१.
पाण्याशिवाय त्याला मासा दिसायचा
दुनियेस एक शायर वेडा दिसायचा
महिनाअखेर केवळ हप्ता बघायचो
गरजे, तुझा उपाशी जथ्था दिसायचा
आयुष्य सावलीच्या शोधात जायचे
झाडासही उन्हाचा पाला दिसायचा
बापास ओळखेना शहरात लेकही
अंगावरील सदरा मळका दिसायचा
भाकर म्हणून पदवी दुरडीत ठेवली
मेंदूवरी भुकेचा ताबा दिसायचा
बाभूळ कापताना करवत रडायची
फांदीवरी पिलांचा खोपा दिसायचा
इतक्यामुळेच डोळस अंधात राहिला
होताच क्षीण दृष्टी रस्ता दिसायचा
२.
सांत्वना मिळते निरंतर आसरा नाही मिळत
जन्मभर देहास गळका कोपरा नाही मिळत
चलबिचल चालून आली कास्तकाराच्या घरी
बैल आहे मोकळा पण कासरा नाही मिळत
नाव गडबडली अचानक जीवनाची त्या तिथे
भरवसा होता जिथे की 'भोवरा नाही मिळत !'
आळवत बसलीस आजी तू युगाला कोणत्या
ऐकतो आहे कधीचा अंतरा नाही मिळत
वेदना शोधायच्या असतील तर हृदयात बघ
चेहऱ्यावर एकही माझ्या चरा नाही मिळत
अंथरुण पाहून पसरावेत पोरा पाय तू
सालदाराच्या मुलाला अप्सरा नाही मिळत
३.
जात आहे कोरडा, खेचून बांधा
नापिकीच्या दावणीला जून बांधा
होरपळ होईल देहाची तिच्याही
सावलीच्या शेपटीला ऊन बांधा
काय कामाचे पुरोगामित्व असले
'लेक सोडा अन् रुढीला सून बांधा '
सर्वकाही आपल्या हातात नसते
खूणगाठी फार सांभाळून बांधा
सांगते म्हातारपण झाडास गोष्टी
एक झोका त्यास आवर्जून बांधा
.….........................................
अश्विन मोरे
मो.9307085550
No comments:
Post a Comment