१.
कळणार काय माझे अस्तित्व या जगाला,
कळलो अजून नाही माझाच मी स्वतःला
काढून कर्ज त्याने शेतात स्वप्न पुरले,
सांगाल का कुणी हे जाऊन पावसाला
कोणासही कळेना कळ बाप माणसाची,
झोपेत सर्व चिंता तो ठेवतो उशाला
नव्हताच सावलीशी माझा कधी घरोबा,
केवळ म्हणून केले मी सोयरा उन्हाला
दिसतो जसा तसा तो असतो असेच नाही,
कळला कधीच नाही माणूस आरशाला
परतून पाखरांनी यावे अधेमधे अन्,
घ्यावे कुशीत अपुल्या व्याकूळल्या घराला
हा दंश वासनांचा आहे जहाल इतका,
गात्रे थकून गेली सांगा कुणी मनाला
सांजावल्या दिठीचा पानावला किनारा,
सरता प्रवास आता हुरहूर ही कशाला ?
२.
आसक्तीची असेल का रे अढी विठ्ठला,
वीट तुझीही सुटली नाही कशी विठ्ठला
घरात माझ्या गोकुळ आहे गजबजलेले,
म्हणून वारी केली नाही कधी विठ्ठला
पुजल्या गेली असती सोबत तुझी रूक्मिणी
भक्तांसाठी दूर सारली सखी विठ्ठला?
अंधाराच्या वाटेवर मी दिवा मंदसा,
वातीवरची सारलीस काजळी विठ्ठला
कुणासही तू कुशीत घेतो वात्सल्याने,
भेदांची ओलांडलीस तू दरी विठ्ठला
दुषित मनाला निर्मळतेचा झरा मिळावा,
तुझ्या रूपाची मनात वाहो नदी विठ्ठला
अतृप्तीच्या भोगामध्ये देह अडकला,
मिळो अता या दिंडीलाही गती विठ्ठला
३.
नको आहे पुन्हा काही मिळाले फार आयुष्या,
समाधानी मनाने मानतो आभार आयुष्या!
सुखाची आसही नाही नसे उद्वेग दुःखाचा
भले तू हात दे अथवा मला नाकार आयुष्या!
उजेडाचा प्रवासी मी दिवा घेऊन आलेलो,
भले मार्गात येऊ दे किती अंधार आयुष्या!
कधीही ताणला नाही उगा मी वाद कोणाशी,
म्हणोनी चालला आहे सुखी संसार आयुष्या!
तुला नाही दयामाया किती मी घाव सोसावे,
तरी करणार मी कोठे तुझी तक्रार आयुष्या!
तुझ्या या पक्षपाती वागण्याला काय बोलावे?
कुणाला गारवा देतो कुणा अंगार आयुष्या!
फुलांनीही दगा द्यावा असा तू घात केलेला,
तुझे जपलेत अवघे घाव मी अलवार आयुष्या!
उन्हाने पोळले अन् सावलीने टाळले कायम,
तरीही घेतली नाही कधी माघार आयुष्या!
.................................….........

No comments:
Post a Comment