१.
गझलकारांसाठी धर्मग्रंथ ठरावा असे पुस्तक !
.
नुकताच श्रीकृष्ण राऊत यांचा 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हा मोलाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. गझल या काव्यप्रकाराविषयी ऐतिहासिक, मूलभूत आणि शास्त्रीय माहिती सप्रमाण देणारा हा अलीकडच्या काळातला एकमेव ग्रंथ असावा असे वाटते. हा ग्रंथ चाळताना मलाही माझे अडाणीपण तीव्रतेने जाणवले.
- श्रीकांत देशमुख, नांदेड
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी
२.
मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन
.
मित्रहो,
गझलेच्या आकृतिबंधाची सांगोपांग चर्चा करणारे पुस्तक सुरेश भटांना लिहायचे होते. या संदर्भात आमची अनेकदा चर्चाही झाली होती. 'गझलनामा' असे त्या पुस्तकाचे शीर्षकही त्यांनी निश्चित केले होते. पण महाराष्ट्रभर भटकंती,दररोजचा पत्रव्यवहार, गझल लेखन, येणारे-जाणारे मित्र-गझलकार, साप्ताहिकाचा व्याप, विविध वर्तमानपत्रे व मासिकांसाठी लिखाण या सगळ्या धबडग्यात तब्येतीकडे हवे तसे लक्ष न दिल्यामुळे पुस्तक लिहिण्याएवढी सवड आयुष्याने त्यांना दिली नाही. तो ड्रिमप्रोजेक्ट पूर्ण करण्याचे काम नियतीने मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत याचेकडून करवून घेतले. पुसदच्या संमेलनात दि. १७ ऑगस्ट २५ ला नुकताच प्रकाशित झालेला 'गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र' हाच श्रीकृष्ण राऊत याचा तो ग्रंथ होय.
मराठीमध्ये छंद:शास्त्राच्या उपयोजनाच्या अंगाने सांगोपांग व सुस्पष्ट असे लेखन आजवर क्वचितच झाले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात (सन १९२७) डॉ. माधवराव पटवर्धन (कविवर्य माधव जुलियन) यांनी प्रथमच 'छंदोरचना' हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली. त्यामुळे गझल या प्रकाराचा परिचय मराठीत करून देण्याचे श्रेय डॉ. माधवराव पटवर्धन यांना जाते. नंतर कविवर्य सुरेश भट यांनी या प्रकाराला नवे व्याकरण, नवी अभिव्यक्ती आणि लोकमान्यता दिली. मात्र, त्यांनी अपेक्षित स्वरूपातील उपयोजित छंद:शास्त्र प्रत्यक्षात उभे करू शकले नाहीत. त्याची कमी 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' या श्रीकृष्णाच्या ग्रंथाचे भरून काढली आहे.
या ग्रंथात कुठेही अवघड किंवा किचकट शास्त्रीय मांडणी नाही. सोप्या, सरळ आणि सुस्पष्ट भाषेत गझलेच्या अंतरंगाबरोबरच बहिर्रंगाचे विवेचन करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे मूल्य अधिकच वाढते. पूर्वसूरींचा मान ठेवूनही श्रीकृष्ण राऊत याचा हा ग्रंथ समकालीन गझलकारांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.
- गझलगंधर्व सुधाकर कदम, पुणे
३.
गझलविषयक संशोधनात्मक ग्रंथसंपदेत मोलाची भर
.
गझलविश्वातील आपल्या सुमारे पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ मुशाफिरीचा अनुभव पणाला लावून मित्रवर्य श्रीकृष्ण राऊत यांनी सिद्ध केलेला हा ग्रंथ म्हणजे गझलेच्या तांत्रिक आणि मांत्रिक अंगातील बारकावे सुबोध भाषेत मांडणारा एक मौलिक दस्तऐवज आहे. नव्याने गझल किंवा छंदोबद्ध कविता अवगत करू इच्छिणाऱ्या नवोदित कवींपासून ते गझल विश्वात काही संशोधनात्मक, समीक्षात्मक लिखाण करू इच्छिणाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच उपयुक्त ठरेल असा हा ग्रंथ आहे.
'स्वयं प्रकाशन'चे शुभानन चिंचकर प्रकाशन विश्वात आजच्या घडीला बऱ्यापैकी स्थिरसावर झालेले एक नाव. स्वतः कवी, गझलकार असल्यामुळे व्याकरण विषयक काटेकोरपणा शुभानन अचूकपणे पाळतोच पण निर्मिती मूल्येसुद्धा उच्च दर्जाची असतील याची दक्षता घेतो.
एकंदरीतच 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' ह्या ग्रंथाच्या रूपाने गझलविषयक ग्रंथसंपदेत एक मोलाची भर घातलेली आहे हे निश्चित.
- शाहीर सुरेशकुमार वैराळकर. पुणे
४ .
मराठी भाषेत छंद:शास्त्राचे नेमके स्वरूप उलगडणारा ग्रंथ
.
मराठी गझलेचे व्याकरण समजावून सांगणारा, मराठी भाषेत छंद:शास्त्राचे नेमके स्वरूप उलगडणारा आणि एकाचवेळी प्रात्यक्षिकांसह विश्लेषण करणारा ग्रंथ नव्याने लिहिला जावा, ही काळाची गरज होती. ते कार्य आपल्या संशोधनाधारित सिद्धहस्त लेखणीतून पूर्ण झाले याचा आनंद वाटतो. गझल लेखनाच्या तांत्रिक बाबी, त्यातील वृत्तविचार, काव्यमूल्य समजून घेण्यासाठी व शंका-कुशंकांचे निरसन करण्यासाठी 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
- प्रा.डॉ. विनोद देवरकर
५.
ह्या ग्रंथाचं काम करणं हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.
.
श्रीकृष्ण राऊत सरांसोबत ह्या ग्रंथाचं काम करणं हा एक समृद्ध करणारा अनुभव होता. गझलेची आवड असणाऱ्या, गझल शिकू इच्छिणाऱ्या, लिहिणाऱ्या, गझलेचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे .
-- शुभानन चिंचकर, स्वयं प्रकाशन,सासवड - पुणे
६.
गझलसम्राट सुरेश भटांच्या 'गझलनामा' लिहिण्याचे मनातील अपुरे स्वप्न आपण प्रत्यक्षात आणलेत.
.
आदरणीय डॉ. राऊत सर,
सस्नेह नमस्कार.
'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हा आपला सर्वांगीण अभ्यासपूर्ण मौलिक ग्रंथ आत्ताच रजि. पोस्टाने मिळाला. ग्रंथ वरवर चाळता तो ज्येष्ठ व नवोदित गझलकारांना मराठी गझलेसंबंधीचा संभ्रम व गैरसमज दूर करण्यात निश्चितच महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक ठरेल असा झाला आहे. हे आपल्या कष्टप्रद व वेळखाऊ दीर्घ परिश्रमाचे मराठी गझलविश्वावरील ऐतिहासिक मूल्यप्रधान ऋण मानावे लागेल. गझलसम्राट सुरेश भटांच्या 'गझलनामा' लिहिण्याचे मनातील अपुरे स्वप्न आपण प्रत्यक्षात आणलेत, याबद्दल हार्दिक अभिनंदन! मराठी गझलेबाबतची आपली तळमळ व प्रदीर्घ गझलकार्य यांस माझा मन:पूर्वक सलाम!
- अशोक म. वाडकर, कोल्हापूर
७.
गझलेचे सुंदर विवेचन करणारा ग्रंथराज
.
ज्येष्ठ, जाणते गझलकार आदरणीय श्रीकृष्ण राऊत यांचा 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' हा गझलेची इत्थंभूत माहिती देणारा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे.
राऊत सरांनी गझलेच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. 'गझलकार सीमोल्लंघन' या गझलेला वाहिलेल्या ऑनलाइन वार्षिक अंकाचे ते संपादक आहेत.
या ग्रंथाला आद्य मराठी गझलसंशोधक डाॅ.अविनाश सांगोलेकर यांची प्रस्तावना आणि 'गझलरंग'चे अध्यक्ष श्री. सुरेशकुमार वैराळकर यांची पाठराखण आहे. गझल हा काव्यप्रकार प्रत्येक कवीच्या मनाला भुरळ घालणारा. पण गझलेचे तंत्र माहीत नसल्यामुळे गझल लिहिता येत नाही अशी अनेक जिज्ञासूंची अवस्था.
या ग्रंथात गझलेचे पूर्ण स्वरूप उलगडून दाखविले आहे.
मराठी गझलेच्या पूर्वसूरींविषयी विस्तृतपणे लिहिले आहे. १९१९ मध्ये माधव ज्युलियन यांनी पहिली मराठी गझल लिहिली असे नमूद करून 'गज्जलांजलि' चा परिचय करुन दिला आहे. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट यांच्या गझलांविषयी लिहिले आहे.
मतला, काफिया, स्थिर अक्षर, अलामत, रदीफ, गझलेची जमीन, शेर, मक्ता याची खूप चांगली ओळख करून देत गझलेतील सर्व बारकावे सांगितले आहेत. गझलेचे प्रकार सांगून वृत्तांची माहिती उदाहरणांसह दिली आहे.
गझलेचा संपूर्ण इतिहास, मराठीच नव्हे तर उर्दू गझलेची-गझलकारांची विस्तृत माहिती उदाहरणांसह दिली आहे. गझलेचे व्याकरण खूप सोपे करून सांगितले आहे.
प्रत्येक गझलप्रेमी, गझलकार आणि गझलेच्या अभ्यासकाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे. मराठी व उर्दू गझलेची माहिती देणारा अतिशय उपयोगी ग्रंथ आहे. गझलेची समग्र माहिती हवी असेल तर 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र ' हा ग्रंथ वाचायलाच हवा. संदर्भग्रंथ म्हणूनही विद्यापीठात याची निवड निश्चितच होईल आणि ती गझलच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरेल! हा ग्रंथ 'स्वयं प्रकाशना'ची उत्कृष्ट पुस्तक निर्मिती आहे.
- प्रभा सोनवणे, पुणे
८.
अखंड गझलसेवेचा आणि सखोल अभ्यासाचा परिपाक म्हणजे हा अनमोल ग्रंथ
.
आदरणीय श्रीकृष्ण राऊत सरांच्या अखंड गझलसेवेचा आणि सखोल अभ्यासाचा परिपाक म्हणजे हा अनमोल ग्रंथ 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' प्रत्येक गझलकाराने, साहित्यिकाने अभ्यासावा, संग्रही ठेवावा असा हा अमूल्य साहित्य ठेवा नुकताच प्रकाशित होऊन हाती आला. सर जोवर गझल आहे तोवर आपला हा ग्रंथ सर्वांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
हा ग्रंथ हाती आला आणि एका अलौकिक आनंदाची अनुभूती आली.
- अनिल पाटील , जळगाव खानदेश
९.
रसिक, अभ्यासक व सर्वांनाच उपयोगी पडेल असे हे सुबोध भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.
.
गझलअमृताचे रोपटे या माय मराठीच्या मातीत रुजण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे वरील मान्यवरांचे शेर पाहिल्यानंतर गझलेसाठी तन, मन, धनाने प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांपुढे नतमस्तक झाल्याशिवाय आपण राहत नाही. या तळमळीतूनच आदरणीय डॉ. श्रीकृष्ण राऊत सर यांनी 'गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र' या मराठी गझलेचे व्याकरण असलेल्या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
गझलेच्या संदर्भात नवोदित, जाणकार, रसिक, अभ्यासक व सर्वांनाच उपयोगी पडेल असे हे सुबोध भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. आदरणीय सुरेश भट यांना हे काम करायचे होते असे आदरणीय सुधाकर कदम यांच्या लेखनातून आपणाला जाणवले आहे. हे त्यांचे अपुरे राहिलेले काम एका परीने श्रीकृष्ण राऊत सरांनी केले आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्यांचा दांडगा व्यासंग, अभ्यास, परिश्रम या सर्व गोष्टी पणाला लागलेल्या दिसून येतात. त्यातूनच या सुंदर पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पीएच्. डीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणारे असे आहे.
या पुस्तकाच्या निमित्ताने आदरणीय राऊत सरांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्याकडे मुद्रित शोधण्याचे काम सोपवले. त्याला मी माझ्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गझलेच्या क्षेत्रात या पुस्तकाचे मूल्य निश्चितच श्रेष्ठ असणार आहे. आपल्या संग्रही असावे असे देखणे बाह्यांग व अंतरंग असणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाची पाठराखण आदरणीय सुरेशकुमार वैराळकर यांनी केली आहे. आद्य गझलसंशोधक डॉ. अविनाश सांगोलेकर सर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तसेच दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेले शुभानन चिंचकर यांनी त्यांच्या 'स्वयं' प्रकाशनाने काढलेले हे पुस्तक आहे.
- भागवत उर्फ बाळू घेवारे, धाराशिव
१०.
मराठी गझल क्षेत्रातील हे एक ऐतिहासिक काम आहे.
.
गेले दशक गझल निर्मितीसाठी समृद्धीचे, भरभराटीचे ठरले आहे.
या दशकात गुणात्मक गझल लिहिली गेली. महाराष्ट्रातील शहर-गावातून मोठ्या संख्येने गझलकार लिहिते झाले. अशावेळी गझलकारांतील संभ्रम दूर करून त्यांना ठोस मार्गदर्शन करणारा गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र हा ग्रंथ ज्येष्ठ गझलकार, समीक्षक आदरणीय श्रीकृष्ण राऊत यांनी मराठी गझल विश्वाच्या स्वाधीन केला आहे. मराठी गझल क्षेत्रातील हे एक ऐतिहासिक काम आहे. हे साक्षात गझलेचे ईश्वर सुरेश भट यांनी पाहिलेले स्वप्न आहे. या ग्रंथाचे निर्माते एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणून गझल विश्वात सर्वज्ञात आहेत. म्हणून या ग्रंथामागे अनेक दशकाचे चिंतन, अभ्यास आहे. डाॅ. माधवराव पटवर्धन यांनी सर्व प्रथम 'छंदोरचना' हा ग्रंथ लिहून मराठीला छंद:शास्त्राची भक्कम परंपरा दिली. या ग्रंथ निर्मितीने आदरणीय श्रीकृष्ण राऊत यांनी ही परंपरा बळकट केली आहे. या ग्रंथात गझल लेखनातील वृत्त, वृत्तामधील यतिस्थान, वृत्तातील लवचिकता, काफियाचे दोष, काफियाची पुनरावृत्ती, मात्रावृत्ते, स्वरकाफिया याविषयीच्या बारकाव्याचे विवेचन बोजड होणार नाही याची काळजी घेतली आहे. गझलेच्या तंत्रा-मंत्राच्या संदर्भात जुन्या-नव्या गझलकारांच्या अनेक शंका आहेत. अनेक प्रश्न आहेत. या सर्वांचे निरसन करणारा हा ग्रंथ आहे.
ह्या मौलिक ग्रंथ निर्मिती बद्दल मी आदरणीय श्रीकृष्ण राऊत यांचे गझल विश्वाच्या वतीने आभार व्यक्त करतो. हा सुंदर ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल स्वयं प्रकाशनचेही अभिनंदन केले पाहिजे.
- श्रीराम गिरी, बीड
११.
गझला वाचताना ह्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही गझलेत खूप खोल उतरून आनंद घेता येणार आहे.
.
सर, मला ग्रंथ मिळालेला आहे. हा ग्रंथ एकाच बैठकीत वाचता (माझ्यापुरते बोलतोय) येणारा नाही. त्यात मांडलेले बारकावे, संदर्भ, मौल्यवान माहिती हे सर्व अभ्यासताना जो काही आनंद मिळतोय आणि अनुभव येतोय …हे शब्दात मांडणे माझ्यासाठी कठीण आहे. आपले मनःपूर्वक आभार, आपण ह्या ग्रंथाची निर्मिती केली आहे यासाठी. मला गझल सुचेल की नाही, लिहिता येईल की नाही…हे माझ्यासाठी तेवढे महत्त्वाचे नाही. जेवढे (नंतर) इतरांच्या गझला वाचताना ह्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही गझलेत खूप खोल उतरून आनंद घेता येणार आहे.
- डॉ. शशिकांत गंगावणे, मुंबई
..........................................

No comments:
Post a Comment