मराठी गझलेचे अवकाश समृद्ध करणारा 'एकपक्षी' : गिरीश शाम जोशी

 



माझे मित्र सतीश मालवे ह्यांचा 

'एक पक्षी' संग्रह प्रकाशित झाल्यापासून वाचायची खूप इच्छा आणि आतुरता होती. वाचनास सुरुवात करताच साजेसे मुखपृष्ठ दिसले. शीर्षकास अनुसरून असणाऱ्या मुखपृष्ठाने संग्रहातील आशयाची कल्पना आली आणि संग्रह वाचण्याची उत्सुकता वाढली. संग्रहातील गझल वाचताना खूप आनंद वाटला. संग्रह वाचल्यानंतर मी माझा प्रामाणिक अभिप्राय नोंदवत आहे..


मातीशी नाळ टिकवून ठेवणारा, नात्यांतील ओल जपून ठेवणारा, शोषिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा, कामगारांच्या संघर्षाची मांडणी करणारा, स्त्री जाणिवांची दखल घेणारा, गावाचा महिमा गाणारा, मैत्रीचा धागा घट्ट विणणारा, समाजातील प्रश्नांवर व्यक्त होणारा आणि स्वतःच्या पंखांवर प्रचंड विश्वास असणारा 

'एक पक्षी' आत्मविश्वासाने भरारी घेतो आणि आपल्या लेखणीच्या बलवान पंखांनी सारं अवकाश काबीज करतो. तो पक्षी म्हणजे कवी, गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे. एक तरुण तडफदार, संवेदनशील लेखन करणारा गझलकार.


तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सारं जिंकूनही घेतलं असं काहीसं सतीश मालवे ह्यांच्याबाबतीत झाले आहे. एक तरुण कवी गझलेच्या प्रेमात पडतो, तिची साधना करत करत गझल क्षेत्रात आपली छाप सोडून जातो.दर्जेदार लेखनाबरोबरच, माणूस म्हणूनही आपली प्रतिमा जपता येणे अवघड असते, पण हा समतोल सतीशजी साधताना दिसतात.


रोजच्या जीवनातील खयाल, शेरांना अनुभवाची किनार, विचारांत नाविन्य, बोलकी वाक्यरचना, साध्या शब्दांचा वापर, सोपी वाक्यरचना, इतरांच्या प्रभावात न गुंतणारी स्वतंत्र लेखनशैली, तंत्र शरण न जाता आशय संपन्नेतकडे जाणारे लेखन, सामाजिक मूल्ये जतन करणे, संस्कृती संवर्धन करणे तसेच संस्कारक्षम लेखन इत्यादी वैशिष्ट्ये सतीश मालवे ह्यांच्या गझल लेखनात प्रामुख्याने दिसून येतात.


सतीशजी ह्यांचे शेर बहूआयामी आहेत. त्यांच्या शेरांना अद्भुततेची चमक आणि अनुभवाची धार लाभली आहे.हा गझलकार सच्चा लिहितो, म्हणून त्यांचा शेर सर्वांना अच्छा वाटतो. 'एक पक्षी' संग्रह वाचत असताना गझलेत नाटकीपणा, शब्दांचा भडीमार, ओढून ताणून आणलेली काफियांची गर्दी दिसून येत नाही. या संग्रहातील शेरांची भाषा बोलकी आहे, स्पष्ट आणि मनाला भिडणारी आहे. ह्या संग्रहातील शेर सार्वभौम आहेत. जगातील लोकांच्या अनुभवाशी साधर्म्य सांगणारे लेखन ह्या संग्रहात दिसून येते. केवळ प्रश्नांवर बोट न ठेवता , थंड डोक्याने त्यावर उत्तरे शोधताना सतीशजी ह्या संग्रहाच्या माध्यमातून दिसून येतात. म्हणूनच सतीशजींची गझल सर्व सामान्यांची गझल म्हणून पुढे येते.


त्यांच्या गझलांच्या शेरात आलेल्या काही ठळक जाणिवा, वैशिष्ट्ये, प्रतिमासृष्टी ह्यांचा थोडक्यात आढावा..


१) बाप :


प्रत्येक कवी आपल्या बापावर व्यक्त होत असतो. बाप म्हणजे कवीची हळवी जागा. बापाविषयी व्यक्त होताना सतीश जी लिहितात.


'सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो

दिसतो मला निरंतर बापात एक पक्षी.'


'बाप इकडे साफ करतो शासकी मोऱ्या

आणि मुलगा आमदारासारखा फिरतो.'


२)प्रतीकांचा सुयोग्य वापर:


सतीश मालवे ह्यांच्या गझलेतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रतीकांची अचूक निवड. ह्यांच्या गझलेतील प्रतीके बोलकी असतात, समर्पक असतात आणि हटके असतात. ही प्रतीके गझलांना साज चढवताना दिसतात.याचेच एक उदाहरण,


'दशा माझ्या मनाचीही समुद्रासारखी व्हावी

मनापासून एखादी नदी भेटून गेल्यावर.'


३) संघर्ष :


सतीशजींच्या गझलेत वेळोवेळी संघर्ष दिसून येतो. सामान्य लोकांच्या जीवनात जो असतो तो संघर्ष. पोटापाण्यासाठी शहरात येऊन केलेला संघर्ष, संसार फुलवण्यासाठी केलेला संघर्ष, मनातील भावभावनांचा संघर्ष, समाजातील व्यवस्थेविरुद्ध केलेला संघर्ष इत्यादी विषयी सतीशजी गझलेतून व्यक्त होताना दिसतात.


'किती विजांशी आधी लढला होता

नंतर कोठे तो कोसळला होता.


ओझे त्याला ओझे वाटत नाही

कारण त्याने भार पेलला होता'


४) जबाबदारीची जाणीव:


सतीश मालवे ह्यांच्या गझलेत जबाबदारीची जाणीव दिसून येते. मुलगा हा नात्याने, पती ह्या नात्याने, बाप ह्या नात्याने, कामगार ह्या नात्याने, मित्र ह्या नात्याने, कवी ह्या नात्याने सतीशजी त्यांच्यासोबत साऱ्या सामान्य लोकांच्या जबाबदाऱ्या गझलेतून मांडताना दिसतात.


'फुलाप्रमाणे जगवायाची इच्छा झाली तेव्हा

का काट्यांनी चोहीकडुनी गस्त घातली आहे?'


५) आशावाद पेरणारी गझल:


सतीशजी ह्यांची गझल कमालीचा आशावाद पेरते. संकट समोर असताना हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा जिद्द, चिकाटीने त्यास सामोरे जाणारी ह्यांची विचार शैली ह्या रचनांमधून पहायला मिळते.


'पर्वतांनो आडवे येऊ नका

मार्ग माझा काढणे जमते मला'


'येईल का दऱ्यांचा अंदाज आपल्याला

या जीवनात आला जर चढउतार नाही'


'मी जरीही पायथ्याशी राहतो आहे

मी चढू शकतो तुझ्यावर डोंगरा आता.'


'येवोत कोणतेही अवघड प्रसंग आता

हत्यार मी बनवले आहे भयास माझ्या'


'कधीचे अंबराला सांगतो आहे

फुटू दे पंख..मग उडणार आहे मी'


६) वास्तवाचे भान जपणारी गझल :


सतीश मालवे ह्यांची गझल म्हणजे हवेत इमले बांधणारी गझल नव्हे, तर वास्तवाचे भान जाणणारी आहे. जे आहे ते दाखवणारी गझल सतीशजी लिहितात. विदेशात जाऊन ,बक्कळ पैसा कमावणाऱ्या आणि देशाला विसरलेल्या तरुणांना उद्देशून ते लिहितात.


'मायभूमीची कुणाला ओढ नसल्याने

प्राण तळमळतो कुणाचा सागरा आता'


स्पष्ट आणि थेट अधिकारवाणीने बोलणारी त्यांची गझल आपली वाटते.


'लख्ख आधी कर चराचर

मग स्वतःला म्हण प्रभाकर'


'काय दाखवशील तू रस्ता मला

बांधली पट्टी तुझ्या डोळ्यांवरी'


७) वेगळी शैली:


कुणाच्याही प्रभावात न येता स्वतःची वेगळी शैली सतीश ह्यांनी जपली आहे. ह्याविषयी व्यक्त होताना ते लिहितात -


'मला वेगळेपण जपू द्या स्वतःचे

नका येत जाऊ प्रभावात माझ्या'


८) अनुभवाची किनार :


सतीशजींच्या गझलेतील शेर अनुभवाची किनार घेऊन जन्मास येतात.जसे,


'एक मुलगा कामधंदा शोधतो आहे

एक मुलगा काम नसल्यासारखा फिरतो'


'शहरामधे राहूनही जपतात माणुसकी किती

शहरात गावासारखी असतात काही माणसे'


'अंधार दूर होतो सूर्या तुझ्यामुळे.. पण!

माझी पहाट झाली पाटी नि पुस्तकाने'


'तुझ्या जीवनाची कथा वाचली

तशी हुंदक्यांची गती वाढली'


९) विरोधाभासातून वास्तविकतेकडे नेणारी गझल:


सतीश मालवे ह्यांचा गझलेतील मिसरे विरोधाभास दाखवतात. त्याचवेळी वास्तविकतेचे दर्शनही घडवतात.उदाहरणासाठी खालील शेर वाचावा.


'झोपडी पाहिल्यावरी माझी

एक वाडा दुखावला होता'


सतीशजी ह्यांच्या गझलेत त्यागभावना दिसून येते. त्यातूनच प्रेरणादायी ओळी जन्मास येतात.


'मन लगोलग कुठे कमळ बनले

देह चिखलात ठेवला होता'


१०) वेगळ्या खायालांचा धनी:


सतीश ह्यांची गझल वेगळी आहे. खयालांचे वेगळेपण त्यांच्या गझलेत दिसून येते. तोच तोपणा दिसून येत नाही. हे सांगताना ते स्पष्ट करतात.


'वैशिष्ट्य या गझलचे एवढेच की

सगळे खयाल जगण्यातून घेतले'


'तुला आश्वासनांवर ठेवतो आहे

जरा समजून घे सरकार आहे मी'


११) आयुष्याला दुनियादारी शिकवणारा गझलकार:


सतीशजी आयुष्यालाच दुनियादारी शिकवतात. आयुष्याची समजूत घालताना ते लिहितात -


'जो जन्मला त्याचे मरण सुद्धा अटळ आहे

आले न कोणीही अमर होण्यास आयुष्या'


१२) व्यथा,दुःख,वेदनेचा गौरव करणारा कवी:


सतीश ह्यांचा गझलेच्या शेरांतून मानवी व्यथा, दुःख, वेदनेचा दुखवटा साजरा केला जात नाही तर ते ह्या भावनांची ओटी भरतात, त्यांचा गौरव करतात.


'पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना

वाटू कशा तुम्हाला फुकटात वेदना


दिसतो वरून अवघा मी कोरडा जरी

आतून ओल मजला देतात वेदना'


'आधी व्यथा सोसून घे बाकी बघू पुढचे पुढे

दुःखास कवटाळून घे..बाकी बघू पुढचे पुढे'


१३) गावाची ओढ, गावपण जपणारा कवी:


सतीश मालवे हे गावच्या कसदार मातीतले कवी आहेत. गावाची ओढ, गावाविषयी तळमळ, मनात हिरवे गाव जपणारा हा कवी गावाविषयी सतत व्यक्त होताना दिसतो.


'एवढे कळले तुझ्या शहरात येउन

माणसे साधीसुधी गावात होती'


'एकदा गावाकडे बोलव मला तू

हे शहर तात्काळ मी सोडून येतो'


'वऱ्हाडी बाज माझा ठेवला कायम

जरी सांगायला आहे ‘पुणेकर’ मी'


१४) मातीशी नाळ जपलेला कवी:


गझलेमुळे मान सन्मान लाभलेला, गझल क्षेत्रात नावारूपास आलेला असला तरी हा गझलकार हवेत उडत नाही तर मातीशी इमान राखतो, पाय जमिनीवर ठेवतो.


'जरी विहरतो हवेत आम्हीही पण,

जमीन अमुच्या पायाखाली आहे'


१५) स्त्री शक्तीचा गौरव करणारे शेर:


सतीश ह्यांच्या गझलेतील स्त्रीशक्तीचा गौरव होताना दिसतो -


'तिने खोचला पदर असा की

क्षणात मागे फिरले वादळ'


'उभा जन्म काट्यात गेला तरीही

फुलासारखी छान दिसतेस बाई'


'मला सर्व पाषाण समजायचे

तिने मूर्त माझ्यात साकारली'


१६) गझलेविषयी कृतज्ञता :


सतीशजी गझलेविषयी वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या गझलेचा सन्मान कसा राखता येईल ह्याकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देतात. गझलेवर त्यांचे प्रचंड प्रेम आहे.


'मी विधा जशी केली आत्मसात गझलेची

जीवनामध्ये आली चांदरात गझलेची


सोबती जरी माझ्या राहतोस अंधारा

तेवते मनामध्ये प्राणवात गझलेची'


'लेकरागत मी तिला बिलगून बसतो

वाटते हल्ली गझल आईप्रमाणे'


१७) पिंडी ते ब्रम्हांडी:


सतीशजी आत जसे आहेत तसेच बाहेरही आहेत. जे आहे तेच गझलेत दिसून येते. कुठलाही मुखवटा लावून वावरणारा हा व्यक्ती नाही.


'विस्तार फक्त माझा यानेच शक्य झाला

मी संकुचित कधीही केला विचार नाही'


'होऊ नये अनादर माझ्याकडून त्यांचा

नावासमोर ज्यांच्या सन्माननीय आहे'


१८) कामगारांची व्यथा मांडणारा कवी:


सतीश .जी कामगारांची व्यथा, त्यांचे प्रश्न मांडत असतात. कामगारांची झालेली कोंडी, कामगारांचे प्रश्न ते उपस्थित करतात आणि काही अंशी त्यांची उकल शोधण्याचे प्रयत्न ते करतात. 


'कशी सांग वारी करू पंढरीची

तिन्ही सांज मी कारखान्यात असतो'


१९) साधेपणा:


सतीश ह्यांच्या गझलेत साधेपणा दिसून येतो. म्हणूनच खरेपणा आपसुकच येतो.


'तुझ्या गादी दुलाईची मला येथे गरज नाही

मला रेल्वे फलाटावर सुखाने झोपता येते'


२०) वेगळेपणा:* .


सतीश ह्यांची गझल वेगळी आहे. तिचा बाज वेगळा आहे. म्हणूनच हा वेगळेपणा वाचकांना आवडत असतो.


'टांगता आली न भिंतीवर घराच्या

एक प्रतिमा काळजाच्या आत होती'


'सागरामध्ये मिळावे स्थान त्यांना

याचसाठी भांडल्या त्या संगमावर'


'गुलाबी गुलाबी तुझे ओठ बघता

मला वाटले तेच जयपूर होते'


'उतरल्याने विठू गझलेत माझ्या

मला इंद्रायणीवर शेर सुचले'


'छान गोळ्या घालता आल्यात त्यांनाही

घेतली बंदूक तू असणार खांद्यावर'


मराठी गझलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा संग्रह वाचावा आणि संग्रही ठेवावा असा झाला आहे. या संग्रहात एकूण ९० गझलांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे.

...............................

एक पक्षी

(गझल संग्रह )

सतीश मालवे

गझल मंथन प्रकाशन,

स्वागत मूल्य रु.२००/ -

..............................................

 गिरीश शाम जोशी

मो.९२२६७५०६२१

No comments:

Post a Comment