१.
वाट पाहत पावसाची मीच आभाळून गेलो
सारखे पाहून अंबर मी निळा होऊन गेलो
भेटल्यावर ती म्हणाली बोल काही बोल काही
शब्दही ना काढला मी आसवे ढाळून गेलो
काच असण्याची मला ही केवढी शिक्षा मिळाली
ज्योत होती ती..भडकली आणि मी तडकून गेलो
बंद केल्या पापण्या ह्या पाहण्यासाठी तिला मी
तेवढ्यापुरता मनाने मी तिच्या जवळून गेलो
पैलतीरावर नदीच्या वेदनेचे गाव आहे
ती तिथे राहून गेली मी पुढे वाहून गेलो
शांत पाण्यासारखी होती समाधी लागली पण
पाहण्यासाठी वलय माझे मला बुडवून गेलो
२.
पुन्हा खेळणे माझे बनणे नाही आता
या तुकड्याचे तुकडे जुळणे नाही आता
दोन पाखरे बसायची ज्या फांदीवरती
ऐकाचेही तेथे बसणे नाही आता
कुठला रस्ता कुठली गाडी काय सांगता
मलाच माझा प्रवास करणे नाही आता
गळून पडल्या कळ्या फुलांच्या फुलण्याआधी
पुन्हा कळ्यांचे हसून फुलणे नाही आता
बनून तारा तुटेन बाळा तुझ्याचसाठी
माझ्यासाठी माझे जगणे नाही आता
चित्रात तिने दोघांमध्ये दरी काढली
पुन्हा आमचे चित्र बदलणे नाही आता
पिंपळ सुचला मग बुद्धाची मूर्ती सुचली
याहुन सुंदर काही सुचणे नाही आता
३.
डोळे तुझे वाचायचे होते मला
डोहामधे उतरायचे होते मला
विसरून गेलो मी तुला भेटून की
लवकर घरी परतायचे होते मला
तुटतो जसा तारा तसा तुटलोय मी
बस एवढे सांगायचे होते मला
केले जगाने शेवटी करवत मला
घनदाट जंगल व्हायचे होते मला
मी जन्मभर असतो तिच्या डोळ्यांमधे
काजळ तिने बनवायचे होते मला
............................................

तीनही गझल सुंदर 👌
ReplyDelete