१.
उन्हाअभावी रोप कधीही अंकुरते का
झाडांनाही सतत सावली मानवते का ?
दबाव सोडुन श्वास मोकळा घेत चला ना...
बघा तुम्हाला दुःखामध्ये गुदमरते का !
सोसुन आली आहे इथवर एक पानगळ
पाहू या ना उद्या पालवी लवलवते का !
विनातापता काळाच्या ह्या तेलामध्ये
बघ जन्माची द्वाड मोहरी तडतडते का ?
सुरा ठेवून आहे दुनिया जिच्या गळ्यावर..
अशी अबोली खरेच सांगा बडबडते का ?
हाव भुकेली चढून बसली मानगुटीवर
त्यानंतर ती जिवास कुठल्या उद्धरते का ?
नाराजीवर नाजुक गजरा घेउन आलो
बघतो घरची रजनीगंधा घमघमते का ?
२.
भलतेच कोरडे तू बदलून टाक धोरण
मी एकटीच हिरवा आणू कुठून श्रावण
ध्यानात रोज ठेवा इतिहास नीट त्याचा
विश्वास ठेउनी जर बांधाल एक कुंपण
सोडून लोक सगळे धरलास हात माझा
सुचणार आज कुठले मृत्यो नवीन कारण ?
आयुष्य काय आहे आता जरी कळाले ...
अनुभव बरेच मागे मी ठेवलेत तारण
आंबट असेल तो तर होईन गोड मीही ...
चवदार फक्त राहो नात्यांमधील सारण
३.
तुझ्या मनाच्या डोहामध्ये शिरल्यानंतर
तरंग थोडे उठणारच ना बुडल्यानंतर
ह्या गझलेची धुंदी थोडी पुढे उतरली
पोटात कावळे ओरडू लागल्यानंतर
माहित नाही किती काळ टिकणार शिरशिरी
तुझ्याबरोबर पावसात मी भिजल्यानंतर
उगा वाहिली जड देहाची खूप काळजी
हे तर अस्तर फक्त बदलणे विरल्यानंतर
खरी कळाली आहे आता किंमत माझी
येताजाता सहज कुणी वापरल्यानंतर
आशा ठेवुन असतो माणुस नात्यांमध्ये ...
येइल भरती ही ओहोटी सरल्यानंतर
शिखरावरती दिसतो आहे आज मला तो
खरी सांगता झाली आहे पडल्यानंतर
कष्टाला पर्याय तसा आलेला नाही
बीही रुजते मातीमध्ये दबल्यानंतर
जपून आहे काळजात मी एक निखारा
किती सहज तो पेटुन उठतो विझल्यानंतर
..............................................
No comments:
Post a Comment