१.
नशिबा तुला कित्येकदा का आजमावे लागले
थट्टा जरी केलीस तू मिश्किल हसावे लागले
भलत्याच थापा तू दिल्या कळले मनाला नेमके
भुलवून काळाला गडद मज सूर्य व्हावे लागले
म्हणतात सारे हेच ते जीवन असावे वाटते
प्रत्येक पाउल टाकताना अडखळावे लागले
कमजोर मी नाही खरे पण सिद्धता देऊ कशी
भट्टीतले मडके टणक मजला बनावे लागले
नाही कधी जमली मला खोट्या सुखाची बेगमी
दुःखास मानत आपले जीवन जगावे लागले
२.
जोडते त्या शाश्वताशी नाळ मी
पार्वतीचे अन् शिवाचे बाळ मी
शोधतो आहेस डोहावर मला
आत माझ्या साचलेला गाळ मी
गाढ इतकी झोपली माणूसकी
का कुटावे आर्ततेचे टाळ मी
देखणा दिसतोय वरवर चेहरा
रूप घेते तेवढे विक्राळ मी
भरकटत जाणे मला जमते कुठे
शेष उरणारा सुगंधी काळ मी
तोडणे इतके सहज समजू नका
नैतिकाशी बांधलेली माळ मी
व्हायची नाही उकल माझी तुला
ज्यास नाही थांग ते आभाळ मी
३.
तुझ्यामाझ्या सुखांचा रंग मोहरला असा
उमटला खोल हृदयावर तुझा हळवा ठसा
सुन्या या पायवाटांना तुझी जाणिव जशी
फुलांनी घेतला हाती सुगंधाचा वसा
खुणावत बोलल्या वाटा जवळ आहेस तू
गुलाबी रंग ओठांचा जणू खुलला तसा
अपेक्षा फार मी नाही कधी केल्या इथे
कळतनकळत भरत गेला सुखाने हा पसा
नको तारे नभीचे अन् नको ते स्वप्नही
मनाचा फक्त आहे या तुझ्यावर भरवसा
.............................................
No comments:
Post a Comment