१.
घरी ताळा नका लावू अशी ताकीद बाबांची
कुणी येतो भुकेला, त्यास द्या कांदा, मुळा, भाजी
शिका माणूस होण्याला, नव्याने माणसे जमवा
बहाणा वेळ नाहीचा, नका बोलू कुणापाशी
कुलुप किल्ली कुणाला? सज्जनांना दूर ठेवाया
छुपे ताळे, कडी चोरांपुढे रे काय कामाची
कशी चोरून नेली हद्द देशाची परकियांनी
शिपाई सज्ज होते घेउनी बंदूक मोलाची
अता प्रत्येक जण जागे रहा झोपेतही 'शोभा'
इथे प्रत्येक व्यक्तीला गरज आहे पहाऱ्याची
२.
स्पष्ट सारे बोलण्यापेक्षा मुक्याने वावरावे
नीयतीने जे ठरवले तेच होणारे पहावे
रात्र येताना बरोबर आणते ना चांदण्यांना
सूर्य का नाही? उजेडाला म्हणुन का खिन्न व्हावे?
पावसाळा चिखल पाहुन जायचे नाही कुठेही
हा खरा अपमान आहे इंद्रदेवाचा कळावे
व्यर्थ अट्टाहास, 'मी-माझे ' अहंकारात जगणे
का स्वतःचे स्तोम, लोकांच्या पुढे गर्वात गावे
काम करुनीही सदा उघडाच पडतो बोलणारा
मौन 'शोभा' कौतुकाला पात्र ठरते, ओळखावे
३.
आगळी माझी कहाणी, वेगळी माझी व्यथा
शब्द नाहित मजकडे, सांगायला सारी कथा
द्रौपदी, तारा, अहिल्या, जानकी, मंदोदरी
याच स्रीयांनी जगाला तारले ना सर्वथा
विस्कटाया लागली नातीच स्त्री-पुरुषांतली
थांबवा हे सर्व, स्त्री पडद्यात जाइल अन्यथा
बायको तर पाहिजे, आई हवी रांधायला
फक्त मुलगी ती नको, ही मानसिकता का वृथा?
भारताची शान स्त्री-शक्ती कशी मागासली?
मारणे पोटात पोरी संपवू 'शोभा' प्रथा
......…..…...............................
शोभा तेलंग 'शोभनील' मो. 7724006713
No comments:
Post a Comment