१.
निळ्या ढगांशी लपंडाव तो खेळत असतो,
चित्र मनोहर रविराज स्वत: काढत असतो
दु:ख निशेचे मनात सलते प्राजक्ताच्या,
तिच्याचसाठी रंग केशरी उधळत असतो
विसावलेल्या खडकांचा ना द्वेष मनाशी
व्रतस्थ निर्झर संथ गतीने वाहत असतो
नश्वर देह नि मिथ्या नावच मला मिळाले,
अहंपणाची पाटी मी का मिरवत असतो?
विवेक बुद्धी आणि मनाची सांगड चुकली,
हृदयामधला कल्लोळ मला सांगत असतो
२.
डोंगरमाथा गहिवरला अन् अखंड निर्झर वाहत गेला,
जड हृदयाने जलधारांसह तो खडकांना बिलगत गेला
सुटले होते सवंगडी अन् रुसली होती मायमाउली,
मायपित्यासम डोंगरास त्या डोळे भरुनी, निरखत गेला
जन्मताच जो त्यक्त जाहला, दूर प्रवासी झाला होता,
सावरून तो दु:ख स्वत:चे खळखळ हसून धावत गेला
तृणांकुरांच्या पात्यांचाही निरोप घेणे अवघड होते,
वाट वाकडी करुनी अवचित रानफुलांशी बोलत गेला
गोड बोलणे, संगीत जणू तरुवेलींना भावत होते,
पक्ष्यांशीही बोलत, हासत आनंदाने नाचत गेला
उंचीवरुनी खाली येणे सोपे नसते कोणालाही,
उदार हृदयाचा तो निर्झर मनोबळाने पचवत गेला
कर्तव्याची जाण मनाशी, तो भूमीला तोषत गेला
तळे होउनी पायथ्यावरी आनंदाने साचत गेला
३.
हे मना तू सोड आता या जगाला ऐकणे
बोलताना शब्द, आधी तू स्वतःला मापणे
पार कर कर्तव्य सगळे झेल इथले भार तू
प्राक्तनाचे भोग सारे का जनाला दोषणे?
यत्न काही तू न केले स्वच्छ करण्या चेहरा
का अता मग डाग दिसता दर्पणाला कोसणे?
धर्म आहे सत्य वदणे तूच पालन कर इथे
व्यर्थ आहे अन्य कोणी रोज तुजला सांगणे
कष्ट करुनी मीठ-भाकर भोजनाला तुज मिळो
प्रेम भक्ती नेहमी तू ईश्वराला मागणे
..............................................
No comments:
Post a Comment