१.
कुंचला वेचून केली गझल त्याने
सोडुनी गेलाय तो दुनियेस गाणे
पाळता आलेच नाही जर उखाणे
भांग भरली का तिची मी कुंकवाने
गझलसाठी जन्मला अन् खाक झाला
प्रश्न का दुनिये तुझा गेला कशाने
गुंतला होता तुझ्या श्वासात आत्मा
मारल्या देहात मी चकरा मनाने
शेण मातीच्या तुझ्या गझलेत गोष्टी
कोणत्या नावात घेऊ मी उखाणे
हे कसे स्वातंत्र्य आहे कोण जाणे
मुक्ततेने कैद झाले कैदखाने
२.
चित्र आपण साजरे काढू
दोन उडती पाखरे काढू
आत नेतिल कृष्णविवरांना
काळजावर भोवरे काढू
भेटल्यावर फार दिवसांनी
शुष्क ओठांचे झरे काढू
संभ्रमातुन सत्यता यावी
चेहऱ्यावर चेहरे काढू
सूर्य समजुन त्या घरासोबत
एक वर्तुळही खरे काढू
बडबडीचा डंख तुटल्यावर
मौन आतुन बोचरे काढू
सजवता येईल दुःखांना
ये कुडाला कोपरे काढू
३.
नजर काळी, तो नग्नता जपतो
दावण्यापुरती सभ्यता जपतो
नाचुनी उत्सव कर चितेवरती
काय सुतकाची मान्यता जपतो
मौन देखिल हिंसा तुझ्यासाठी
मग कशाला तू वाच्यता जपतो
शेवटी ताटातूट केल्यावर
भाग्य कोणाची भाग्यता जपतो
जन्मभर निव्वळ जाच झाल्याने
प्रेम नावाची भव्यता जपतो
व्यक्त होतो तो काळजी घेउन
फक्त खोटी लोकप्रियता जपतो
आस, भक्ती डोळ्यांतली मेली
का तुझी वेडी आर्तता जपतो
चार थेंबांनी बीज अंकुरते
काळ गर्भाची पात्रता जपतो
.............................................

No comments:
Post a Comment