तीन गझला : निशा डांगे





१.


आरसा सांगतो आरशाला पुन्हा

पारखावे जरा माणसाला पुन्हा


वाद झगडे किती राग रुसवे किती, 

पण नदी भेटली सागराला पुन्हा!!


मागते आसरा ओसरीला कसे?

लागले काय चटके उन्हाला पुन्हा?


हे अचानक उघडले जुने दुःख अन्

झोंबल्या वेदना काळजाला पुन्हा


भावना दाबल्या लेखणीने तिच्या

काय सांगू सबब कागदाला पुन्हा?


जा रुमालास विसरून तू आजही

हेच कारण पुरे भेटण्याला पुन्हा!


छान दिसतो निळा शर्ट सुद्धा तुला

एकदा घाल ना पाडव्याला पुन्हा!


२.


हरवलेली लाडकी इच्छा गवसली

हारले असतेच पण बाजी पलटली


एक ठसठस पुटपुटत असते सदोदित

आत काटा राहिला अन् जखम भरली


जास्त पक्की होत गेली ताणल्यावर

सैल केले बंध तेव्हा गाठ सुटली


जीव गेला पांगली गर्दी बघ्यांची

शेवटी मागे मढ्यांची रास उरली


शक्यता नाकारताही येत नाही

ती...खरी आहेच पडताळून पटली


संपल्यावर वाद त्यांचा जिंकला तो 

हार पत्करली तिने अन् गोड हसली


मुखवट्यावर मुखवटा चढवून झाला

शान खोटी मैफिलीमध्ये मिरवली


देत बसली दूषणे कायम स्वतःला

अन् चुका त्याच्या सहजतेने विसरली


फार झाली काळजाच्या आत खळबळ 

पण खरेतर एक सुंदर ओळ सुचली


३.


जगून घेऊ आता क्षणभर

आयुष्यावर बोलू नंतर


सुटण्याआधी पकडू हाती

धावत आहे काळ निरंतर


विष खदखदते मनात त्याच्या

बोलण्यामधे असते साखर


वाजत आहे रिंग मनाची

डायल केला कोणी नंबर


एक आकृती बनते ठिपका

इतके वाढत जाते अंतर


डोक्यामध्ये शंका कुजल्या

पटकन उघडा इथले चेंबर


नकोस खाऊ जास्त भाव तू

वाढत आहे माझाही दर


अहंपणावर औषध नाही

आपण बनवू जर जमलेतर!

.....…...........................…........

1 comment: