तीन गझला : विनय मिरासे

 





१.


चुरा चांदण्यांचा हवा माखण्याला 

मला देह माझा हवा राबण्याला 


फिरूनी बघितली तुझी मंदिरे मी 

तिथे, काय आहे तुला पाहण्याला


स्वतःसारखा देव नाहीच कोठे 

हवा ना, कुणी त्यास शृंगारण्याला



कसे रासि रंगात जन हे बुडाले 

हवे हेच त्यांना नको जागण्याला


स्वतःला स्वतःची कहाणी कथावी 

रिते कोण आहे इथे ऐकण्याला ?


अरे ही कशी आंधळी धर्मश्रध्दा 

बघू, कोण येतो अता तारण्याला


तुझ्या वल्गना अन् तुझे रिक्त भारे 

तुला तूच आहेस ओवाळण्याला


२.


निस्तेज चांदण्या अन् चंद्रासही बिमारी 

वय भोगत्या फुलांना आता नसे तरारी 


वस्तीत माणसांच्या आयुष्य पार जळले 

रक्तात दाह नुसता सारे कसे विखारी


डोळ्यांत काल माझ्या तू वाचलेस जे जे 

शब्दांत तेच येता का लागले जिव्हारी?


रुप-दग्ध बाहुल्यांना अस्तित्व भ्रांत आता 

जन्मावरी तयांची झाली किती उधारी


पंगतित बैसलेले जन्मासवे भुकेले 

बाहेर सांज याचक वेडा कसा भिकारी ?


मी बोलताच त्यांना होती जुलाब उलट्या 

ते निर्विकार साधू अन् मी ठरे विकारी


३. 


अपमानांनी हास म्हणालो 

रडणे आता बास म्हणालो


माफी दे रे बा जिवना तू 

मी जगण्याला त्रास म्हणालो


झिजले नाही चंदन सगळे 

अजुनी पुरते घास म्हणालो


'अच्छे दिन' हे खूपच अच्छे 

मी गधडा वनवास म्हणालो


राहुन राहुन का कुढतो रे?

बघ, त्यांचे मधुमास म्हणालो


भगवे लेउन भोग सुरू ते 

मी त्याला संन्यास म्हणालो


दारांमध्ये सर्व सुखे ती 

पाणी भरती 'ध्यास' म्हणालो


शब्दांचा तो मठ्ठ पसारा 

वाचुन मोठा व्यास म्हणालो


अपुले वर्णन आपण करतो 

नक्की कोणी खास म्हणालो

.....................................…......

No comments:

Post a Comment