१.
हरखले नाही कधीही फूल चाफ्याचे
हासले नाही कधीही फूल चाफ्याचे
रात्र सारी जागली विरहात त्याच्या, पण
जागले नाही कधीही फूल चाफ्याचे
काय सांगू मी कहाणी अर्ध प्रेमाची
भाळले नाही कधीही फूल चाफ्याचे
धावली मागे जरी माझ्या, फुले सारी
धावले नाही कधीही फूल चाफ्याचे
दुःख आहे की, मनाच्या अंगणी माझ्या
उमलले नाही कधीही फूल चाफ्याचे
२.
कुणासाठी कुणी येथे मरत नाही
कुणाचे मन कुणासाठी जळत नाही
नको ना साथ दुःखाची अशी सोडू
कधी सोडून गेले सुख कळत नाही
असावे सुख तुला दारी जरी वाटे
सुखासाठी तुझ्या कोणी झटत नाही
कशाला ठेवतो तू भास जगण्याचा
तुझ्या वाचून दुनियेचे अडत नाही
जगूनी घे स्वतःसाठी असे तोवर
क्षणाच्यावर शवावर जग रडत नाही
३.
ऐकत नसेल कोणी सांगायचे कशाला ?
अन् दुःख या जगाला दावायचे कशाला ?
कोणी नसे कुणाचे ठाऊक हे असूनी
डोळयांत रोज पाणी आणायचे कशाला ?
मागू नको कुणाला तू सौख्य जीवनाचे
नाही जगाकडे जे मागायचे कशाला ?
विश्वास तू तुझ्यावर ठेवून एकदा बघ
आशेवरी कुणाच्या भाळायचे कशाला ?
कर कष्ट एवढे की दुनिया पुढे झुकावी
मन रोज रोज वेड्या जाळायचे कशाला ?
केव्हा तरी मनाचे ऐकून एकदा बघ
बाहेर अंतरीचे शोधायचे कशाला ?
भाग्यात जे तुझ्या रे मिळणार ते तुला, पण
पाहून वाट त्याची थांबायचे कशाला ?
आहे मनात जेही बोलून मोकळे हो
कोंडून भावनांना मारायचे कशाला ?
सांगून येत नाही मृत्यू कधी कुणाला
हे सत्य मान्य करण्या लाजायचे कशाला ?
..............................................
No comments:
Post a Comment