१.
जुनी आज कानी पुन्हा तीच गाणी
उभे राहिले बंद डोळयांत पाणी
मला पाहिले अन् विरह दाटला ना?
कुठे वेगळीआज माझी कहाणी?
किती घेतली काळजी तू तरीही
तुझ्या पावलांचीच उरली निशाणी
मनाआड दडल्यात लाखो अपेक्षा
किती शांत बसलीत स्वप्ने शहाणी
तुझी काळजी पोखरे ही मनाला
पुन्हा काळजातून कविता विराणी
कसे भोग आलेत माझ्याच नशिबी
कटोऱ्यात येतात खोटीच नाणी
मला भास होतो तुझ्या आसण्याचा
खुशालीच गुपचूप करते पहाणी
कशाने बिथरले ऋतू देखणे हे!
कुणी घेतली प्राक्तनांची शिकवणी?
२.
माझ्यामध्ये मला शोधले माझ्यानंतर
हीच जगाची रीत, समजले गेल्यानंतर
बंदूकीने व्यक्ती मरते, विचार नाही
उशिराने हे त्यांना पटले मेल्यानंतर
पुढल्या जन्मी नक्की भेटू तिने म्हंटले
खूपच खडतर प्रवास कळले केल्यानंतर
सोपे नव्हते इस्टेटीचे वाटे करणे
रुसवे फुगवे सगळे मिटले सरल्यानंतर
दिव्याभोवती पतंग घिरट्या घालत होता
कळले नाही कोण जळाले विझल्यानंतर
होते तेव्हा खूप ताणले विचार त्यांनी
मोल कळाले मग नात्यांचे तुटल्यानंतर
गुळाभोवती जमले होते खूप मुंगळे
मार्ग बदलला ज्यानेत्याने लुटल्यानंतर
मैत्री झाली रात्रीची अन् स्वप्नांची मग
डोळे मिटले आठवणींचे छळल्यानंतर
३.
सोबतीला रात्र होती, एकटीने चालताना
पुस्तकांनाही समजले, दुःख माझे चाळताना
तो जरासा हासला अन् हासले मीही जराशी
कोणता गाफील होता क्षण असा तो भाळताना
काय मी सांगू जगाला, कोणते देऊ पुरावे?
फाटले आभाळ होते, डाव भरला मोडताना
दुःख का हे आवसेचे, एवढे झाले नभाला?
चांदण्यांना पाहिले मी, बघ सुतक ते पाळताना
घेरले जेव्हा मला या, संकटांनी एकट्याला
हुंदक्यांना पाहिले मी, पाय येथे काढताना
..............................................
नंदकिशोर ठोंबरे,
9881074441

No comments:
Post a Comment