१.
ही पण आहे ती पण आहे
हरेक इच्छा गाभण आहे
कसा रुजावा राम अंतरी
आधीच आत रावण आहे
मित्र असाही एक असावा
वाटावे हा दर्पण आहे
तू आल्यावर आयुष्य जणू
बारा महिने श्रावण आहे
ही तर केवळ नांदी झाली
अजून बाकी बघ गण आहे
२.
मनाजोगते काही घडले आहे
स्वप्न सकाळी तुझेच पडले आहे
अल्लड मुलगी अचानक शांत झाली
ओठांत गुपित कुठले दडले आहे
सावकाश ये जरा टाळून खड्डे
या रस्त्याचे काम रखडले आहे
ये सुखा आत, बाहेर नको थांबू
दार घराचे पूर्ण उघडले आहे
नकोस येऊ लवकर आता मृत्यो
जगण्याचे कारण सापडले आहे
३.
समज एवढी कुठून येते मुलींना
कोण समजून इतके घेते मुलींना
असतात जरी मुली कितीही लाडक्या
परस्पर एक सासर नेते मुलींना
मक्तेदारी होती तुमची मुलांनो
जमते सारे आता ते ते मुलींना
चूल सांभाळ जी म्हणायची मुलींना
आई हल्ली पुस्तक देते मुलींना
एवढा करू प्रयत्न आपण यारहो
मिळायला पाहिजे हवे ते मुलींना
...............................................
No comments:
Post a Comment