तीन गझला : मनोज सोनोने

  




१.


कुठे सांग गेला गड्या पावसा तू

जरा बोल खोटारड्या पावसा तू


तुझ्या भरवशावर असे जिंदगी ही

पुन्हा लाव ना रे झड्या पावसा तू


कधी मागतो काय दुसरे तुला मी

जरा दान दे मज नड्या पावसा तू


गडगडाट थांबव विजेचाच नुसता

अता बरस ना बडबड्या पावसा तू


उगी लेकरासारखा हट्ट धरतो

कसा जाहला रे अड्या पावसा तू


कुठे पाय बांधून बसलास राजा

जरा मोकळ्या कर घड्या पावसा तू


तिला बोलवाया मिठी घट्ट देण्या

तिच्या जा घराला सड्या पावसा तू


इथे बेडकासारखा ये कुदत तू

पुन्हा हो जरा तडतड्या पावसा तू


२.


तुझ्या हासण्यावर गझल लिहित गेलो

तुझ्या हसवण्यावर गझल लिहित गेलो


उरी खोलवरती जखम होत होती

तरी लाजण्यावर गझल लिहित गेलो


किती तास चर्चा करू मी तुझ्याशी

तुझ्या भांडण्यावर गझल लिहित गेलो


तुझ्या चेहऱ्यावर हसू आणले मी

तुझ्या बोलण्यावर गझल लिहित गेलो


कितीदा तुझे नेत्र अश्रूत न्हाले

तुझ्या सोसण्यावर गझल लिहित गेलो


नजर द्यायची नजर चोरायची ही

अशा रिझवण्यावर गझल लिहित गेलो


पुन्हा भेट घेणार नाही म्हणाली

तुझ्या चिडवण्यावर गझल लिहित गेलो


३.


जीव तुझ्यावर जडू लागला

भेटण्यास तडफडू लागला


लाख भेटले चेहरे मला

त्यात एक आवडू लागला


पाहून हाल रडे भुतकाळ

वर्तमान ओरडू लागला


कोणास चांगले म्हणू मी

जो तो मागे पडू लागला


आकाश धावले मदतीला

मोर मनी बागडू लागला


लख्ख वीज चमकली गगनात

मिठीत क्षण कडकडू लागला


तृप्त होऊन दूर झालास

मेघ जणू बडबडू लागला

.................….........................

1 comment: