मा. संपादकांचे मनःपूर्वक आभार

   

































































तरही गझलचा वेगळा प्रयोग : सुरेशकुमार वैराळकर

 




मा.सुरेश भट यांचा मिसरा-

'तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा '


सामान्यतः तरही मिसरा गझलेच्या मतल्यात घेऊन लिहिलेल्या गझला वाचायला मिळतात. मात्र मा. सुरेशकुमार वैराळकर अण्णांनी या तरही गझलेत तरही मिसरा शेवटी घेऊन ही एक सुंदर गझल लिहिली आहे.

- देवदत्त संगेप




या फुलांना या ऋतुंना घेउद्या अदमास माझा

यार हो,अद्याप नाही संपला मधुमास माझा


का नवी आमंत्रणे देतेस आता तू अवेळी ?

जाहला हा ऐनवेळी मंद श्वासोश्वास माझा


काळजी ही लागलेली आसमंताला फुकाची

काय उल्हासाविना जाईल फाल्गुन मास माझा ?


लाघवी स्वातंत्र्य तुमचे व्यर्थ मी स्वीकारले पण

याहुनी होता बरा प्राचीन कारावास माझा


लावण्या, गझला, तराणे नित्य मी गातो पवाडे

(तज्ज्ञ म्हणती योग्य नाही स्वर तसा भजनास माझा) 


मी तसा इथल्या दिशांनी बांधल्या गेलो तरीही

तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा


 (मार्च २००७)

...............................................


तीन गझला : सौ. कविता शिरभाते






जरा समजावुनी सांगा कुणी या वेंधळीला

लळा का लागला आहे उन्हाचा सावलीला


तिच्या नाजूक ओठांवर गझल त्याने लिहावी

नसे याहून मोठी भेट एका प्रेयसीला 


फुलवताना अनेकांच्या  गुलाबी चांदरात्री 

किती रुततात काटे अंगभर त्या बाभळीला 


अरे सांभाळते संसार ती इतक्या खुबीने

तरी बांधून का घेतो तिला तू  दावणीला


२.


व्यस्त असल्याचे बहाणे, ठीक नाही

अन् मला विसरून जाणे, ठीक नाही 


आपली जर वाटते आहे तुला मी 

वागणे परक्याप्रमाणे, ठीक नाही


आठवांची ओल आहे पापणीला

विसरण्याचे गीत गाणे, ठीक नाही


सोडती जर जन्मदात्या मायबापा 

फोडणे केवळ फुटाणे, ठीक नाही


मानता लक्ष्मी मुलीला भूतलाची

सांगणे खोटेच नाणे, ठीक नाही


बाटल्या बेभाव विकती बारमध्ये

भाकरी निम्म्या दराने, ठीक नाही


३.


या जिव्हाळ्याचा जिवाला भार होताना

सांत्वनाला पाहिले बेजार होताना


केवढा छळतो तुझा हा व्यस्त आठवडा

रोज बघते मी तुझा रविवार होताना


माणसांनाही स्वतःची लाज वाटावी

पत्थरांचा रोज जयजयकार होताना


सूर्य होता येत नसल्याची नको चिंता

मेणबत्ती होउया अंधार होताना


बाब चिल्लर ही कशी खुर्द्यास समजेना

लायकीही लागते कलदार होताना


स्फोट झाल्यावर फटाक्याचा बळी जातो

ही व्यथा असते धमाकेदार होताना


दूरही गेली कधी जपते पिलांना तू

पाहिले आई तुला मी घार होताना

...............................................

आशयघनता ही गझलेची खरी ताकद

 

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मराठी गझल आता स्थिरावली आहे. अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, अनियतकालिके, दिवाळी अंक, आदिमध्ये मराठी गझलेला सन्मानाचे स्थान मिळते आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. सोळा वर्षांपूर्वी ब्लॉग स्वरुपात सुरू झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन' या वार्षिकांकात सहभाग नोंदविणाऱ्या गझलकारांची संख्या वाढतच आहे. मराठी गझल जनमानसात रुजावी म्हणून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या अनेक संस्था, मुशायरे आयोजक, गझलेची कार्यशाळा घेणारे अनेक अभ्यासक, व्हाट्सअपच्या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदींचा एकत्रित परिणाम म्हणजे मराठी गझल लिहिणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. याचे श्रेय निश्चितपणे या सर्वांना जाते. 'गझलकार' सीमोल्लंघन ह्या ऑनलाइन अंकाचे हे सतरावे वर्ष. २०२५ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर हा अंक प्रकाशित करताना आनंद होतो आहे. महाराष्ट्र आणि इतरही राज्यांना या वर्षी नैसर्गिक आपदेने हवालदिल करून सोडले आहे. आपदग्रस्तांच्या सोबत आपल्या सर्वांच्या संवेदना आहेतच. असे असूनही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गझलकार, अभ्यासकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकूण २१३  गझलकारांच्या गझला आणि २४ गझलविषयक लेख या अंकात समाविष्ट केले आहेत. गझलेच्या अवकाशात स्वच्छंदपणे विहरणाऱ्यांपैकी काही पक्षी आपल्याला सोडून गेलेत. त्यांचीही नोंद  'श्रद्धांजली' या सदरात घेतली आहे. नेहमीप्रमाणेच महिला गझलकारांची संख्या पुरुष गझलकारांच्या तुलनेत अधिक आहे. प्राप्त झालेल्या गझलांपैकी निवडक गझला या अंकात प्रकाशित केल्या आहेत. त्यांचा आस्वाद घ्यावा, प्रतिक्रिया द्याव्यात.

गझल ही मानवी संवेदनांशी संवाद साधण्याची कला आहे. जो संवाद घडवतो तो आशय. वृत्त ही केवळ तांत्रिक चौकट आहे. गझल म्हटली की वृत्त, काफिया, रदीफ यांची शास्त्रशुद्ध मांडणीतून अभिव्यक्त होऊन काळजाला हात घालणारी भावना असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. शब्दांची वृत्तबद्ध मांडणीच या काव्यप्रकाराला अधिक लयबद्ध करते. ही लयबद्धता कवीला सादरीकरणात आणि रसिकाला स्मरणात राहायला मदत करते. त्यामुळेच की काय गझल हा आजच्या काळातील लोकप्रिय काव्यप्रकार म्हणून ओळखला जातो आहे. 


गझलेचा उगम उर्दू-फारसी साहित्यपरंपरेत जरी झाला, तरी मराठीत तिने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. यासाठी खडतर प्रवास करताना माधवराव पटवर्धनांपासून आजच्या पिढीपर्यंत अनेक स्थित्यंतरे तिने बघितली आहेत. गझलेच्या  तंत्रशुद्ध साचेबद्ध आणि वृत्तबद्ध  मांडणीमुळे ती कवीलाही सहजसाध्य झाली नाही. अनेकांना प्रयत्न करूनही जमली नाही. त्यामुळेच ‘किती अचूक वृत्तात गझल लिहिली आहे’ यावरून कवीचा दर्जा ठरायचा. त्याचा परिणाम असा झाला की, जो तो शब्दांना फक्त तंत्रशुद्ध चौकटीत बसवायला लागला. या साचेबद्ध लिखाणालाच गझल म्हणू लागला.  परंतु जसजसा मराठी गझलेचा प्रवास पुढे गेला, तसतसे लक्षात येऊ लागले की तंत्र ही तर फक्त चौकट आहे. गझलेचा खरा आत्मा तिच्या आशयात आहे. गझलेच्या वृत्तातील शब्दांच्या मात्रांची नियंत्रित संख्या आणि त्यांची पुनरावृत्ती यामुळे काव्याला लयबद्धता प्रदान केली जाते. त्यामुळे त्यामध्ये नाद निर्माण होऊन संगीतात्मकता येते. रसिक, श्रोत्यांना गेयता, नादमाधुर्य आकर्षित करते, तसेच स्मरणातही राहते. पण त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, फक्त शब्दांना वृत्ताच्या साच्यात घातले म्हणजे गझल होत नाही. तर त्यातील आशयघनता रसिकाला बांधून ठेवते. वृत्तबद्धता गझलेच्या शिस्तीला निश्चितच बळकटी देते. पण ही शिस्त म्हणजे गझलेचा आत्मा नाही. एखादे गाणे कितीही सुंदर स्वरात असले तरी त्यात भाव नसतील, तर ते मनाला भिडत नाही. त्याचप्रमाणे गझल कितीही वृत्तबद्ध असली तरी तिचा आशय बोथट असेल, तर ती रसिकाच्या मनाला स्पर्श करत नाही. म्हणजेच गझलेचा आत्मा हा तिच्या आशयात आहे. आशय म्हणजे कवीने अनुभवलेले जीवन, त्याचे विचार, त्याचे भावविश्व, त्याची तत्त्वदृष्टी. जेव्हा गझलेत मानवी जीवनातील गुंतागुंत, समाजातील घडामोडी, निसर्गातील सौंदर्य, प्रेम-आर्तता, किंवा काळाच्या वेदना मांडल्या जातात, तेव्हा ती गझल वाचकाच्या काळजाला भिडते. आशयघन गझल म्हणजे शब्दांच्या केवळ सजावटीचा खेळ नव्हे, तर आर्त भावनांचा गहिरा अनुभव असतो. जेंव्हा गझलेच्या शेराशेरात वाचकाला स्वतःचे जीवनानुभव प्रतिबिंबित होताना दिसतात तेंव्हाच ती त्याला जवळची वाटू लागते. अशाच गझला, त्यातील शेर त्यांच्यातील मर्मस्पर्शी मूल्यांमुळे कालजयी होतात.


सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त ‘शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा’ असे लिहिले आहे. म्हणजेच ज्या वृत्तात शब्दरचनेच्या अंगाने सहजता आहे अशी अक्षरगणवृत्ते गझलेसाठी निवडली पाहिजेत असा संकेत दिला आहे.  म्हणून त्यांनी मात्रावृत्तांत लेखन केले नाही, असे नाही. पण फार थोडक्या गझलांमध्ये त्यांनी मात्रावृत्ते वापरलीत. शब्दरचनेतील  लयबद्धता आणि आशयघनता ज्या वृत्तांतून सहज मांडता येईल अशी वृत्ते निवडली पाहिजेत, ही त्यांची भावना होती. आजमितीला मराठीतील गझललेखनाची प्रवृत्ती मात्र आशयअभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तांकडून मात्रावृत्तांकडे वळताना दिसत आहे. यामुळे मराठी गझल आशयघन होत आहे, हे मान्य. परंतु गद्यप्राय मांडणीमुळे त्यातील गेयता, नादमाधुर्य हरवत चालले आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. 


ज्या कवींना गझलेचे तंत्र कळले, ते  अनेक वृत्तांत गझला लिहिता लिहिता, गझला पाडू लागले आहेत. गझल हजारी साजरी करू लागले आहेत. परंतु खेदाने नमूद करावे वाटते की, हे महाभाग वारंवार तेच काफिये, तेच रदीफ वापरून त्याच त्या रटाळ विषयांवर गझला लिहीत असतात. मान्यवरांच्या गझलसंग्रहांचे वाचन नाही. त्यावर चिंतन नाही. विविध समाजमाध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या गझला हेच त्यांचे वाचन. त्यामुळे त्यांच्या गझलेत प्रतिमांचे नाविन्य नाही. जीवनानुभूतीच्या जाणिवा नाहीत. अशा गझला आणि गझलकारांना काळ कितीवेळ लक्षात ठेवेल? या उलट ज्यांनी आपल्या गझलांतील प्रतिमा आणि जाणिवांच्या बळावर गझलेच्या प्रांतात सर्वोच्च स्थान निर्माण केले ते सुरेश भट मात्र मोजक्या वृत्तांत गझला लिहितात. त्यांनी २६३ गझलांसाठी फक्त ४० अक्षरगणवृत्ते आणि ७ मात्रा वृत्ते वापरली आहेत. त्यांच्या निम्म्या गझला केवळ ६ वृत्तांत आहेत. म्हणजेच एखाद्या वृत्तावर एकदा पकड बसली की कवीला कोणताही आशय, विषय त्या वृत्तातून मांडता येतो. काय, कसे आणि कुणासाठी लिहायचे; हे कवीला कळले की तो वाचकाच्या-रसिकांच्या मनात त्याचे स्थान निश्चित करतो. 


जीवनाची बाह्य परिस्थिती काळानुसार बदलत असते. परंतु जीवनमूल्ये शतकानुशतके अपरिवर्तित राहतात. बदलत्या परिस्थितीचे, काळाचे संदर्भ,  बदललेल्या संस्कृतीने दिलेल्या नव्या प्रतिमा गझलेला अधिक कालसापेक्ष बनवत असतात. त्यामुळे वृत्तातील नाविन्यापेक्षा आशयाच्या बदलत्या स्वरूपावर भर देणे समयोचित ठरते. तंत्रामुळे गझलेत लय, नाद, संगीत आणि घाटदार सौंदर्य येते, पण आशयामुळे मनाला स्पर्श करण्याची संधी मिळते. वृत्त वाचकाला केवळ सांगीतिक आनंद देते. पण आशय वाचकाला  अनुभूती देतो. गझल ऐकून-वाचून झाल्यावर कदाचित शब्दांची लय एकवेळ विसरली जाऊ शकेल पण गझलेतील शेराचा भावार्थ मात्र कायम लक्षात राहतो. एखादी गझल ऐकताना लोकांना तिची वृत्तबद्ध बांधणी कितपत आठवते? प्रत्यक्षात आठवते ती भावस्पर्शी ओळ, विचार, प्रतिमा. यावरून लक्षात येते की गझलेचे दीर्घकालीन मूल्य आशयघनतेत असते. प्रत्येक काळात नवे प्रश्न, नव्या संवेदना उदयास येतात. प्रत्येक गझलकाराच्या गझलेत ते प्रतिबिंबित होणे अपेक्षित असते. 


आशयघनता ओघाने येत नसते तर ती जाणीवपूर्वक आणावी लागते. वेगवेगळे विषय, संवेदना गझलेतून मांडाव्या लागतात. मराठी गझल लोकप्रिय होतेय कारण प्रत्येक कवी त्यात त्याचे योगदान देतो आहे. कुणी शहरी एकाकीपणा मांडला,  कुणी ग्रामीण जीवनाचे हाल सोप्या भाषेत उलगडले, कुणी सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर कुणी प्रेमाच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक चिंतन  गझलेत आणले, तर कुणी तंत्रज्ञानाच्या युगातील माणसाचे बदलते आयुष्य शब्दबद्ध केले. एकूणच काय तर या सार्वत्रिक प्रयत्नांनी गझलेच्या कक्षा विस्तारल्या. जर गझलकार फक्त वृत्ताच्या शिस्तीत, तंत्रातच अडकून राहिले असते, तर मराठी गझल एवढी लोकप्रिय झाली नसती.


गझल ही वृत्तबद्ध शब्दकळा नसून जीवनाशी एकरूप होणारा काव्यप्रकार आहे. वृत्त हा गझलचा देह आहे तर आशय हा तिचा हा आत्मा आहे. वाचकाला आकर्षित करणारी गझल ती आहे, जी त्याच्या भावविश्वाला स्पर्श करते. म्हणूनच मराठी गझलेत वृत्ताच्या नाविन्यापेक्षा प्रतिमांचे नाविन्य आणि आशयघनता हेच खरे महत्त्वाचे घटक ठरतात. गझलेचा खरा उद्देश हा मानवी मनाला स्पंदित करणे आहे. स्पंदन घडवणारे माध्यम म्हणजे आशय. वृत्त गझलेला आकार देते, पण प्राण ओतण्याचे काम मात्र आशयच करतो. हा आशय म्हणजे विशुद्ध कवितेतील कलेसाठी कला मांडणारी शब्दकोडी नसावी. तर माणसांचे समकालीन प्रत्यक्ष जगणे, त्याच माणसांच्या साध्या पण परंपरागत प्रतिमांकित भाषेत अभिव्यक्त करणे होय. त्यामुळे मराठी गझलेच्या प्रवासाकडे पाहिले तर ठामपणे म्हणता येते – गझलेची खरी ताकद ही तिच्या आशयघनतेत आहे, वृत्ताच्या चौकटीत नव्हे.

अकोलास्थित सुप्रसिद्ध चित्रकार श्री. सतीश पिंपळे यांनी या वर्षीच्या अंकालाही अतिशय सुंदर, बोलके छायाचित्र मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या लेखन सहकार्याने हा अंक साकार होऊ शकला, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आजतागायत ‘गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.


...............................................

तीन गझला : अर्जुमनबानो शेख

 




१.

गर्द सावली दिसे कुठेना
ओली ममता मिळे कुठेना

भेटीगाठी नित्याच्या पण
सूर मनाचा जुळे कुठेना

बाग बहरली म्हणतोय खरे
कळी मोकळी हसे कुठेना

सर्वांना जी सोबत घेई
अशी पालखी निघे कुठेना

चार बंगले नावी त्याच्या
शांती,संयम वसे कुठेना

सूर्य लोळतो अंगणात पण
किरण सुखाचा पडे कुठेना

गल्लोगल्ली ज्ञानमंदिरे
अस्सल मानव घडे कुठेना

२.

होईल तुझ्या मनासारखे करून तर बघ
भल्या-बुऱ्याला आग लावुनी जगून तर बघ

व्यर्थ कशाला नाव ठेवितो जगास या तू
स्वतःच आधी मानव म्हणुनी घडून तर बघ

तुला वाटते तसे कदाचित घडेलही जग
नवक्रांतीची मशाल हाती धरून तर बघ

जिद्द, चिकाटी अंगी बाणव सर्वार्थाने
कठीण नाही शिखर यशाचे, चढून तर बघ

रणांगणी ह्या तूच विजेता ठरणार खरा
स्वार्थ त्यागुनी जनकल्याणा लढून तर बघ

कळणार तुला कष्ट खरोखर पोशिंद्याचे
माथ्यावरच्या उन्हात थोडे खपून तर बघ

कष्ट वेचले अमाप ज्यांनी तुझ्याचसाठी
त्यांच्यासाठी एकदा तरी झटून तर बघ

३.

मायच होते पाठीराखी रडलेच कुठे जर मी
आभाळाची साथ पित्याची हरलेच कुठे जर मी

समर्पणाने त्यांनी माझी अशी मशागत केली
शिक्षा भारी गुरूजनांची घडलेच कुठे जर मी

संकट समयी आधाराची काठी होते ताई
हात धरोनी वाट दावते अडलेच कुठे जर मी

पाठीवरती हात ठेवुनी हिंमत देतो दादा
'मी आहे ना?'मला सांगतो फसलेच कुठे जर मी

जातोय जरी दूर घराच्या सखा काळजी घेतो
तत्पर असतो सेवेत सदा थकलेच कुठे जर मी

गब्बू होता बाक मागचा सखया उनाड साऱ्या
धावत येती सर्व आजही पडलेच कुठे जर मी

वर्चस्वाचे स्तोम माजले जिकडे-तिकडे हल्ली
खरा मार्गदिप ठरते घटना नडलेच कुठे जर मी

ह्रदयामध्ये विश्वासाची गाठ बांधुनी असते
दुःखांचाही उत्सव करते खचलेच कुठे जर मी

कुणीतरी तो डोक्यावरती हात कृपेचा धरतो
अलगद हाती उचलुन घेतो ढळलेच कुठे जर मी
.............................................
अर्जुमनबानो शेख
बल्लारपूर, जि-चंद्रपूर
मो:-8055947453

तीन गझला : सोपान डोके

 




१.

पेरलेल्या या पिकाला भाव आहे का?
शेत कसणे हा जुगारी  डाव आहे का?

प्रेम माया  स्नेह सारा आटला आता
सांग पूर्वी सारखा तो गाव आहे का?

सांग मित्रा  ढाळतो अश्रू असे का तू
काळजाला खोल तुझ्या घाव आहे का

काळजी नाही जराही दीन दुबळ्यांची
गावचा नक्की खरा तो राव आहे का?

उच्च काही  शूद्र काही  निर्मिले कोणी
ईश्वरापाशी दुजा हा  भाव  आहे  का?

२.

पेटला  जर आठवांचा जाळ मित्रा
काळजाला तू जरा  सांभाळ मित्रा

कोणते कोठे कसे लावू ठिगळ मी?
फाटले आहे  तुझे  आभाळ  मित्रा

देव  आहे  तो  भुकेला  भावनेचा
कर्मकांडाचे  नको  जंजाळ  मित्रा

ती  सुखाने नांदते आहे  घरी त्या
भेटणे आता  तिला तू टाळ  मित्रा

झिजविला कष्टात ज्याने देह सारा
एकदा बापास त्या कवटाळ मित्रा

३.

माणसाचे पंख कोणी छाटले हो
भेद जातीचे  कशाला थाटले हो

लाल आहे रक्त साऱ्या माणसांचे
स्पर्श होता माणसे का बाटले हो

ठेवला नेऊन  कोठे  देश  माझा
फक्त त्यांनी श्रेय सारे लाटले हो

मित्र झाला एकटा आधार माझा
मेघ  जेव्हा  संकटाचे  दाटले हो

कोण होती ती मला ठाऊक नाही
चित्र  सुंदर  एक  मी 
रेखाटले हो
...............................
सोपान ज्ञानोबा डोके
मो.9518707344

गझल : अभिषेक उदावंत




भक्ती असेल भारी

विठ्ठल बसेल दारी


अंगावरील काटा

सांगेल गोष्ट सारी


चोहीकडे हरामी

रडते इमानदारी


होईल मग तमाशा

जर भांडशील दारी


मोजून घ्या कुठेही

पापात पुण्य भारी


भेटेल सर्व काही 

तितकी हवी हुशारी


धंदा कसा बुडाला

हे सांगते उधारी

...........................................

तीन गझला : मनीषा नाईक

 



१.


डोळ्यांमधले अथांग पाणी म्हणजे तू 

ओठावरचे हसू गुलाबी म्हणजे तू 


एखादी नशा हवी जर जगण्यासाठी 

माझ्यासाठी मदिरा साकी म्हणजे तू


प्रवास तर आहे खडतर आयुष्याचा

गर्द सावली, जंगल झाडी म्हणजे तू


सुखदुःखाचा रिचवत प्याला जगते मी

जगण्यामधली एक खुमारी म्हणजे तू


श्वासांचा नियमित दिनक्रम चालू असतो

कळ एखादी काळजातली म्हणजे तू


फक्त उन्हाळा ऋतू दिला आयुष्याने

सर एखादी खास मृगाची म्हणजे तू


तुझ्याविना जगणे माझे जगणे नाही

चीज जरूरी श्वासाइतकी म्हणजे तू


आभासी, नश्वर आहे जगात सारे 

फक्त शाश्वती नात्यामधली म्हणजे तू

 

या देहाचा पाचोळा झाल्यावरती

एखादी पडलेली ठिणगी म्हणजे तू


२.


कुणा खेद, चिंता उद्याची नसावी 

नवी रोज आशा इथे जन्म घ्यावी  

 

गळा भेट होता इथे माणसांची 

मनातील कटुता दरी नष्ट व्हावी   


खलांचा जनातील संहार व्हावा 

अशी एक होळी इथे पेटवावी 


इथे वाढवा जंगले दाट वस्ती 

मुला पाखरांनीच शाळा भरावी 


निळा सावळा रंग व्यापून जावा     

इथे आज राधा पुन्हा कृष्ण व्हावी 


पडू दे दिमाखात पाऊस पहिला 

सुखाने नदीपात्र इथली भरावी 


भुकेल्या जिवांची प्रतीक्षा सरावी 

नव्याने धरा आज गर्भार व्हावी 


गुलाबी मनाने पुन्हा भिरभिरावे  

ऋतूंची फुलांना पुन्हा हाक यावी 


पुन्हा सार या जीवनाचे कळावे   

पुन्हा सर्व सृष्टी इथे बुद्ध व्हावी


३.


एकाच किनाऱ्यावर दोघे 

बहुधा होऊ सागर दोघे 


बरेच काही मनात आहे 

बोलू , पण सुचल्यावर दोघे 


वाद नको कुठल्या मुद्यावर 

दोघे चूक, बरोबर दोघे 


थोडे थोडे सरकत राहू 

खोडू मधले अंतर दोघे 


एकमेकात मिसळत गेलो

दोघे पाणी, साखर दोघे 


ठसठसणाऱ्या जखमेवरती  

हसून घालू फुंकर दोघे 


ऊन, पाऊस सोसत गेलो

म्हणून बनलो कणखर दोघे 


मिठीत आलो मग दरवळलो

बहुधा झालो अत्तर दोघे

............................................

तीन गझला : सौ. पुष्पा नं. पोरे

 




१.


जरी मोगऱ्याला उराशी धरावे

सुगंधास त्याच्या कसे आवरावे?


तसाही तुझ्या आठवांचाच दरवळ

किती मी स्वतःला कसे सावरावे? 


नको स्पर्श देऊ तरी साथ माझी

अशा या क्षणांनी कुठे मोहरावे?


मनाच्या बगीच्यात तू रोज फुलतो

तुला सांग आता कसे विस्मरावे?


कधी शब्द ओले कधी मौन का हे?

हळू तू सुखाला जसे पांघरावे


जरा ये विसाव्यास विसरू जगाला

जुने तेच काही नव्याने करावे 


प्रकाशाविना का दिसे विश्व पुष्पा?

अता तू मनाच्या गवाक्षी उरावे


२.


तुझ्याविना कळी तिची फुलायचीच राहिली 

जगायची कला तिला शिकायचीच राहिली


जणू मिठीत स्वर्ग हा किती हवा किती नवा 

नकोच आवरू तिला भिजायचीच राहिली


गुलाब तू सुवास तू तुझेच स्वप्न पाहते

अजून रात्रही तिची सरायचीच राहिली


लगा लगा लगा लगा लगावलीस भाळले

कलिंदनंदिनी तरी लिहायचीच राहिली


चितेवरी जरी सख्या तुझीच वाट पाहिली

अखेर पुष्प भेट ही घडायचीच राहिली


३.


माणूस 'मी'पणाचा बंदा गुलाम आहे

संस्कार सभ्यतेला देतो विराम आहे


विश्वास ऐनवेळी विश्वासघात करतो

करते दुरून मीही त्याला सलाम आहे


लंघून सागराला आले तुझ्याचसाठी

ही प्रीत अंतरीची हृदयात ठाम आहे


तोडून मौन सारे घे ना मिठीत लवकर

अर्पण करावया मी आले तमाम आहे


माहोल मैफलीचा का बाधतो तुला हा?

छेडून सूर आता केला निलाम आहे


दुर्भाग्य हे तिचे की तू रूप पाहतो अन् 

लावण्य नर्तिकेच्या नृत्यात धाम आहे


रस्त्यात कृष्णवेडी लावून आस जीवा 

राधेस सांग पुष्पा माझाच श्याम आहे.

...........................................

सौ.पुष्पा नं पोरे

मो.9271622483

सुरेश भटांच्या गझलांची वृत्तेः सांख्यिकीय विश्लेषण : श्रीकृष्ण राऊत

 



कविवर्य सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी विदर्भातील अमरावती येथे झाला. १९५५ ला त्यांनी गझललेखनास प्रारंभ केला. सुरेश भटांचे सहा संग्रह प्रकाशित आहेत. प्रत्येक संग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित होण्याचे वर्ष पुढीलप्रमाणे -
१. रूपगंधा, १५ मार्च १९६१
२. रंग माझा वेगळा, १९७४
३. एल्गार, १९८३
४. झंझावात, १९९४
५. सप्तरंग, २००२
६. रसवंतीचा मुजरा, २६ जानेवारी २००७
१४ मार्च २००३ ला सुरेश भटांचे नागपूर येथे निधन झाले. त्यांचा 'रसवंतीचा मुजरा' हा शेवटचा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. नागपूर ये संपन्न झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य सुः भट स्मृती गझलवाचन सत्र ठेवले होते. त्या सत्राचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मला मिळाली होती. त्या सत्रात ४ फेब्रुवारी २००७ ला 'रसवंतीचा मुजरा' ह्या संग्रहाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. अगोदरच्या पाच संग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या कविता ह्या शेवटच्या संग्रहात आहेत .
१९५५ ते २००३ ह्या ४८ वर्षांच्या कालखंडात सुरेश भट यांनी एकूण ५१३ कविता लिहिल्या त्यापैकी २६३ गझला आहेत. त्या संग्रहनिहाय पुढीलप्रमाणे -

संग्रहाचे नाव      एकूण   रचना   गझलांची संख्या प्रतिशत प्रमाण
रूपगंधा ७२पैकी  ०७गझला   ९.७२ %
 रंग माझा   वेगळा ९२ पैकी ३२ गझला ३४.७८%
एल्गार ९६ पैकी ९१ गझला ९४.७९%
 झंझावात ८९ पैकी ७६ गझला ८५.३९%
सप्तरंग ८१ पैकी ५१ गझला ६२.९६%
रसवंतीचा

मुजरा
८३ पैकी ०६ गझला  ७.२३ %
एकूण ५१३पैकी  २६३गझला ५१.२७%


वरील सारणीमध्ये आलेल्या सांख्यिकीय विश्लेषणाचा विचार केल्यास, सुरेश भटांचा गझलरचनेकडे असणारा कल दर्शविणाऱ्या खालील निष्कर्षाप्रत पोहचू शकतो.

१. एकूण ५१३ पैकी २६३ गझला म्हणजेच निम्म्याहून अधिक (५१.२७%) रचना गझल काव्यप्रकारातील आहेत. गझलेव्यतिरिक्त इतर काव्यप्रकारातील कवितांमध्ये काही गीते आणि मोजक्या मुक्तछंदातील कविता आहेत. 'रंग माझा वेगळा' हे त्यांच्या काव्यप्रवासातील असे वळण आहे, जेथे त्यांचे गीतलेखन मागे पडलेले दिसते. सुरेश भटांची काव्यजाणीव कशी विकसित होत गेली, याचा टप्प्यांनुसार विचार करायचा म्हटले तर त्यांचा संग्रहांचा क्रम पुढीलप्रमाणे विचारात घ्यावा लागेल -

१) रसवंतीचा मुजरा, २००७

२) रूपगंधा, १५ मार्च १९६१

३) रंग माझा वेगळा, १९७४

४) एल्गार, १९८३

५) झंझावात, १९९४

६) सप्तरंग, २००२

२. 'गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी कवी असला पाहिजे. ही गझलेची पूर्व अट आहे', हे सुरेश भटांनी बाराखडीत सांगितले आहे. त्यांचा एकूणच काव्यप्रवास बघतात कवी असणे वरील सांख्यिकीय विश्लेषण बघता सिद्ध होते.

३. गझल ह्या प्रभावी काव्यप्रकाराकडे त्यांचा कल 'रंग माझा वेगळा' (३४,७८%) ह्या संग्रहात वाढल्याचे दिसून येते.

४. १९७४ मध्ये प्रकाशित झालेल्या 'रंग माझा वेगळा' ह्या संग्रहानंतर १९८३ मध्ये 'एल्गार' हा संग्रह प्रकाशित झाला. १९७४ ते १९८३ ह्या ९ वर्षांच्या कालखंडात सुरेश भटांचा गझलरचनेकडे झुकलेला कल परमोच्च बिंदूपर्यंत पोचल्याचे दिसते. 'एल्गार' मधील बहुतांश गझला गैरमुसलसल ह्या प्रकारातील असून आशयदृष्ट्या त्या अधिक परिपक्व आणि सकस आहेत. ह्या संग्रहात एकूण रचनांशी असलेले गझलेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९४.७९% एवढे आढळते.

५. या नंतरच्या 'झंझावात' (८५.३९%) आणि 'सप्तरंग' (६२.९६%) ह्या संग्रहात गझलरचनेचा कल हळूहळू कमी होताना दिसतो.

६. सुरेश भटांचा मरणोत्तर २००७ मध्ये प्रकाशित झालेला 'रसवंतीचा मुजरा' (७.२३%) ह्या संग्रहात गझलरचनेचे प्रमाण सर्वांत कमी झाल्याचे आढळते. इतर संग्रहात समाविष्ट होऊ न शकलेल्या रचनांचा समावेश ह्या संग्रहात असल्यामुळेही कदाचित असे घडले असावे.

ह्या २६३ गझलांमध्ये सुरेश भटांनी एकूण ४७ वृत्तांचा उपयोग केला आहे. त्यातील ४० अक्षरगणवृत्ते असून ७ मात्रावृत्ते आहेत. वृत्तानुसार गझलांची संख्या सारण्या करून पुढीलप्रमाणे दर्शविली आहे. प्रस्तुत ग्रंथातील 'गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण' या प्रकरणात प्रत्येक वृत्ताची लगावली उदाहरणासह आलेली आहे.


सारणी क्र. १ । ६ वृत्ते


वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
आनंदकंद         ३०
मंजुघोषा          २८
व्योमगंगा         २६
देवप्रिया         १६
वियद्गंगा         १५
राधा         १२
 एकूण       १२८

२६३ पैकी १२८ म्हणजे ४९ % गझला वरील ६ वृत्तांत आहेत.


सारणी क्र. २ । ५ वृत्ते

वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
मंदाकिनी        ११
हिरण्यकेशी        १०
लज्जिता        १०
स्रग्विणी         ८
सती त्रिरावृत्ता         ८
एकूण गझला        ४७

२६३ पैकी ४७ म्हणजे १८% गझला वरील ५ वृत्तांमध्ये आहेत.

सारणी क्र. १ आणि २ मिळून २६३ पैकी १७५ गझला म्हणजे ६७% वरील ११ वृत्तांमध्ये आहेत. ह्या शिवाय आणखी ११ वृत्ते अशी आहेत की, ज्यात कमीत कमी २ व जास्तीत जास्त ६ गझला आढळतात. त्यांची सारणी -

सारणी क्र.३ । ११ वृत्ते

वृत्ताचे नाव गझलांची संख्या
रंगराग          ६
 मेनका          ६
मृगाक्षी          ६
विद्युल्लता          ६
वैशाख          ४
भामिनी          ४
वीरलक्ष्मी          ३
पंचचामर          २
नाराच द्विरावृत्ता         २
स्वानंद सम्राट         २
साशंक          २
एकूण         ४३

२६३ पैकी १६ % म्हणजे ४३ गझला वरील ११ वृत्तांत आहेत.

सारणी क्र. ४ । १८ वृत्ते

वृत्ताचे नाव गझलांची संख्या
 आनंद त्रिरावृत्ता           १
भुजंगप्रयात          १
वैखरी           १
सौदामिनी           १
सुकेशी          १
'सु' कामिनी          १
विभावरी          १
प्रभाव           १
कामिनी           १
पुष्पप्रीति           १
प्रसूनांगी + लगा           १
मरीचिका           १
कलावती           १
शरयू           १
श्येनिका           १
*निर्विकार          १
*आरास          १
*चंद्रकोर          १
एकूण        १८

२६३ पैकी ७% म्हणजे १८ गझला वरील १८ वृत्तांमध्ये आहेत.

वरील १८ वृत्ते अशी आहेत की ज्यात सुरेश भटांनी केवळ प्रत्येकी एकच गझल लिहिली आहे.

तू समुद्र *निर्विकार नेहमीच !
मी तरंग! मी तुषार नेहमीच ! (सप्तरंग पृ. १००)

हरवले आयुष्य माझे; राहिले हे भास
 झगमगे शून्यात माझी आंधळी *आरास !    (रंग माझा वेगळा पृ. १६)

बाहेर मंद चांदण्यात पातली उषा
 माझ्या कुशीत मात्र * चंद्रकोर झोपली ! (रूपगंधा पृ. ६०)

* सुरेश भटांच्या गझलेतील 'निर्विकार, आरास, चंद्रकोर' हे लालित्यपूर्ण शब्द निवडून सबंधित वृत्तांचे नामकरण केले आहे.

 सारणी क्र. ५ । ७ मात्रावृत्ते

वृत्ताचे नाव  गझलांची संख्या
बालानंद द्विरावृत्ता        ११
अनलज्वाला          ७
*श्रेय          ४
पादाकुलक           २
परिलीना          १
लवंगलता          १
हरिभगिनी          १
एकूण गझला 
       
       २७


२६३ पैकी १०% म्हणजे २७ गझला वरील ७ मात्रावृत्तांमध्ये आहेत.

मी असाच जगतांना जळणारच !
 सरणावर * श्रेय मला मिळणारच !

(सप्तरंग, पू. ६४)

*सुरेश भटांच्या गझलेतील 'श्रेय' हा लालित्यपूर्ण शब्द निवडून सबंधित वृत्तांचे नामकरण केले आहे.

सुरेश भटांच्या एकूण गझलांपैकी, २७ म्हणजे केवळ १०% गझला वरील मात्रावृत्तांमध्ये आहेत. ह्या २७ गझलांपैकी, सर्वाधिक ११ गझला 'बालानंद द्विरावृत्ता' ह्या मात्रावृत्तांमधील आहेत.

निष्कर्ष
...........
वरील ५ सारण्यांमधील संख्याशास्त्रीय मांडणीवरून निघणारे काही ठळक निष्कर्ष -

१. सुरेश भटांच्या २६३ पैकी १२८ म्हणजे ४९% गझला केवळ ६ वृत्तांमध्ये आहेत. (सारणी क्र.१)

२. सुरेश भटांच्या २६३ पैकी ६७% म्हणजे १७५ गझला  ११ वृत्तांमध्ये आहेत. (सारणी क्र.१+२)

३. सुरेश भटांच्या २६३ पैकी ७% म्हणजे १८ गझलांची वृत्ते अशी आहेत की, ज्या वृत्तांमध्ये प्रत्येकी केवळ एकच गझल आहे. (सारणी क्र.४)

४. सुरेश भटांच्या २६३ पैकी १०% म्हणजे २७ गझला मात्रावृत्तांमध्ये आहेत. त्यापैकी 'बालानंद द्विरावृत्ता' ह्या मात्रावृत्तामध्ये सर्वाधिक ११ गझला आहेत. (सारणी क्र.५)

५. 'आनंदकंद' हे सुरेश भटांच्या आवडीचे अक्षरगणवृत्त आहे. सुरेश भटांच्या २६३ पैकी ३१ गझला म्हणजे (११.७९%) जवळपास १२% गझला 'आनंदकंद' ह्या एकाच अक्षरगणवृत्तामध्ये आहेत. (सारणी क्र. १)

...............................................

श्रीकृष्ण राऊत यांच्या चार मराठी गझलांचा गुजराती अनुवाद : हेमंत पुणेकर





१.

● मराठी गझल :


हद्द झाली उधार खाण्याची

जाळते काळजी किराण्याची.


थांब डोळे भरून पाहूदे

काय घाई लगेच जाण्याची.


काम सोडू नको हमालीचे

सोय लावेल कोण दाण्याची?


दोष मातीवरी नका लावू

वांझ थैली निघे बियाण्याची.


पळवली प्रेमिका दिवाण्याने

पत्रिका ना जुळे शहाण्याची


तडफडे पाखरू तहानेने

ओल नाही कुठेच पाण्याची


● गुजराती अनुवाद


हद थई गई उधार खावानी बाळे छे काळजी किराणांनी


थोब आंखो भरीने जोवा दे शुं उतावळ तरत नीकळवानी


काम छोडीश नहि हमालीनुं कोण करशे व्यवस्था दाणानी


दोष माटीने ना दे, वात तो छे आ बियारणनां वांझ होवानी


गांडो तो प्रेमिका भगाडी गयो कुंडळी पण मळे न शाणानी


तरफडे छे तरसथी पंखी आ क्यां छे भीनाश पाणियारानी


२.

● मराठी गझल :


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती?

तुझे चाहते कोण जाणे किती!


मला नाव माझे स्मरेना प्रिये;

तुला पाठ झाले उखाणे किती!


गझल, गीत, कविता, रुबाई अशी-

तुझी राहण्याची ठिकाणे किती.


किती जीवघेणा अबोला तुझा;

मला जाळण्याचे बहाणे किती!


● गुजराती अनुवाद :


हसे स्हेज तुं तो फिदा केटला?  

खबर छे, पड्या प्रेममां केटला! 


मने नाम मारुं स्मरे ना प्रिया 

छे महेंदीमां अक्षर छुपा केटला! 


गझल, गीत, कविता, रुबाई कदी

तने स्थान रहेवा मळ्या केटला


छे जीवलेण तारा अबोला प्रिये 

बहाना मने बाळवा केटला!


३.

● मराठी गझल :


पापण्यांनी खोल केले वार तू;

सात माझे जन्म केले ठार तू.


ह्या फुलांनी मान खाली घातली;

कोणता केला असा शृंगार तू?


काल जेव्हा तोल जाऊ लागला;

लाजण्याचा घेतला आधार तू.


हासुनी तू प्राण माझा घेतला;

चुंबुनी केले किती सत्कार तू!


● गुजराती अनुवाद :


ज्यां कऱ्या पांपणथी ऊंडा वार ते 

सात मारा जन्म माऱ्या ठार ते


आ फुलोए शीश झुकावी लीधुं 

एवो तो शानो कर्यो शृंगार ते 


ज्यारे मारी ओर ढळवा लागी तुं 

लाजवानो लीधो'तो आधार ते 


प्राण मारा लई लीधा एक स्मितथी 

ने कऱ्या चुंबनथी कंई सत्कार ते


४.

● मराठी गझल :


ओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल;

हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझल.


त्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला;

बोलताना मोकळे ती हासली गाली गझल.


तू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला;

फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझल.


पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी;

एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल


● गुजराती अनुवाद :


होठ मारा चूमवा होठो उपर आवी गझल 

हाथ लेता हाथमां थै प्रेयसी मारी गझल 


खंजनोना बे वमळथी जीव मारो लई लीधो 

बोले त्यारे मोकळुं ए गालमां हसती गझल 


हे विधाता लख ललाटे संकटोनी शृंखला

एनी साथे लखजे बस तकदीरमां थोडी गझल 


स्वर्गमां पहोंच्यो पछी अफसोस एक ज थाय छे  

नीचे भूली आव्यो छुं हुं एक् मने गमती गझल

...............................................

तीन गझला : अनंत नांदुरकर 'खलिश'

 




१.


तुझी याद येते गुलाबासवे, तुझा मोगरा मग छळू लागतो

पुन्हा दोन त्या हासऱ्या पाकळ्या, पुन्हा भास तो दरवळू लागतो 


जिथे सावलीही नसे आपुली, तिथे आपुला काय शोधायचा

उन्हे उतरणीला जशी लागती, तसा मी इथे मावळू लागतो


रिता मी रिते घर रिता हा चषक, इथे सर्व काही रिते भोवती

युगाच्या तहानेस ओलावया, जुना थेंब मग साकळू लागतो 


न मी मोकळा हाय झालो कधी, न तू मोकळी मान्य होते मला

कशाला कवड़सा धरावा मुठी, धरावा तसा तो पळू लागतो


नका बोलवू चांदण्यानो मला, कधीचा विसरलो तुम्हा मोजणे 

अता मोजु द्या श्वास माझे मला, अता मीच माझा ढळू लागतो


पुन्हा छेड़ली आज त्याने गझल, पुन्हा मारवा कातरू लागला

कसा त्यास सांगू असे ऐकता, कसा मी गड्या भळभळू लागतो


२.


सोड भिक्षा उशीर झाल्यावर

जाणिवा या फकीर झाल्यावर


ऐक तोवर खळाळ अश्रूंचा

ओठ बोलेल धीर झाल्यावर


हंस संपेल ना इथे वेड्या

हे तुझे नीर-श्रीर झाल्यावर


शून्य होतील बेरजा सगळ्या

अस्मिता या बधीर झाल्यावर


शब्द विणतील शेर जगण्याचे

मन तुझे रे, कबीर झाल्यावर


प्रत्ययाची कलंदरी गालिब

ही कळे फक्त मीर झाल्यावर


३.                         


मन शब्दांनी बोलत नाही

जग डोळ्यांना मोजत नाही


दूर कशाला जातो इतका

घरचेही तर समजत नाही


आकाशी डोळा इच्छेचा

कुठला तारा निखळत नाही


सांगायाचे दिवसच गेले

फोडुन घ्या जर बघवत नाही


मी सर्वांना दार उघडतो

पण ती खिड़की उघडत नाही


तू नसतानाही तू असते

मग डोळ्यांना करमत नाही


आजकाल मी वारा झालो

कुठे जायचे ठरवत नाही


डोम्बाऱ्याचा खेळ वेगळा

गलका म्हणजे जनमत नाही


जा मागे अन् आठव काही

का जगण्याला बरकत नाही

............…................................

तीन गझला : शेखर गिरी

 




१.


भुतासारखी छळते आहे तुझी आठवण

कोठेही मज धरते आहे तुझी आठवण


मनात या अंधार कधी होणारच नाही

दिवा होउनी जळते आहे तुझी आठवण


तिला जणू काहीच आठवत नाही आता

तरी सांगते, करते आहे तुझी आठवण


प्रयत्न करतो रोज जुने विसरुन जाण्याचा  

रोज नवी सापडते आहे तुझी आठवण


आठवणीने उदास आहे मन माझे हे

अन् माझ्यावर हसते आहे तुझी आठवण 


२.


दु;ख केवढे साचत जाते तू नसल्यावर

रात्र केवढी वाढत जाते तू नसल्यावर


किती पोळते थंडगार पाणी अंगाला

आग अंतरी लागत जाते तू नसल्यावर


हवा बिचारी घुटमळते माझ्या भवताली

श्वास घ्यायचे विसरत जाते तू नसल्यावर


लोकांमध्ये असूनही मी नसतो तेथे

कुठेतरी मन भटकत जाते तू नसल्यावर


सैरभैर मन एकेजागी थांबत नाही

इकडुन तिकडे धावत जाते तू नसल्यावर


 कुठे मला नेणार कळेना तुझी आठवण 

काळिज माझे फाटत जाते तू नसल्यावर


अता कधीही थांबावा हा श्वास अचानक

नको नको ते वाटत जाते तू नसल्यावर


३.


दररोज होत आहे भडिमार माहितीचा

गेला फुलून सारा बाजार माहितीचा


प्रत्यक्ष अनुभवांचा आनंद संपलेला

नुसताच काळ आता येणार माहितीचा


शेअर नको करू तू फोटो नि फोन नंबर

करतात लोक हल्ली व्यापार माहितीचा


माझ्यावरी किती ती करतेय प्रेम बघण्या

मी वापरीन म्हणतो अधिकार माहितीचा


येतील खूप अगदी लक्षात दूरवरचे

पण नेमका जवळचा सुटणार माहितीचा 


पाठीवरी जरी तो होता छुपा तरीही

समजून येत होता तो वार माहितीचा


असते कुठे कशी ती तू सांग फक्त शेखर

इतका पुरे जगाया आधार माहितीचा

................................….............

तीन गझला : रमेश बुरबुरे

 




१.


आधी जमीनजुमला वाटा म्हणा बरोबर

वाटा समान द्या मग आरक्षणाबरोबर


समजून आपला मी ज्याला उरात जपले

माझ्यावरी निघाला त्याचा फणा बरोबर


कोणीच दूर नसते गेले तुझ्या जवळचे

नसतास ठेवला जर तू 'मी'पणा बरोबर


एका क्षणाकरीता  होतीस  सोबतीला,

त्याची बरोबरी मी करतो सणाबरोबर!


बाहूवरी छताच्या देते जबाबदारी

घरची नि दारचीही तो पाळणा बरोबर


नेता जरी स्वतःची तुलना करी भिमाशी,

कोणीच पदधुळीच्या नाही कणा बरोबर!


'लंकाय जंबुदीपे'  बुद्धावशेष मिळते,

ठेवून सूर्य साक्षी धरती खणा बरोबर


२.


पिंपळाचे मूळ साऱ्या विश्वभर पोहोचले

बुद्ध सापडतो मला जर मी धरेला खोदले


धम्म-तत्त्वांनी जगावर छाप इतकी सोडली,

बुद्ध पृथ्वीने स्वतःच्या काळजावर कोरले


शिल्प गाभाऱ्यातले बघ चांगले न्याहाळुनी

मग तुला समजेल की तू स्तूप आहे चोरले


बांधले कोणी सुखासाठी स्वतःच्या बंगले

विश्व कल्याणास कोणी राजवाडे सोडले


सौख्य दारी नांदण्यामागील कारण, गौतमा,

दुःख होण्यामागचे कारण खरे तू शोधले!


३.


काही म्हणा तुम्ही पण आहे कमाल सत्ता

देते लिहावयाला दुर्मिळ खयाल  सत्ता 


मतदार मावळ्यांची भुमिका मवाळ झाली

झाली  म्हणून इथली भलती जहाल सत्ता


चितही तिचीच होते पटही तिचाच येथे

दोन्हीकडून म्हणते माझीच लाल सत्ता


बेरोजगार लाखो सलमान खान येथे

ऐश्वर्य भोगणारी स्नेहा उलाल सत्ता


मंदीर मस्जिदींचा चालेल वाद जोवर

उधळत अशीच राहिल तोवर गुलाल सत्ता


शोषून रक्त आणिक पैसा लुटून अमुचा

ही आयती मलाई खाते  दलाल  सत्ता


राष्ट्रीय लाजलज्जा अवघी विकून बसली

उठली जिवावरी ही साली छिनाल सत्ता

...…......................................

तीन गझला : गिरीश जोशी


 



१.


काळ करतो कदर शेवटी शेवटी

सत्य होते प्रखर शेवटी शेवटी


लागते ठेच पायास कित्येकदा

वाट होते सुकर शेवटी शेवटी


जन्मभर छापली बातमी ना कुणी

कौतुकाचे सदर शेवटी शेवटी


फार साधीच सुरवात झाली तरी

भरुन काढू कसर शेवटी शेवटी


जेवढी तुष्टता काळजाची तुझ्या

येत जाते बसर शेवटी शेवटी


रंगला राग हळव्या स्वरांनी तिच्या

धुंद झाला प्रहर शेवटी शेवटी


प्रणय गाठेल जेव्हा समाधी स्थिती

तो दिवा मंद कर शेवटी शेवटी


प्रेम आहे तिचे की जणू वोडका

होत जातो असर शेवटी शेवटी


जी हवी ती मिळाली मला बासरी

तृप्त झाले अधर शेवटी शेवटी


रात्र होता कमलदल मिटू लागले

कैद झाला भ्रमर शेवटी शेवटी


विठ्ठला एकदा रूप दाखव तुझे

जीव घे फारतर शेवटी शेवटी


शेर दृष्टीस पडता समजला कुठे?

स्पष्ट झाले पदर शेवटी शेवटी


प्रेयसीने पुन्हा मोगरा वाहिला

धुंद झाली कबर शेवटी शेवटी


२.


गाडी चुकल्या-मुकल्यावर वेळेची किंमत कळते 

आजन्म मुक्या-बहिऱ्याला भाषेची किंमत कळते


फुललेली असते तेव्हा बघण्यास वेळही नसतो

कत्तल झाल्याच्यानंतर बागेची किंमत कळते


दर्शनास जाण्याआधी वारी नाहाया जाते

कार्तीकी-आषाढीला भीमेची किंमत कळते


वनरूम-किचनमध्येही परिवार सुखाने निजतो 

मुंबईत आल्यानंतर जागेची किंमत कळते


हाताच्या मोरपिसाने कोणी गोंजारत नाही

आई सोडुन गेल्यावर मायेची किंमत कळते


पोटाची खळगी भरण्या हासून कसरती करते

डोंबाऱ्याच्या पोरीला तारेची किंमत कळते


कित्येक मास खुंटीवर धुळखात ठेवली जाते

सप्ताह जवळ आल्यावर वीणेची किंमत कळते..


निष्पाप तुकारामाची लेखणी बुडवल्या जाते

पाण्यावर तरते तेव्हा गाथेची किंमत कळते


३.


माणसांपासून अंतर राखतो आहे

एक पक्षी उंच घरटे बांधतो आहे.


ध्रूव ताऱ्यासारखी हृदयात जागा दे

मी कुठे ब्रह्मांड सारे मागतो आहे


पाहिली तळमळ तुझी खोटारडी वक्त्या

जेवल्यानंतर भुकेवर बोलतो आहे


आंधळ्याला सर्व दुनिया आंधळी दिसते

तो म्हणुन डोळस जगाला शोधतो आहे


शोध घ्या त्याचा..करा शिक्षा कडक मोठी

जो व्यसन भोळ्या कवीला लावतो आहे


सावलीची समजण्यासाठी खरी किंमत

देव वर्षाला उन्हाळा धाडतो आहे


चंदना उपलब्धता घातक तुझी ठरली

सरपणासोबत तुलाही जाळतो आहे.


हा तुझा सहवास सूर्यासारखा गझले

देह कर्णासारखा तेजाळतो आहे

...............................................

तीन गझला : एजाज़ शेख

 




१.


उधळायला कुठे पण आयुष्य लागते?

वेचावयास कणकण आयुष्य लागते 


इमले रचून सुंदर घर बांधशील तू

कळण्यास मात्र घरपण आयुष्य लागते


एका क्षणात होतो हा रंक राव पण

होण्यास एक दर्पण आयुष्य लागते


ही चूल जीवनाची विझते क्षणामधे

आणावयास सरपण आयुष्य लागते


डोळ्यांत आसवांना जागा दिलीस का?

समजावयास कारण आयुष्य लागते 


प्रत्येक श्वास म्हणजे लढणे स्वतःसवे

जिंकावयास हे रण आयुष्य लागते 


उंची कळून येते एका क्षणात पण

समजायला खुजेपण आयुष्य लागते


जखमा तुझ्या कदाचित जातीलही भरुन

मिटण्यास हे तुझे व्रण आयुष्य लागते


माझ्यामधील माणुस मरताक्षणी म्हणे

संपावयास 'मी'पण आयुष्य लागते 


उधळून नीळ बाबा मी मिरवतोय पण 

समजायला निळेपण आयुष्य लागते 


२.


अचानक दाटले डोळ्यांत पाणी खूप दिवसांनी

मुलीच्या ठेवुनी हातात नाणी खूप दिवसांनी 


कदाचित काम आहे वाटते माझ्याकडे त्यांना 

विचारू लागले तब्येत-पाणी खूप दिवसांनी


जिथे रडतो तिथे रडते जिथे हसतो तिथे हसते 

व्यथा बहुतेक ही झाली शहाणी खूप दिवसांनी


हृदय हलके करावे वाटते आहे ढगासोबत

चला मग ऐकुया पाऊसगाणी खूप दिवसांनी 


मनाचे घाव भरले पण तरी काहीतरी होते 

तुझी मी आठवत आहे निशाणी खूप दिवसांनी 


तुझे माणूसपण समजायला इतकेच मी केले 

लिहाया घेतली माझी कहाणी खूप दिवसांनी 


३.


संशयाचा मांडला बाजार मौनाने

बाद केले सर्व शिष्टाचार मौनाने


दाबल्या गेल्यात किंकाळ्या मनामधल्या

लावले आहे मनाचे दार मौनाने


हासतो मी ह्या जगाच्या गैरसमजावर

'खूपदा केले मला लाचार मौनाने'


दोन मिनिटांची दिली श्रद्धांजली त्यांनी 

अन् चढवले आसवांचे हार मौनाने


क्षणभरासाठी स्वतःचे एकटेपण जग

चांगला येइल तुला आकार मौनाने 


काय मी करणार जर कळले तुला नाही 

मी दिला होता तुला होकार मौनाने


पावलावर पावले टाकीन बुद्धाच्या 

सोडले केव्हाच मी हत्यार मौनाने


एक छोटेसे हसू, हलका करत आहे 

काळजावर टाकलेला भार मौनाने


एकटे सोडून जग एजाजला गेले 

पण दिला आयुष्यभर आधार मौनाने

.............................................

तीन गझला : गोपाल मापारी

 




१. 

                                            किनारे, चंद्र, तारे, नभ, नद्या, ढग दाखवत असतो.

मुलीला मी घरी चित्रांमधे जग दाखवत असतो.


दिखाव्याची कितींना लागते धग दाखवत असतो.

इथे प्रत्येक मांडव फक्त झगमग दाखवत असतो.


असा दररोज सांजेला, पुढे ढग धावतो माझ्या,

मला कोणी जणू माझीच लगबग दाखवत असतो.


तुम्ही ओळींमधे बसता, उगाचच राबता शोधत,

कवी तर दोन ओळींतील तगमग दाखवत असतो.


बियाण्यातील दाणा एकदा 'मातीत जातो' पण,

पुन्हा उगवून तो मातीसही रग दाखवत असतो.


जगालेखी तुझी गिनती नको शत्रूंमधे माझ्या,

तुला मी एवढ्यासाठीच जिवलग दाखवत असतो.


२.


सांगतो पूर आकाशवाणी नदीला.

या हिवाळ्यात नसणार पाणी नदीला.   


नागमोडी गळा त्यात ओवून गावे,

ही कुणी घातली एकदाणी नदीला.


भेटल्यासारख्या वाटल्या मायलेकी, 

ही नदी भेटली ज्या ठिकाणी नदीला.


एक म्हातारपण रोज रडते नदीवर,

सांगते रोज जीवनकहाणी नदीला


आडवाटेतही जन्म ठेवा प्रवाही,

फक्त जीवन कळाले अडाणी नदीला.


ही नदी वाटते का तिला दानपेटी?

माय का देत असणार नाणी नदीला ?


३.


ही एक गोष्ट देवा तू चांगली दिली.

सर्वांस एक दुनिया आपापली दिली.


मयतीत फोन माझा मी बंद ठेवला.

एका नव्या तऱ्हेने श्रद्धांजली दिली.


आले परिस्थितीने पायात घुंगरू.

 फेकून तोरडी मग, पायांतली दिली.


देऊ कशी तिच्या मी डोळ्यांत आसवे?

स्वप्ने जिने स्वतःच्या डोळ्यांतली दिली.


होत्या मुळात सगळ्या बोन्साय योजना

नव्हती फळे निपजली ना सावली दिली.

..............................................

गोपाल मापारी

मो.9423484829

तीन गझला : प्रियंका गिरी

 




१.


वाहते पाणी निरंतर काठ ओला होत जातो

त्याच काठावर कुणाचा जीव हळवा होत जातो


आठवण येताच घेते डायरी अन् पेन हाती

अंतरामधला उन्हाळा पावसाळा होत जातो


वाचताना पत्र त्याचे मी मधे थांबून जाते

शेवटी मजकूर इतका जीवघेणा होत जातो


पाहतो माझ्याकडे अन् दोर तो फेकून देतो

केवढा प्रेमात कणखर बाप माझा होत जातो


एवढ्यासाठीच गझले मी तुझ्या स्वाधीन होते

एकट्या पडतात जखमा कोंडमारा होत जातो


२.


तुझ्या डोळ्यांमधे शोधायचे आहे 

स्वतःला एकदा भेटायचे आहे


नजर वळवायची आहे जमावाची 

नवे पिल्लू अता सोडायचे आहे


नदी पाहून वेडा जीव पुटपुटला 

मलाही दूर वाहत जायचे आहे 


स्वतःला जो कधी बदलू शकत नाही 

म्हणाला जग मला बदलायचे आहे 


दिले आहेस तू गोंदण मनावरती 

मला आजन्म ते मिरवायचे आहे


दिव्याला रात्रभर जागायचे आहे 

कळेना कोठवर सोसायचे आहे


युगांपासून हे जग धावते आहे 

कुठे त्याला बरे पोचायचे आहे 


३.


निवांत वेळी आवरल्यावर भेटू आपण

सूर्य जरासा मावळल्यावर भेटू आपण


भेटायाचो तिथे अताशा गर्दी असते

गर्दी थोडी ओसरल्यावर भेटू आपण


तुझी गुलाबी पत्रे आता हरवलीत रे

शोधुन बघते, सापडल्यावर भेटू आपण


सोबत भिजणे, मनात होते..राहुन गेले

सर एखादी कोसळल्यावर भेटू आपण


तुझ्यासारखी अजून मीही तरूण आहे

शंकेचे हे वय टळल्यावर भेटू आपण


जुने बहाणे जुने स्पर्श अन् जुने तराणे

जुने शहारे आठवल्यावर भेटू आपण


तुझ्याचसाठी जपून ठेविन श्वास शेवटी

अखेरच्या त्या उंबरठ्यावर भेटू आपण

..............................................

दोन गझला : गिरीश खोब्रागडे

 




१.


पराभव अटळ आज युद्धात माझा

जवळचाच व्यक्ती करे घात माझा


किती लोक वाईट झाली म्हणावी

दिले बोट तर ओढती हात माझा


विसरलो तिचा चेहरा मी कधीचा

तिला चेहरा मात्र लक्षात माझा


खरे बोलण्याचा जसा यत्न केला

तसा खून केलात चौकात माझा


सवय जात नाहीच वरचढपणाची 

जरी मारला मी इगो आत माझा

                               

२.


तू दिला प्रत्येक सल्ला जीवनाला सार्थ होता 

मीच तेव्हा काढलेला वेगळा व्यंगार्थ होता 


खंत थोडीही कशी ना, वाटली कोणास याची 

की अपेक्षित लेखकाला कोणता मतितार्थ होता 


आज तू बघतेस ज्यांना ते तथागत बुद्ध आहे 

भूतकाळाचा कुठे तो, राहिला सिद्धार्थ होता 


का अचानक वेळ आली, वाममार्गी जायची मग 

योग्य मार्गाने मिळवला जर इथे चरितार्थ होता 


धर्मभोळे लोक केले धर्मबेरूंनी नव्याने 

काय त्यांच्या हाच लेखी शेवटी परमार्थ होता                      

..............................................

तीन गझला : रोशन किसनराव गजभिये

 




१.


अशा या रुक्ष डोळ्यांनी इशारे काय कामाचे

नदी आटून गेल्यावर किनारे काय कामाचे


मला तो चेहरा सुंदर तिचा दिसणार नाही तर

इथे उगवूनही दररोज तारे काय कामाचे


ऋतू हा वांझ वाटू लागला आहे वसंताचा

जवळ नाहीस तू मग हे फवारे काय कामाचे


तुझे अस्तित्व मातीमोल माझ्या जीवनासाठी

तृषार्ताला समुद्रा नीर खारे काय कामाचे


असे पेटून उठताना हजारो पाहिले किस्से

क्षणातच राख झालेले निखारे काय कामाचे


असावा मित्र एखादाच, तोही आरशावाणी

बढाया शेकडोंनी मारणारे काय कामाचे


कुणाचे पोट पाठीला, कुणाचे बाळ छातीला

बिगारी लावलेले हे बिचारे काय कामाचे


२.


तू गुन्हा समजून का साध्या त्रुटीला

जीव माझा आणला मेटाकुटीला


हुंदके देऊन मी बेभान रडलो

फक्त हे कारण पुरेसे ढगफुटीला


एवढी झाली सवय ठेचाळण्याची

पाय घाबरतात आता राहुटीला


बघ प्रथम प्रवृत्त केले तूच मजला

मग पुढे सरसावलो ताटातुटीला


आत्महत्येला व्यथा माझी निघाली

छेडणे शिकवा कुणी त्या पळपुटीला


३.


वृत्तामधून नाही; वृत्तीमधून यावी

अपुली गझल नभाच्या मुक्तीमधून यावी


त्यांचा विरोध होता प्रत्यक्ष वागण्याला

क्रांती कशी प्रभावी उक्तीमधून यावी?


इथली तमाम जनता झाली खऱ्याविरोधी

ही योजना कुणाच्या क्लृप्तीमधून यावी?


ठेवा किमान इतके लक्षात वंचितांनो

चैतन्यता उद्या या सुस्तीमधून यावी


समृद्ध भारताची आता नवीन सत्ता

नैतिक अशा युवांच्या युक्तीमधून यावी


जोडून हात दोन्ही इतकेच मागतो मी

पाठी जखम जवळच्या गुप्तीमधून यावी


बस एवढ्याचसाठी स्वीकारली फकीरी

जन्मास एक इच्छा तृप्तीमधून यावी

...............................................