तीन गझला : सौ. दीपाली कुलकर्णी





१.


चूक वारंवार केली

मी तुझी तक्रार केली


भेटले नाकारले सुख

अन् व्यथा स्वीकार केली


का तुलाही वाटते...मी

जिंदगी बेकार केली


माळले शब्दांत त्यांना

आसवे जरतार केली


झेप घेण्याचे ठरवले

एक रेषा पार केली


जन्मभर रमले कुठे मी?

वेदना आधार केली


२.


तो तसे सारेच देतो, द्यायचे त्याला

भेटतो प्राजक्त कोठे मागणाऱ्याला?


आठवण कृष्णा तुझी नसते सुखामध्ये

पण तरी देऊ नको ना दुःख वाट्याला


पाहिली मदिरा तशी संयम तुझा सुटला

ठरविले दोषी अकारण पाजणाऱ्याला 


थांबलेले लोक काठावर, पुन्हा हसले

आज पाण्याने बुडवले पोहणाऱ्याला


चोख करते काम ते कर्तव्यबुद्धीने

काय आहे आत, त्याचे काय जात्याला


जाणवे सौंदर्य तर रंगातही काळ्या

वेगळा चष्मा हवा पण पाहणाऱ्याला


अर्जुनासम फक्त लक्ष्यावर हवा डोळा

भेटतो दगडात ईश्वर, शोधणाऱ्याला


३.


वादळी वाऱ्यात सगळे ठीक आहे ना?

आपल्या दोघात सगळे ठीक आहे ना?


खिळखिळा झाला, तसा बाहेर पडले मी

आज त्या पक्षात सगळे ठीक आहे ना?


फक्त 'मी' व्यापून होते जे कधीकाळी

सांग त्या हृदयात सगळे ठीक आहे ना?


वाटते वरवर तसे तर छान आहे पण

खोलवरती आत सगळे ठीक आहे ना? 


पाखरे गेली कधीची दूर देशाला 

त्या सुन्या घरट्यात सगळे ठीक आहे ना? 


लोक माझ्यासारखे, शहरात आल्यावर

आपल्या गावात सगळे ठीक आहे ना?


लेक तर पत्रात लिहिते, ती सुखी आहे

मात्र प्रत्यक्षात सगळे ठीक आहे ना!

..............................................

No comments:

Post a Comment