तीन गझल : सौ. स्नेहा शेवाळकर





१.


शांतता जर मनाची तुझ्या भंगली 

ओघळू दे व्यथा आत जी कोंडली


अश्रू दे नेहमी तू सुखाचे मला 

अन्यथा कोरडी पापणी चांगली


रंग माझ्यात इतका मिसळला तुझा 

वाटते रोजची पंचमी चालली 


मन अवेळीच का प्रौढ झाले तुझे 

बालकडु तू असे कोणते प्यायली 


सोडला मोह जेव्हा मनाने सहज  

मीपणाची नशा तत्क्षणी संपली 


श्वापदे सोडली भोवताली तिच्या 

अन् म्हणे सांग तू का अशी खंगली 


वाटते पोक्त झाली अवेळी कळी 

बघ थबकते कशी पावलो पावली 


२.


मनाचे पाखरू उडते किती भरभर 

कधी एका कधी दुसऱ्या डहाळीवर 


जपावे काळजीने तेवढे त्याला 

उधारीने मिळाले श्वास तुजला जर  


कसे सामर्थ्य कळले आतले माझ्या

उणीवा आतल्या मी शोधल्या नंतर

 

नको होता मला तो संग पैशाचा  

असावा भोवती प्रिय व्यक्तिचा वावर 


मनाला प्रश्न छळती केवढे खडतर 

कुठे मिळतात त्याची उत्तरे लवकर 


जरी आयुष्य काट्यांवर पळत गेले 

नसे अवघड... फुले त्यांना समजल्यावर 


दिसे सुंदर घराचे फाटके छप्पर 

मनोहर चांदण्याचे लावले झुंबर 


३.


ध्येयास जीवनाच्या जाणून घे जरा तू  

ह्रदयात स्वप्न कायम ठसवून घे जरा तू


जगतोय मी सुखाने जाळून सर्व चिंता 

संसार हाच असतो समजून घे जरा तू


लावून धार इतकी बोलू नकोस आता

शब्दांस रोज थोडे चाळून घे जरा तू


असतो सुगंध जळत्या खोडास चंदनाच्या 

आयुष्य त्याप्रमाणे जाळून घे जरा तू 


ओठांत एक आणिक पोटात शब्द दुसरे 

 पाठीत मारणारा पाहून घे जरा तू 


करतोस रोज इतका जर माज सारखा तू   

मदतीशिवाय आता चालून घे जरा तू 


कर आत्मसात सारे, जग ज्ञानपीठ अवघे

 ज्ञानास रोज नवख्या वेचून घे जरा तू 

............................…...............

No comments:

Post a Comment