कोठे?
अस्तित्व शोधले पण ना भेटलो मला मी
तू भास फक्त माझा मी मूर्तिमंत कोठे?
२.
लांघली तुझी मी परिसीमा घुटमळलो परिघावरती
मोक्ष थांबला येऊन तुझ्या हा पिंपळ पानावरती
निघतेस कधी सांज सकाळी माळून उन्हे केसांवर
सडा सांडतो गंध केशरी जाताना वळणावरती
विखरून तुझ्या नकोस जाऊ केस बटा या वाटेवर
भिरभिरेल फुलपाखरू कुणी जाताना मागावरती
मिठीत येता येता लाली पसरत गेली सांज नभी
रंग तुझ्या हा प्रेमाचा चढला माझ्या क्षितिजावरती
नकोस देऊ बहर मनाचा कहर गुलाबी ओठांचा
दोष निलामी स्वप्नांचा बघ येईल काजळावरती
शिवलेस तुझ्या डोळ्यांनी मज शिव ओलांडून मनाची
अर्धउणा हा स्पर्श मागतो स्पर्श तुझ्या ओठावरती
उधाणला हा वारा भिरभिर दरवळते ही आज हवा
स्वप्न एक तू डोळे मिटुनी ठेव जरा खांद्यावरती
३.
तुला खोटे ठरवण्याचा विषय केला नाही
कधी खोटे लपवण्याचा विषय केला नाही
तुझ्या डोळ्यातल्या डोहात बुडतच गेलो पण
तरंगे मी उठवण्याचा विषय केला नाही
पसरली सांजलाली या नभावर नकळत ती
दिशेला मी भुलवण्याचा विषय केला नाही
कुणापुढती कधी झुकलो न आहे मी येथे
कुणालाही झुकवण्याचा विषय केला नाही
जळत आहे निखारा तर जळू दे हृदयी तू
मलाही मी विझवण्याचा विषय केला नाही
तुझा उल्लेखही होणार नाही यानंतर
तुला केवळ हरवण्याचा विषय केला नाही
पुरासोबत तुझ्या घेऊन जा मज कोठेही
तुझे पाणी वळवण्याचा विषय केला नाही
तुझ्यापुढती उभा आहे तुझ्या करुणेसाठी
उगा आशिष मिरवण्याचा विषय केला नाही.
.............................................
No comments:
Post a Comment