१.
नवा असा करायला विचार वेगळा कुठे
जुने जुनेच चालले नवीन सोहळा कुठे
मला नकोच वाटते उगाच तीच ती कथा
नव्या दमातले विलन, नवीन सापळा कुठे
अनेक डावपेच तो नवे म्हणून खेळतो
कळून ना कळायला समाज आंधळा कुठे
नको तिथेच घोळतो विचार सारखा कसा
विषय तुझा असेल तर इलाज वेगळा कुठे
घरी पुढे असायचा बसून बाप सारखा
अता उन्हात शोधतो दिसेल कावळा कुठे
कुठे अजून भाळले अधीर मन तुझ्यावरी
मला तुझा म्हणायला मला तुझा लळा कुठे
२.
साचलेला हा तुझ्यातर केवढा डोक्यात कचरा
वर दिखावा चाललेला पांढरा घालून सदरा
केवढी ती आरशावर साचलेली धूळ होती
मी उगाचच काळजीने चेहरा केलाय दुखरा
सोंग आणू गोड बोलू हे कधी जमलेच नाही
मी कसा राहून गेलो लोकहो जातीत उपरा
घर, मुले, संसार सगळे मस्त आहे चाललेले
छान आहे संगिनी मग का तुझ्या डोळ्यात सतरा
तू जुना झालास बाबा ती वयाने शांत झाली
जा, तुझ्यासाठी कुठे ती माळते केसात गजरा
पाप केले लाख आम्ही मंदिरापाशी तरीही
खूश होतो देव अमुचा काप म्हणतो एक बकरा
एकटीला जीवघेणा वाटतो संघर्ष कायम
ती जगाशी भांडताना चालते चोरून नजरा
३.
ही गरज उद्याची म्हणून घे
तू हवे नको ते शिकून घे
शिल्प कोर, मन पोखरून घे
थांब, काळ सुंदर करून घे
कान सारखे टाकतो खडे
चित्त आपले पाखडून घे
गंध पेर तू आत छानसा
आत एकदा दरवळून घे
जन्म आंधळा व्हायचा तुझा
बोट कोवळे तू धरून घे
शुष्क व्हायच्या आत कल्पना
स्वप्न देखणे हिरवळून घे
..............................................

No comments:
Post a Comment