१.
श्वास त्यांचे थांबलेले
काळजीने गोठलेले
काय मागू विठ्ठलाला
हात त्याचे बांधलेले
सोडना हे देह-वेढे
कापराने सांधलेले
मोजके बोलू कसे मी
बोल त्यांनी लावलेले
चाललो मी वाट ज्यांचे
मार्ग त्यांनी दावलेले
मोजले नाही कधीही
अंतरी जे चाललेले
२.
असतो सदैव तत्पर मागावरी स्वतःच्या
देऊ कशी मनाची मी खातरी स्वतःच्या
भेदून काळजाला करतात रोज जखमा
लावून घे मुलामा शब्दांवरी स्वतःच्या
येताच आठवांचे अंतस्थ स्वर गळ्याशी
रचतो अभंग, गातो गावावरी स्वतःच्या
रक्तात विष मिसळले अन् हाव श्रेष्ठ झाली
बेभान वार केला भावावरी स्वतःच्या
चौफेर का उधळतो अंगात भरुन वारे
जाणून वाग सीमा आतातरी स्वतःच्या
चिंता करू कशाला काळीज जाळणारी
लावू सुखास कैसी मी कातरी स्वतःच्या
माझ्याच पावलांचा काढून माग त्यांनी
ती पायवाट केली नावावरी स्वतःच्या
३.
गेला निघून वारा घेऊन गंध सारे
ठेवून डोह मागे डोळ्यांत फक्त खारे
स्पर्शून दूर गेले नात्यांतले किनारे
उरलेत आज केवळ धूसर स्मृतीपसारे
ही रानभूल आहे की हा विराण चकवा
ओलांडुनी मनाला का चाललेत वारे
अंबर सुन्या मनाचे झाले ढगाळ काळे
चमकुन भुलावणारे गेले कुठे सितारे
गोठून आर्त गहिरे हितगूज काळजाशी
त्या सावळ्या भुलीचे उठती किती शहारे
...........…................................
तीनही गझला फार सुंदर.. नादमधुर ✨💜
ReplyDelete