सुरेश भटांच्या गझलांची वृत्तेः सांख्यिकीय विश्लेषण : श्रीकृष्ण राऊत

 



कविवर्य सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला. १९५५ ला त्यांनी गझललेखनास प्रारंभ केला. सुरेश भटांचे सहा संग्रह प्रकाशित आहेत. प्रत्येक संग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित होण्याचे वर्ष पुढीलप्रमाणे -
१. रूपगंधा, १५ मार्च १९६१
२. रंग माझा वेगळा, १९७४
३. एल्गार, १९८३
४. झंझावात, १९९४
५. सप्तरंग, २००२
६. रसवंतीचा मुजरा, २६ जानेवारी २००७
१४ मार्च २००३ ला सुरेश भटांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांचा 'रसवंतीचा मुजरा' हा शेवटचा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. नागपूर ये संपन्न झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य सुः भट स्मृती गझलवाचन सत्र ठेवले होते. त्या सत्राचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मला मिळाली होती. त्या सत्रात ४ फेब्रुवारी २००७ ला 'रसवंतीचा मुजरा' ह्या संग्रहाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. अगोदरच्या पाच संग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या कविता ह्या शेवटच्या संग्रहात आहेत .
१९५५ ते २००३ ह्या ४८ वर्षांच्या कालखंडात सुरेश भट यांनी एकूण ५१३ कविता लिहिल्या त्यापैकी २६३ गझला आहेत. त्या संग्रहनिहाय पुढीलप्रमाणे -

संग्रहाचे नाव      एकूण   रचना   गझलांची संख्या प्रतिशत प्रमाण
रूपगंधा ७२पैकी  ०७गझला   ९.७२ %
 रंग माझा   वेगळा ९२ पैकी ३२ गझला ३४.७८%
एल्गार ९६ पैकी ९१ गझला ९४.७९%
 झंझावात ८९ पैकी ७६ गझला ८५.३९%
सप्तरंग ८१ पैकी ५१ गझला ६२.९६%
रसवंतीचा

मुजरा
८३ पैकी ०६ गझला  ७.२३ %
एकूण ५१३पैकी  २६३गझला ५१.२७%


वरील सारणीमध्ये आलेल्या सांख्यिकीय विश्लेषणाचा विचार केल्यास, सुरेश भटांचा गझलरचनेकडे असणारा कल दर्शविणाऱ्या खालील निष्कर्षाप्रत पोहचू शकतो.

१. एकूण ५१३ पैकी २६३ गझला म्हणजेच निम्म्याहून अधिक (५१.२७%) रचना गझल काव्यप्रकारातील आहेत. गझलेव्यतिरिक्त इतर काव्यप्रकारातील कवितांमध्ये काही गीते आणि मोजक्या मुक्तछंदातील कविता आहेत. 'रंग माझा वेगळा' हे त्यांच्या काव्यप्रवासातील असे वळण आहे, जेथे त्यांचे गीतलेखन मागे पडलेले दिसते. सुरेश भटांची काव्यजाणीव कशी विकसित होत गेली, याचा टप्प्यांनुसार विचार करायचा म्हटले तर त्यांचा संग्रहांचा क्रम पुढीलप्रमाणे विचारात घ्यावा लागेल -

१) रसवंतीचा मुजरा, २००७

२) रूपगंधा, १५ मार्च १९६१

३) रंग माझा वेगळा, १९७४

४) एल्गार, १९८३

५) झंझावात, १९९४

६) सप्तरंग, २००२

२. 'गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी कवी असला पाहिजे. ही गझलेची पूर्व अट आहे', हे सुरेश भटांनी बाराखडीत सांगितले आहे. त्यांचा एकूणच काव्यप्रवास बघतात कवी असणे वरील सांख्यिकीय विश्लेषण बघता सिद्ध होते.

३. गझल ह्या प्रभावी काव्यप्रकाराकडे त्यांचा कल 'रंग माझा वेगळा' (३४,७८%) ह्या संग्रहात वाढल्याचे दिसून येते.

४. १९७४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'रंग माझा वेगळा' ह्या संग्रहानंतर १९८३ मध्ये 'एल्गार' हा संग्रह प्रकाशित झाला. १९७४ ते १९८३ ह्या ९ वर्षांच्या कालखंडात सुरेश भटांचा गझलरचनेकडे झुकलेला कल परमोच्च बिंदूपर्यंत पोचल्याचे दिसते. 'एल्गार' मधील बहुतांश गझला गैरमुसलसल ह्या प्रकारातील असून आशयदृष्ट्या त्या अधिक परिपक्व आणि सकस आहेत. ह्या संग्रहात एकूण रचनांशी असलेले गझलेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९४.७९% एवढे आढळते.

५. या नंतरच्या 'झंझावात' (८५.३९%) आणि 'सप्तरंग' (६२.९६%) ह्या संग्रहात गझलरचनेचा कल हळूहळू कमी होताना दिसतो.

६. सुरेश भटांचा मरणोत्तर २००७ मध्ये प्रकाशित झालेला 'रसवंतीचा मुजरा' (७.२३%) ह्या संग्रहात गझलरचनेचे प्रमाण सर्वांत कमी झाल्याचे आढळते. इतर संग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या रचनांचा समावेश ह्या संग्रहात असल्यामुळेही कदाचित असे घडले असावे.

ह्या २६३ गझलांमध्ये सुरेश भटांनी एकूण ४७ वृत्तांचा उपयोग केला आहे. त्यातील ४० अक्षरगणवृत्ते असून ७ मात्रावृत्ते आहेत. वृत्तानुसार गझलांची संख्या सारण्या करून पुढीलप्रमाणे दर्शविली आहे. प्रस्तुत ग्रंथातील 'गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण' या प्रकरणात प्रत्येक वृत्ताची लगावली उदाहरणासह आलेली आहे.


सारणी क्र. १ । ६ वृत्ते


वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
आनंदकंद         ३०
मंजुघोषा          २८
व्योमगंगा         २६
देवप्रिया         १६
वियद्गंगा         १५
राधा         १२
 एकूण       १२८

२६३ पैकी १२८ म्हणजे ४९ % गझला वरील ६ वृत्तांत आहेत.


सारणी क्र. २ । ५ वृत्ते

वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
मंदाकिनी        ११
हिरण्यकेशी        १०
लज्जिता        १०
स्रग्विणी         ८
सती त्रिरावृत्ता         ८
एकूण गझला        ४७

२६३ पैकी ४७ म्हणजे १८% गझला वरील ५ वृत्तांमध्ये आहेत.

सारणी क्र. १ आणि २ मिळून २६३ पैकी १७६ गझला म्हणजे ६७% वरील ११ वृत्तांमध्ये आहेत. ह्या शिवाय आणखी ११ वृत्ते अशी आहेत की, ज्यात कमीत कमी २ व जास्तीत जास्त ६ गझला आढळतात. त्यांची सारणी -

सारणी क्र.३ । ११ वृत्ते

वृत्ताचे नाव गझलांची संख्या
रंगराग          ६
 मेनका          ६
मृगाक्षी          ६
विद्युल्लता          ६
वैशाख          ४
भामिनी          ४
वीरलक्ष्मी          ३
पंचचामर          २
नाराच द्विरावृत्ता         २
स्वानंद सम्राट         २
साशंक          २
एकूण         ४३

२६३ पैकी १६ % म्हणजे ४३ गझला वरील ११ वृत्तांत आहेत.

सारणी क्र. ४ । १८ वृत्ते

वृत्ताचे नाव गझलांची संख्या
 आनंद त्रिरावृत्ता           १
भुजंगप्रयात          १
वैखरी           १
सौदामिनी           १
सुकेशी          १
'सु' कामिनी          १
विभावरी          १
प्रभाव           १
कामिनी           १
पुष्पप्रीति           १
प्रसूनांगी + लगा           १
मरीचिका           १
कलावती           १
शरयू           १
श्येनिका           १
*निर्विकार          १
*आरास          १
*चंद्रकोर          १
एकूण        १८

२६३ पैकी ७% म्हणजे १८ गझला वरील १८ वृत्तांमध्ये आहेत.

वरील १८ वृत्ते अशी आहेत की ज्यात सुरेश भटांनी केवळ प्रत्येकी एकच गझल लिहिली आहे.

तू समुद्र *निर्विकार नेहमीच !
मी तरंग! मी तुषार नेहमीच ! (सप्तरंग पृ. १००)

हरवले आयुष्य माझे; राहिले हे भास
 झगमगे शून्यात माझी आंधळी *आरास !    (रंग माझा वेगळा पृ. १६)

बाहेर मंद चांदण्यात पातली उषा
 माझ्या कुशीत मात्र * चंद्रकोर झोपली ! (रूपगंधा पृ. ६०)

* सुरेश भटांच्या गझलेतील 'निर्विकार, आरास, चंद्रकोर' हे लालित्यपूर्ण शब्द निवडून सबंधित वृत्तांचे नामकरण केले आहे.

 सारणी क्र. ५ । ७ मात्रावृत्ते

वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
बालानंद द्विरावृत्ता        ११
अनलज्वाला          ७
*श्रेय          ४
पादाकुलक           २
परिलीना          १
लवंगलता          १
हरिभगिनी          १
एकूण गझला 
       
       २७


२६३ पैकी १०% म्हणजे २७ गझला वरील ७ मात्रावृत्तांमध्ये आहेत.

मी असाच जगतांना जळणारच !
 सरणावर * श्रेय मला मिळणारच !

(सप्तरंग, पू. ६४)

*सुरेश भटांच्या गझलेतील 'श्रेय' हा लालित्यपूर्ण शब्द निवडून सबंधित वृत्तांचे नामकरण केले आहे.

सुरेश भटांच्या एकूण गझलांपैकी, २७ म्हणजे केवळ १०% गझला वरील मात्रावृत्तांमध्ये आहेत. ह्या २७ गझलांपैकी, सर्वाधिक ११ गझला 'बालानंद द्विरावृत्ता' ह्या मात्रावृत्तांमधील आहेत.

निष्कर्ष
...........
वरील ५ सारण्यांमधील संख्याशास्त्रीय मांडणीवरून निघणारे काही ठळक निष्कर्ष -

१. सुरेश भटांच्या २६३ पैकी १२८ म्हणजे ४९% गझला केवळ ६ वृत्तांमध्ये आहेत. (सारणी क्र.१)

२. सुरेश भटांच्या २६३ पैकी ६७% म्हणजे १७६ गझला  ११ वृत्तांमध्ये आहेत. (सारणी क्र.१+२)

३. सुरेश भटांच्या २६३ पैकी ७% म्हणजे १८ गझलांची वृत्ते अशी आहेत की, ज्या वृत्तांमध्ये प्रत्येकी केवळ एकच गझल आहे. (सारणी क्र.४)

४. सुरेश भटांच्या २६३ पैकी १०% म्हणजे २७ गझला मात्रावृत्तांमध्ये आहेत. त्यापैकी 'बालानंद द्विरावृत्ता' ह्या मात्रावृत्तामध्ये सर्वाधिक ११ गझला आहेत. (सारणी क्र.५)

५. 'आनंदकंद' हे सुरेश भटांच्या आवडीचे अक्षरगणवृत्त आहे. सुरेश भटांच्या २६३ पैकी ३१ गझला म्हणजे (११.७९%) जवळपास १२% गझला 'आनंदकंद' ह्या एकाच अक्षरगणवृत्तामध्ये आहेत. (सारणी क्र. १)

...............................................

24 comments:

  1. खूप छान लेख.

    ReplyDelete
  2. खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख! धन्यवाद!

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण लेख!

    ReplyDelete
  4. खूपच सखोल, सूक्ष्म अभ्यास करून सविस्तर व विश्लेषणात्मक माहिती एकाच ठिकाणी वाचायला मिळाली. मनापासून आभार,सर. . खूपच

    ReplyDelete
  5. अतिशय अभ्यासपूर्ण आणि मौलिक माहिती सर 🙏👍🌹

    ReplyDelete
  6. किती अभ्यासपूर्ण लेख आहे. यासाठी तुम्ही किती झोकून देऊन अभ्यास केला असेल, याची कल्पना लेख वाचून येते. किती गझला व प्रत्येक गझल कोणत्या वृत्तात - इतके डीटेल्स देण्यासाठी किती dedica, determination & devotion ...... !
    अशा विलक्षण चिकाटीला मानाचा मुजरा.🙏

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण. सुरेश भटांचे काव्य विश्व सांख्यिकीय दृष्टिकोनातून अभ्यासण्यासाठी फार उपयुक्त लेख आपण परिश्रमपूर्वक सादर केला याबद्दल आपले खूप अभिनंदन, सर.

      Delete
  7. बापरे... अतिशय सूक्ष्म अभ्यास केलात sr. अभ्यासपूर्ण लेख आणि तेवढाच मौलिक.

    ReplyDelete
  8. सर, सुरेश भटांच्या गझलांचे अभ्यासपूर्ण व अप्रतिम असे संख्याशास्त्रीय विश्लेषण आपण केले आहे. गझल अभ्यासकांसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद!

    ReplyDelete
  9. आदरणीय श्री श्रीकृष्ण नारायण राऊत सर ,
    सस्नेह नमस्कार!
    सर, आपण सुरेश भट कोळून प्यालात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपला गझलेचा ध्यास, अभ्यास आणि सहवास दांडगा आहे. गझलविधेचे इत्थंभूत ज्ञान, भाषेचे व्याकरण आणि तिच्या तंत्रा - मंत्रांची पखरण आपले निरनिराळे लेख, विवेचन आणि आपल्या गझलातून आम्ही अभ्यासतो आणि शिकतो आहोत. सुरेश भटांच्या काळातील आम्ही नसलो तरी आपल्या काळातील आणि सहवासातील आम्ही असल्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. गझल तंत्र आणि मंत्र शिकवण्याचे पेव फुटलेल्या काळात, स्वत:ला गझलेतले ज्ञानी म्हणविणारे आणि नवोदितांना गोंधळात टाकणारे खूप गझलगुरु आपले दुकान थाटून आहेत. अशा काळात आपल्या खिशातून खर्च करून गझलेचा प्रचार, प्रसार आणि नवोदितांचा उत्साह व गझलप्रेम वाढविण्याचे नि:शुल्क काम आपण तहहयात केले आहे... करता आहात! गझलकार सीमोल्लंघन आपल्या कर्तृत्वाचे प्रतिबिंब आहे. आपला गझल गोतावळा मोठा आहे. आपल्या कार्याला सलाम !!

    ReplyDelete
  10. ग्रेट!अतिशय सखोल आणि विश्लेषणात्मक माहितीपूर्ण लेख!🙏🏻💐

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर वर्गीकरण... आ. भट साहेबांच्या लिखाणातील सखोल अभ्यास 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  12. अगदी विस्तृत सांख्यिकीय लेख आहे, अभिनंदन सर👌🙏💐💐❤️❤️

    ReplyDelete
  13. गझलसम्राट सुरेश भट यांच्या सर्वच गझलांचे वृत्तविषयक सर्वांगीण अभूतपूर्व विश्लेषणात्मक अभ्यासपूर्ण कष्टसाध्य लेखन ! डॉ. राऊत सरांचे हार्दिक अभिनंदन !

    ReplyDelete
  14. अगदी सखोल अभ्यासपूर्वक माहिती, 👌👌
    खूप खूप अभिनंदन 🌹

    ReplyDelete
  15. सुरेश भट साहेबांच्या गझल लेखनाचा सविस्तर,सूक्ष्म,सखोल सांख्यिकी अभ्यास करून आपण या लेखात मांडणी केली आहे. त्यांच्या गझल लेखनाचा आलेख प्रथम चढता आणि नंतर उतरता आहे. सर्वात जास्त गझला त्यांनी 'एल्गार ' गझलसंग्रहामधे लिहिल्या आहेत. सर्वात जास्त गझला त्यांनी आनंदकंद या अक्षरात वृत्तात लिहिलेल्या आढळते. या वृत्तपत्रातील गझला अधिक लयबद्ध असतात. त्यांना संगीताची,तालाची,लक्ष्मीची गायनाची आवड होती हे यावरून स्पष्ट होते.सर्वच वृत्तात त्यांनी गझल लिहिल्या काहीत प्रातिनिधीक स्वरुपाच्या आहेत. ५१३ रचनांपैकी २६३ गझला आहेत. यावरून गझल लिहिणे हे सोपे नव्हते, हे लक्षात येते. त्यांनी नवनिर्मिती केली. त्यामुळे कमी गझला झाल्या असाव्यात. या सांख्यिकी लेखात स्पष्टता आलेली दिसते. गझलेलाच गझल म्हटलेले दिसते. कवितेला गझल म्हटले नाही. हे एकूण निरीक्षण आणि परीक्षणावरून दिसून येते. या सांख्यिकी माहितीवरून सुरेश भट साहेबांच्या गझलेचा चिकित्सक अभ्यास केलेला आढळतो. ही माहिती पी एच डी करणा-या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकते. विद्यापीठाने या ग्रंथाची दखल घ्यावी असाच आहे. अभ्यासपूर्ण लेख आहे. अभिनंदन व शुभेच्छा आपणास.
    अरुण हरिभाऊजी विघ्ने
    रोहणा ,आर्वी,जि.वर्धा

    ReplyDelete

    ReplyDelete
  16. खूप सुंदर माहितीपूर्ण लेख..

    ReplyDelete
  17. अभ्यासपूर्ण लेख, धन्यवाद सर 🙏🏻

    ReplyDelete
  18. सुक्ष्मातिसुक्ष्म अभ्यासपूर्ण विश्लेषण

    ReplyDelete
  19. सुरेश भटांनी आपल्या गझल रचनेत विविधांगी प्रयोग केलेत.नव्या पिढीला प्रेरणादायी असणारा व मार्गदर्शनपर मौलिक लेख.👌

    ReplyDelete
  20. सुरेश भटांच्या गजलेतील वृत्तांचे खूपच सुंदर विश्लेषण करण्यात आले. यामुळे नवीन गझल लेखकांना ज्या वृत्तामध्ये त्यांची आवड आहे त्या वृत्तामध्ये अधिक लिहिता येईल. गझल लिहिण्यासाठी वेगवेगळी वृत्ते माहीत असणे आवश्यक आहे हा गैरसमज दूर झाला. एखाद्या वृत्तामध्ये आपल्याला छान लिहिता येत असेल तर त्याच वृत्तामध्ये आपण अधिक लेखन करू शकतो. खूप छान मार्गदर्शन सर धन्यवाद.

    ReplyDelete