गझलेचे उपयोजित छंद:शास्त्र : मुखपृष्ठाविषयी : सतीश पिंपळे



लहानपणापासूनच मला 'मुळाशी'  जाण्याची किंवा 'खोलवर विचार' करण्याची सवयच लागली. आई कधी कधी म्हणी वापरत असे 'याचं म्हणजे कांहीही सांगा, पालथ्या घड्यावर पाणी' माझ्या मित्राची आई तिच्या मुलासाठी म्हणजे माझ्या मित्रासाठी हा शब्दप्रयोग नेहमीच करायची. 'याला तं चार माराव्यात अन् एक मोजावं.' मग मी विचार करीत असे.... हे काय असेल ? कधी कधी मोठ्यांना विचारीत असे. कधी योग्य उत्तर यायचं, तर कधी कधी "अरे तुला काय करायच्या नस्त्या चौकशा...?" असा उलटवार यायचा. पण त्याचा उपयोग असा झाला की एखाद्या विषयाचा सर्वांगीण विचार करायची सवयच लागली. विविधांगाने तो तो विषय वेगळाच भासायचा. त्या 'विषयांच्या त्रिमितीचे' चित्रण होताना कागदाच्या किंवा कॅनव्हासच्या 'द्विमितीला'  एक नवा 'आयाम' मिळायचा. पर्यायाने न्याय मिळाल्यासारखं वाटायचं आणि ते चित्र रासिकांसमोर गेलं की ते म्ह‌णायचे, "आम्ही या अँगलने कधी विचारच केला नव्हता." 

मग रासिक मूक होऊन 'चित्र संभाषणात' रममाण व्हायचे तर मी 'रिक्त झाल्याच्या आनंदात.'


.....हं....तर सांगायचा मुद्दा असा की अनेक महिन्यांपासून माझ्या मनाच्या प्रांगणात श्रीकृष्ण राऊत सरांनी (मी त्यांना 'किसना' म्हणतो) एका विषयाच्या बिया, टाकून दिल्या होत्या. म्हणाले, "सतीश, मी एक छंद:शास्त्रावर पुस्तक लिहितोय. बरंचसं होत आलंय. कांही महिन्यांनंतर प्रकाशनाच्या वाटेवर येईल. तुला मुखपृष्ठ करायचंय."  झालं... विचार अंकुरले, बीजांनी मुळं धरायला सुरुवात झाली. ते पुन्हा खोलात शिरणे आले. वेगवेगळ्या गीत आणि गझलांचे श्रवण तर नेहमीच सुरू असते. कवी, संगीतकार, गीतकार, साहित्यिक, चित्रकार आणि गझलकार मित्रांशीही गप्पाही होतच असतात. मग गझलेचा अन् मानवी मनाचा तरल संबंध कसा असेल? गझल पेश करणारे काय करीत असतील?  गायक कसा बघत असेल गझलेकडे? संगीतकार बारकाईने बघत असतील का गझलेतील शेरांकडे?  मैफिलीतील संगीत साथीदारांना यातील लय तर कळतच असेल पण भाव किंवा आशयाकडे ते कसे पाहात असतील? असे एक ना दोन अनेक प्रश्न उद्‌भवले. मुख्य म्हणजे जो 'शायर' आहे त्याच्या मनात नेमके किती वादळ असेल ? एक तर मनच संवेदनशील, त्यात अधिकच हळूवार !! जगातील असंख्य भल्याबुऱ्या घटनांनी न्हाऊन निघालेले किंवा जखमी झालेल्या मनानी 'गझल लिहायला सुरुवात करायची' म्हणजे केवढं दिव्य काम...! प्रसव वेदना किती?

ती गझल, रचना, कलाकृती, सुजाण रसिकांसमोर पेश करायची म्हणजे प्रचंड ताकद एकवटावी लागते. शिवाय नुसत्याच भावना पोहचवून होत नाही तर त्यात लिखाणाच्या सुरुवातीपासून लागू होणारे 'नियम' ती शास्त्रबद्ध होऊन 'सजण्या' पर्यंतचे सर्व 'निकष' लावून 'शुद्ध' स्वरुपात सादर करावी लागते. तसं पाहिलं तर समोर जनसमुदायच असतो, वाचणारा माणूसच असतो. गाणारा गायक, पेश करणारा गझलकार म्हणजे देखील एक व्यक्तीच असते. पण या संपूर्ण समुदायाचं खास असं एक वातावरण तयार झालेले असतं. आता तो फक्त सभेतील संवेदनशील रसिक नसतो तर या सर्वांचं मिळून एक आगळं वेगळं 'रसायन' झालेलं असतं. खास वातावरण तयार झालेलं असतं. 'गझलकार आणि रासिक' कुठल्या तरी अदृश्य पण अनामिक ओढीने 'बांधल्या' जातात. 


मैफिलीतल्या साध्या साध्या शब्दांना सुद्धा गहन अर्थ प्राप्त झालेला असतो. अनेकांगांनी तो प्रकाशमान होतो. त्याची किरणे सर्वांच्याच हृद‌यांना समान झंकारीत असतात. असा हा मुशायऱ्याचा खास प्रवास पार करताना या दिव्य वातावरणातील सर्वांनाच 'गझलेच्या खोलवर मुळाशी' जाऊन अभ्यास करावा लागतो. ते सर्व नियम, भाषा, व्याकरण, तांत्रिक बाबी, रचनेतील मूळ 'मर्म' न गमावता प्रकाशमान करावे लागते. पूर्वीपासूनच मुशायऱ्याची सुरुवात 'एखादी मेणबत्ती' पेटवून करण्याची प्रथा आहे. तो दिव्य प्रकाश उराशी घेऊन हे सर्व 'जडजवाहिर'  सहजतेने कागदावरून असंख्य हृद‌यांपर्यंत पोहचवताना आजू‌बाजूला असंख्य कागदाचे बोळे पडलेले असतात. त्यात तावून सुलाखून 'निघणारे शेर आणि भावना' असतात.

असा हा किमती ऐवज मुखपृष्ठावर घेताना मी 'गझल-बनातून' तर जातच होतो मात्र मला न खरचटता त्यातील सुगंध, सौंदर्य आणि लावण्य मी टीपायचा प्रयत्न केला. कागदावर उतरवल्यानंतर मी शायर नसताना सुद्धा एक 'दृक्-गझल' पेश केल्याचं समाधान मिळालं. आपणा सर्व रासिकांना ते भावलं आणि मी भरून पावलो.....!!


सतीश पिंपळे, 9850199323

Satishakola@gmail.com.


*ताजा कलम* - या सर्व प्रकारात मला श्रीकृष्ण राऊत सरांचे कौतुक यासाठी करावेसे वाटते की ते चित्रकारांना पण प्रेरीत करतात. चित्र काढणे हा तर माझा प्राण आहेच, ते मला 'लिहितंही' करतात. हे कसब फार कमी लोकांकडे आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी जी चर्चा होते ती अफलातून असते. आपल्याच कलाकृती नव्या आयामांनी उजळून निघतात आणि सर्वत्र आनंदी आनंद!

.............................................

No comments:

Post a Comment