नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मराठी गझल आता स्थिरावली आहे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, अनियतकालिके, दिवाळी अंक, आदिमध्ये मराठी गझलेला सन्मानाचे स्थान मिळते आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. सोळा वर्षांपूर्वी ब्लॉग स्वरुपात सुरू झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन' या वार्षिकांकात सहभाग नोंदविणाऱ्या गझलकारांची संख्या वाढतच आहे. मराठी गझल जनमानसात रुजावी म्हणून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अनेक संस्था, मुशायरे आयोजक, गझलेची कार्यशाळा घेणारे अनेक अभ्यासक, व्हाट्सअपच्या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदींचा एकत्रित परिणाम म्हणजे मराठी गझल लिहिणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. याचे श्रेय निश्चितपणे या सर्वांना जाते. 'गझलकार' सीमोल्लंघन ह्या ऑनलाइन अंकाचे हे सतरावे वर्ष. २०२५ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हा अंक प्रकाशित करताना आनंद होतो आहे. महाराष्ट्र आणि इतरही राज्यांना या वर्षी नैसर्गिक आपदेने हवालदिल करून सोडले आहे. आपदग्रस्तांच्या सोबत आपल्या सर्वांच्या संवेदना आहेतच. असे असूनही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गझलकार, अभ्यासकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकूण २१३ गझलकारांच्या गझला आणि २४ गझलविषयक लेख या अंकात समाविष्ट केले आहेत. गझलेच्या अवकाशात स्वच्छंदपणे विहरणाऱ्यांपैकी काही पक्षी आपल्याला सोडून गेलेत. त्यांचीही नोंद 'श्रद्धांजली' या सदरात घेतली आहे. नेहमीप्रमाणेच महिला गझलकारांची संख्या पुरुष गझलकारांच्या तुलनेत अधिक आहे. प्राप्त झालेल्या गझलांपैकी निवडक गझला या अंकात प्रकाशित केल्या आहेत. त्यांचा आस्वाद घ्यावा, प्रतिक्रिया द्याव्यात.
गझल ही मानवी संवेदनांशी संवाद साधण्याची कला आहे. जो संवाद घडवतो तो आशय. वृत्त ही केवळ तांत्रिक चौकट आहे. गझल म्हटली की वृत्त, काफिया, रदीफ यांची शास्त्रशुद्ध मांडणीतून अभिव्यक्त होऊन काळजाला हात घालणारी भावना असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. शब्दांची वृत्तबद्ध मांडणीच या काव्यप्रकाराला अधिक लयबद्ध करते. ही लयबद्धता कवीला सादरीकरणात आणि रसिकाला स्मरणात राहायला मदत करते. त्यामुळेच की काय गझल हा आजच्या काळातील लोकप्रिय काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो आहे.
गझलेचा उगम उर्दू-फारसी साहित्यपरंपरेत जरी झाला, तरी मराठीत तिने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. यासाठी खडतर प्रवास करताना माधवराव पटवर्धनांपासून आजच्या पिढीपर्यंत अनेक स्थित्यंतरे तिने बघितली आहेत. गझलेच्या तंत्रशुद्ध साचेबद्ध आणि वृत्तबद्ध मांडणीमुळे ती कवीलाही सहजसाध्य झाली नाही. अनेकांना प्रयत्न करूनही जमली नाही. त्यामुळेच ‘किती अचूक वृत्तात गझल लिहिली आहे’ यावरून कवीचा दर्जा ठरायचा. त्याचा परिणाम असा झाला की, जो तो शब्दांना फक्त तंत्रशुद्ध चौकटीत बसवायला लागला. या साचेबद्ध लिखाणालाच गझल म्हणू लागला. परंतु जसजसा मराठी गझलेचा प्रवास पुढे गेला, तसतसे लक्षात येऊ लागले की तंत्र ही तर फक्त चौकट आहे. गझलेचा खरा आत्मा तिच्या आशयात आहे. गझलेच्या वृत्तातील शब्दांच्या मात्रांची नियंत्रित संख्या आणि त्यांची पुनरावृत्ती यामुळे काव्याला लयबद्धता प्रदान केली जाते. त्यामुळे त्यामध्ये नाद निर्माण होऊन संगीतात्मकता येते. रसिक, श्रोत्यांना गेयता, नादमाधुर्य आकर्षित करते, तसेच स्मरणातही राहते. पण त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, फक्त शब्दांना वृत्ताच्या साच्यात घातले म्हणजे गझल होत नाही. तर त्यातील आशयघनता रसिकाला बांधून ठेवते. वृत्तबद्धता गझलेच्या शिस्तीला निश्चितच बळकटी देते. पण ही शिस्त म्हणजे गझलेचा आत्मा नाही. एखादे गाणे कितीही सुंदर स्वरात असले तरी त्यात भाव नसतील, तर ते मनाला भिडत नाही. त्याचप्रमाणे गझल कितीही वृत्तबद्ध असली तरी तिचा आशय बोथट असेल, तर ती रसिकाच्या मनाला स्पर्श करत नाही. म्हणजेच गझलेचा आत्मा हा तिच्या आशयात आहे. आशय म्हणजे कवीने अनुभवलेले जीवन, त्याचे विचार, त्याचे भावविश्व, त्याची तत्त्वदृष्टी. जेव्हा गझलेत मानवी जीवनातील गुंतागुंत, समाजातील घडामोडी, निसर्गातील सौंदर्य, प्रेम-आर्तता, किंवा काळाच्या वेदना मांडल्या जातात, तेव्हा ती गझल वाचकाच्या काळजाला भिडते. आशयघन गझल म्हणजे शब्दांच्या केवळ सजावटीचा खेळ नव्हे, तर आर्त भावनांचा गहिरा अनुभव असतो. जेंव्हा गझलेच्या शेराशेरात वाचकाला स्वतःचे जीवनानुभव प्रतिबिंबित होताना दिसतात तेंव्हाच ती त्याला जवळची वाटू लागते. अशाच गझला, त्यातील शेर त्यांच्यातील मर्मस्पर्शी मूल्यांमुळे कालजयी होतात.
सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त ‘शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा’ असे लिहिले आहे. म्हणजेच ज्या वृत्तात शब्दरचनेच्या अंगाने सहजता आहे अशी अक्षरगणवृत्ते गझलेसाठी निवडली पाहिजेत असा संकेत दिला आहे. म्हणून त्यांनी मात्रावृत्तांत लेखन केले नाही, असे नाही. पण फार थोडक्या गझलांमध्ये त्यांनी मात्रावृत्ते वापरलीत. शब्दरचनेतील लयबद्धता आणि आशयघनता ज्या वृत्तांतून सहज मांडता येईल अशी वृत्ते निवडली पाहिजेत, ही त्यांची भावना होती. आजमितीला मराठीतील गझललेखनाची प्रवृत्ती मात्र आशयअभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तांकडून मात्रावृत्तांकडे वळताना दिसत आहे. यामुळे मराठी गझल आशयघन होत आहे, हे मान्य. परंतु गद्यप्राय मांडणीमुळे त्यातील गेयता, नादमाधुर्य हरवत चालले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.
ज्या कवींना गझलेचे तंत्र कळले, ते अनेक वृत्तांत गझला लिहिता लिहिता, गझला पाडू लागले आहेत. गझल हजारी साजरी करू लागले आहेत. परंतु खेदाने नमूद करावे वाटते की, हे महाभाग वारंवार तेच काफिये, तेच रदीफ वापरून त्याच त्या रटाळ विषयांवर गझला लिहीत असतात. मान्यवरांच्या गझलसंग्रहांचे वाचन नाही. त्यावर चिंतन नाही. विविध समाजमाध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या गझला हेच त्यांचे वाचन. त्यामुळे त्यांच्या गझलेत प्रतिमांचे नाविन्य नाही. जीवनानुभूतीच्या जाणिवा नाहीत. अशा गझला आणि गझलकारांना काळ कितीवेळ लक्षात ठेवेल? या उलट ज्यांनी आपल्या गझलांतील प्रतिमा आणि जाणिवांच्या बळावर गझलेच्या प्रांतात सर्वोच्च स्थान निर्माण केले ते सुरेश भट मात्र मोजक्या वृत्तांत गझला लिहितात. त्यांनी २६३ गझलांसाठी फक्त ४० अक्षरगणवृत्ते आणि ७ मात्रा वृत्ते वापरली आहेत. त्यांच्या निम्म्या गझला केवळ ६ वृत्तांत आहेत. म्हणजेच एखाद्या वृत्तावर एकदा पकड बसली की कवीला कोणताही आशय, विषय त्या वृत्तातून मांडता येतो. काय, कसे आणि कुणासाठी लिहायचे; हे कवीला कळले की तो वाचकाच्या-रसिकांच्या मनात त्याचे स्थान निश्चित करतो.
जीवनाची बाह्य परिस्थिती काळानुसार बदलत असते. परंतु जीवनमूल्ये शतकानुशतके अपरिवर्तित राहतात. बदलत्या परिस्थितीचे, काळाचे संदर्भ, बदललेल्या संस्कृतीने दिलेल्या नव्या प्रतिमा गझलेला अधिक कालसापेक्ष बनवत असतात. त्यामुळे वृत्तातील नाविन्यापेक्षा आशयाच्या बदलत्या स्वरूपावर भर देणे समयोचित ठरते. तंत्रामुळे गझलेत लय, नाद, संगीत आणि घाटदार सौंदर्य येते, पण आशयामुळे मनाला स्पर्श करण्याची संधी मिळते. वृत्त वाचकाला केवळ सांगीतिक आनंद देते. पण आशय वाचकाला अनुभूती देतो. गझल ऐकून-वाचून झाल्यावर कदाचित शब्दांची लय एकवेळ विसरली जाऊ शकेल पण गझलेतील शेराचा भावार्थ मात्र कायम लक्षात राहतो. एखादी गझल ऐकताना लोकांना तिची वृत्तबद्ध बांधणी कितपत आठवते? प्रत्यक्षात आठवते ती भावस्पर्शी ओळ, विचार, प्रतिमा. यावरून लक्षात येते की गझलेचे दीर्घकालीन मूल्य आशयघनतेत असते. प्रत्येक काळात नवे प्रश्न, नव्या संवेदना उदयास येतात. प्रत्येक गझलकाराच्या गझलेत ते प्रतिबिंबित होणे अपेक्षित असते.
आशयघनता ओघाने येत नसते तर ती जाणीवपूर्वक आणावी लागते. वेगवेगळे विषय, संवेदना गझलेतून मांडाव्या लागतात. मराठी गझल लोकप्रिय होतेय कारण प्रत्येक कवी त्यात त्याचे योगदान देतो आहे. कुणी शहरी एकाकीपणा मांडला, कुणी ग्रामीण जीवनाचे हाल सोप्या भाषेत उलगडले, कुणी सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कुणी प्रेमाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक चिंतन गझलेत आणले, तर कुणी तंत्रज्ञानाच्या युगातील माणसाचे बदलते आयुष्य शब्दबद्ध केले. एकूणच काय तर या सार्वत्रिक प्रयत्नांनी गझलेच्या कक्षा विस्तारल्या. जर गझलकार फक्त वृत्ताच्या शिस्तीत, तंत्रातच अडकून राहिले असते, तर मराठी गझल एवढी लोकप्रिय झाली नसती.
गझल ही वृत्तबद्ध शब्दकळा नसून जीवनाशी एकरूप होणारा काव्यप्रकार आहे. वृत्त हा गझलचा देह आहे तर आशय हा तिचा हा आत्मा आहे. वाचकाला आकर्षित करणारी गझल ती आहे, जी त्याच्या भावविश्वाला स्पर्श करते. म्हणूनच मराठी गझलेत वृत्ताच्या नाविन्यापेक्षा प्रतिमांचे नाविन्य आणि आशयघनता हेच खरे महत्त्वाचे घटक ठरतात. गझलेचा खरा उद्देश हा मानवी मनाला स्पंदित करणे आहे. स्पंदन घडवणारे माध्यम म्हणजे आशय. वृत्त गझलेला आकार देते, पण प्राण ओतण्याचे काम मात्र आशयच करतो. हा आशय म्हणजे विशुद्ध कवितेतील कलेसाठी कला मांडणारी शब्दकोडी नसावी. तर माणसांचे समकालीन प्रत्यक्ष जगणे, त्याच माणसांच्या साध्या पण परंपरागत प्रतिमांकित भाषेत अभिव्यक्त करणे होय. त्यामुळे मराठी गझलेच्या प्रवासाकडे पाहिले तर ठामपणे म्हणता येते – गझलेची खरी ताकद ही तिच्या आशयघनतेत आहे, वृत्ताच्या चौकटीत नव्हे.
अकोलास्थित सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सतीश पिंपळे यांनी या वर्षीच्या अंकालाही अतिशय सुंदर, बोलके छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याने हा अंक साकार होऊ शकला, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजतागायत ‘गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.
...............................................
No comments:
Post a Comment