दोन गझला : बदीऊज्जमा बिराजदार





१.


संदर्भ जीवनाचे समजायचे तुला

ओझे विवंचनांचे उचलायचे तुला


गर्भात बालिकांच्या रोखू नको कळ्या

मायेत पाखरांना भिजवायचे तुला


साथीत दुर्जनांच्या होणार ना भले

मित्रत्व सज्जनांचे मिळवायचे तुला


दिसते जरी तुला हे आयुष्य फाटके

कष्टात लाव अस्तर मिरवायचे तुला


धोका कुणास देणे आणू नको मनी

विश्वास विश्व सुंदर वसवायचे तुला


खोटे-लबाड येथे टिकते न फारसे

सत्यास अंत नाही ठसवायचे तुला


सांगून टाक साबिर नाही अमर कुणी

सामान बांध सत्वर उचलायचे तुला


२.


तुझ्या प्रीतिची भेट घ्यायला आतुरलेला

गळाभेट ही तुला द्यायला आतुरलेला


डोळ्यांच्या बाहुलीत दिसते तुझी छबी बघ

श्वास स्पंदने सार्थ व्हायला आतुरलेला


हृदयाच्या या गावामध्ये तुझीच वस्ती

ओष्ठमधाचे पाणी प्यायला आतुरलेला


माहेराची हौस भागली असेल आता

माझ्यासंगे तुला न्यायला आतुरलेला


गंध तुझा तर साबिरमध्ये भरून उरला

मिठीत सखये दरवळायला आतुरलेला

.....….....................................

No comments:

Post a Comment