१.
फुलासारखी दिसायची
वेडा मजला करायची
मिटल्या ओठी ना म्हणुनी
हळूच खुदकन हसायची
फिका केवडा तुझ्यापुढे
लाजलाजुनी म्हणायची
जाणाया ती मनातले
नजर गुंतवुन बघायची
कधी अबोला झाला तर
उगीच लटके रुसायची
थौडी सलगी करूनिया
हळूच मजला टिपायची
अधरावरती डंखुनिया
मिठीत अलगद शिरायची
कोसळण्याच्या वेळेला
स्वतःस मग सावरायची
२.
सोडुनी सारे इथे जर जायचे
फक्त प्रेम नि शब्द-स्वर ठेवायचे
द्वेष, ईर्षा आणि मत्सरही नको
षड्-रिपूंना का उगी पाळायचे?
रंजले वा गांजले मज भेटता
त्यांस हृदयी धरुन कवटाळायचे
चालल्या ज्या शर्यती त्या चालु द्या
ना मला कुठले पदक जिंकायचे
तत्त्व अन् आदर्श थोडासा अहम्
सर्व काही आज मज विसरायचे
दुर्जनांशी वैर घ्यावे लागते
चौकटी मोडून जर चालायचे
कृष्ण व्हावे लागते समरांगणी
मोरपिस मुकुटात जर खोचायचे
३.
कोण जाणे काय होते या मनाला
ऐकण्याचे नाव ना घेई क्षणाला
आशयाला चुंबण्याची काय घाई
सर करावे वृत्त, मात्रा अन् गणाला
दूरवर दिसते तसे नसते क्षितिजही
बघ जरा तू झोपडीच्या कुंपणाला
वाहते जर शांत सरिता वाहु दे ना
तीच जीवन देतसे साऱ्या वनाला
राज्य, राजे राजवाडे संपले, अन्
हे नवे आले भिकारी शोषणाला
ना महाभारत न रामायण तरीही
जानकी अन् द्रौपदी लागे पणाला
..............................................
No comments:
Post a Comment